ऐतिहासिक दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याला पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिवादन
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज की जय ! या जयघोषाने शाहू महाराजांचे स्मरण करुन देणाऱ्या शोभा यात्रा व समता दिंडीला कोल्हापूरकरांनी रिमझिम सरितही भरघोस प्रतिसाद दिला. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्मदिवस ‘सामाजिक न्याय दिन’ म्हणून साजरा करण्यात आला. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन व सहायक आयुक्त समाजकल्याण विभागाच्या वतीने दसरा चौकात समता दिंडीसह विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
समता दिंडीचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते समता दिंडीला हिरवा झेंडा दाखवून करुन करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, बार्टीचे महासंचालक सुनील वारे, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त सचिन साळे तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
दसरा चौकात सुरुवात झालेली समता दिंडी पुढे -व्हिनस कॉर्नर- आई साहेबांचा पुतळा- बिंदू चौकात येवून या दिंडीचा समारोप झाला.
या समता दिंडीमध्ये विद्यार्थ्यांनी मर्दानी खेळ, झांज, ढोल ताशा, लेझीम आदी कलाप्रकार सादर केले. दिंडीत एन.सी.सी., एन.एस.एस., स्काऊट गाईडचे विद्यार्थीही मोठ्या संख्येने सहभागी झाले. शाहू महाराजांच्या वेशभूषेत उपस्थित मुलांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. जिल्हा समाजकल्याण कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या चित्ररथामध्ये पारंपरिक वेषभुषा परिधान करुन जिवंत देखावा सादर करण्यात आला. कोल्हापूर नगरी ही खेळाडूंची नगरी असल्याने कुस्ती, फुटबॉल सह इतर खेळाडू त्यांच्या खेळाशी निगडीत वेषभूषा करुन यावेळी या दिंडीमध्ये सहभागी झाले होते. तर बहुतांशी विद्यार्थी-विद्यार्थिनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. जिल्हा प्रशासन व सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे आयोजित समता दिंडी साठी विविध विभागांनी सहभाग घेतला.
दरम्यान शाहिरी पोवाड्यातून राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विविध शाळांचे शेकडो विद्यार्थी, शाहू प्रेमी, इतिहास प्रेमी नागरिक उपस्थित होते.
शाहू महाराजांना अभिवादन
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी ऐतिहासिक दसरा चौक येथे १९२७ साली बांधलेल्या राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करुन पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनीही आदरांजली वाहिली. यावेळी इतिहास प्रेमी, नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.