जिल्हा प्रशासनाच्यावतीने शोभायात्रेचे आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर :- जिल्ह्याचा मानबिंदू असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा २६ जून, २०२४ रोजी १५० वा जयंती दिनानिमित्ताने जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन कऱण्यात आले आहे. शोभा यात्रेचा शुभारंभ पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते होणार असून राजर्षी शाहू महाराजांच्या जीवनपटावरील मालिकेमध्ये त्यांची भूमिका साकारणारे राहुल सोलापूरकर यांची या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
शोभायात्रेचा प्रारंभ दसरा चौकातून होणार असून ही शोभायात्रा बिंदू चौक - मिरजकर तिकटी - बिन खांबी गणपती - महाद्वार रोड - पापाची तिकटी - सीपीआर हॉस्पिटल - समाधी स्थळ या मार्गाने जाणार आहे. या शोभायात्रेमध्ये विविध प्रशालांचे / बोर्डिंगचे साधारणपणे १८ ते २० चित्ररथ असणार आहेत. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनपटातील प्रसंग या चित्ररथातून दर्शविले जाणार आहेत. तसेच चार हजार शालेय / बोर्डिंगचे विद्यार्थी पारंपरिक वेशभूषेमध्ये सहभागी होणार आहेत.
शोभा यात्रेमध्ये लेझीम पथक, ढोल पथक, मर्दानी खेळ, कोल्हापूर जिल्ह्यातील मल्ल, घोडेस्वार, बग्गी मध्ये स्वार झालेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे प्रमुख आकर्षण असणार आहे. ही शोभायात्रा पाहण्यासाठी व शाहू राजाला अभिवादन करण्याकरिता
जिल्हयातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहून शोभा यात्रेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांनी केले आहे.