प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी : राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती निमित्त विविध उपक्रम राबविणेच्या सुचना शासन स्तरावरून दिलेल्या आहेत. या अनुषंगाने दि.२८ रोजी जिल्हा प्रशासन, शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी जयंती समिती आणि इचलकरंजी महानगर पालिका यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृह येथे शाहिरी पोवाडा आणि व्याख्यानाचे आयोजन करणेत आले होते.
या कार्यक्रमाचा शुभारंभ उपविभागीय अधिकारी मोसमी चौगुले, उपायुक्त प्रसाद काटकर, उपायुक्त स्मृती पाटील, सहा. कामगार आयुक्त जयश्री भोईटे, अप्पर तहसीलदार सुनील शेरखाने, यांच्या हस्ते आणि सहा.आयुक्त विजय राजापुरे, क्रीडा अधिकारी संजय शेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिमा पूजन करून करणेत आला.
या कार्यक्रमात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंतीनिमित्त इचलकरंजी महानगरपालिकेने आयोजित केलेल्या राजर्षी शाहू महाराज जयंती महोत्सवात इचलकरंजीच्या शाहीरानी आपला सहभाग नोंदविला. श्रीमंत नारायणराव घोरपडे नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमाची सुरुवात शाहिर क्रांती जगताप हिच्या गण गायनाने झाली त्यानंतर शाहीर कुमारी कीर्ती जगताप हिने छत्रपती शिवरायांना वंदन करणारे गीत सादर केले. त्यानंतर शाहीर हिंदुराव लोंढे यांनी एक देशभक्तीपर गीत सादर केले तर कुमारी विद्या देवेकर हीने शाहू महाराजांच्या गौरवाचे गित सादर केले. यानंतर शाहीर संजय जाधव यांनी शाहिरी मुजरा सादर करून" हिरे मानके मोती उधळा "हे गीत सादर केले त्यानंतर शाहीर विजय जगताप यांनी उत्तर प्रदेशात मायावती मुख्यमंत्री असताना झालेल्या शाहू महोत्सवात सादर केलेले शाहू महाराजांचे " बोलो शाहू की जयकार" हे हिंदी गीत मोठ्या जोशात सादर केले. त्यानंतर शाहू महाराजांच्या जीवनाचे संपूर्ण चित्र त्यांनी आपल्या पोवाड्यातून उभे केले . कार्यक्रमाची सांगता शाहिर शिला पाटील हिने भैरवीने केली.
तदनंतर व्याख्याते आणि समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर आधारित व्याख्यान संपन्न झाले.
या कार्यक्रमास शहरातील कामगार आणि शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.