शिक्षण व्यवस्थेत कल्पनाशक्ती व सृजनशीलतेचा कोंडमारा होतो आहे --अशोक केसरकर यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी ता.२३ विविध प्रवेश परीक्षा आणि या परीक्षेतून यशस्वी होण्यासाठी क्लासेस व अकॅडमीने विकसित केलेले तंत्र अतिशय धोकादायक आहे. घोकंपट्टी, सराव परीक्षा आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार न करता चालू असणाऱ्या तथाकथित मार्गदर्शकाच्या अनैसर्गिक वर्गातून चालणारी हाडेलहप्पी आणि यातून विद्यार्थ्यांचा व पालकांच्या वैचारिक क्षमते बरोबरच कल्पनाशक्तीचा व सृजनशीलतेचा कोंडमारा होत आहे. लातूर ,कोटा इत्यादी पॅटर्न मधून  होणाऱ्या मानसिक अत्याचारातून विद्यार्थ्यांच्या आत्महत्या होत आहेत.  वैद्यकीय व अभियांत्रिकी शाखेचा अट्टाहास  बहुतांशांची फसवणूक करणारा आहे. शासनाच्या धोरणातूनही वाड्या वस्त्यांवरील शाळा बंद करून समूह शाळांना प्रोत्साहन मिळत आहे. खाजगीकरणाच्या हव्यासातून सरकारी शाळांची दुरावस्था होत आहे. त्यामुळे एकूण शिक्षण क्षेत्रावर एक गंभीर संकट उभे राहिले आहे,असे प्रतिपादन शिक्षण क्षेत्राचे जेष्ठ अभ्यासक अशोक केसरकर यांनी केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात  " शिक्षणाचा नीट गोंधळ ' या विषयावर बोलत होते. अशोक केसरकर यांनी यावेळी शिक्षण क्षेत्रात नव्याने येत असलेल्या बदलांचा खरपूस समाचार घेतला.यावर झालेल्या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, शकील मुल्ला, पांडूरंग पिसे, देवदत्त कुंभार, रामभाऊ ठीकणे, दयानंद लिपारे, मनोहर जोशी, शहाजी धस्ते यांनी सहभाग घेतला.

या चर्चासत्रातून असे मत पुढे आले की, यशाच्या स्पर्धेतील जीवघेणी आगतिकता देशाचे भवितव्य घडवणाऱ्या पिढीला मोठ्या प्रमाणात विनाशाच्या गर्तेत ढकलत आहे का ? हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याचे उत्तर शोधण्याचे प्रयत्न अभ्यासपूर्वक करण्याची गरज आहे. राष्ट्रीय पातळीवरील नीट पासून  नेट पर्यंत आणि राज्यपातळीवरील शिक्षक पात्रते साठीच्या टीईटी पासून पोलीस भरतीपर्यंत आणि अभ्यासक्रम बदलापासून पेपर फुटीपर्यंत शिक्षण क्षेत्रामध्ये जो गोंधळ होतो आहे तो उमलत्या पिढ्यांना उध्वस्त करणारा आहे. नव्या शैक्षणिक धोरणाचा फार मोठ्या प्रमाणात गाजावाजा करण्यात येत आहे. मात्र त्यातून मानवी संसाधनाचा नेमका किती व कशा पद्धतीने विकास होणार आहे यावर एक गंभीर प्रश्नचिन्ह आहे. विद्यार्थ्यांना आपापल्या कलानुसार शिकण्याचे स्वातंत्र्य हवेच मात्र त्याच बरोबर कौशल्य प्रशिक्षण हा केवळ देखावा ठरता कामा नये. राष्ट्राचा समतोल विकास हा सेवा क्षेत्राच्या वाढीबरोबरच उत्पादन क्षेत्राच्या वाढीवरही अवलंबून असतो. हजारो आयआयटीयन,लाखो उच्च अर्हता प्राप्त  अभियंते,  आणि करोडो उच्चविद्याविभूषित तरुण बेरोजगारीच्या  खाईत ढकलले जात आहेत . त्याचे व्यक्तिगत ,कौटुंबिक, राजकीय ,आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक अशा सर्व पाता कळ्यांवर गंभीर परिणाम होत आहेत. शिक्षणाचे बाजारीकरण, धर्मांधीकरण, विकृतिकरण अंतिमतः घटनात्मक मूल्यांना तडा देणारे आणि राष्ट्राला हानी पोहोचवणारे ठरत असते.यामुळे या प्रश्नाकडे  केवळ संकुचित राजकीय दृष्टिकोनातून न पाहता सर्वच राजकीय पक्षांनी, सुज्ञ नागरिकांनी, विद्यार्थी व पालकांनी या प्रश्नाच्या सखोलतेकडे लक्ष दिले पाहिजे.ते सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post