समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रातील मत
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता. ३ राजकीय ,सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक ,बौद्धिक आणि अध्यात्मिक अशा सातही क्षेत्रात अमुलाग्र बदल होईल. भारत एक जातनिरपेक्ष समतावादी ,शोषण विरहित देश म्हणून आकार घेईल असे चित्र जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांती ही घोषणा करताना रंगवलेले होते. राजकारणाचे शुद्धीकरण करून लोककारणात त्याचे परिवर्तन करणे हे संपूर्ण क्रांतीचे मूलभूत अंग गृहीत धरले होते. त्या पद्धतीचे काही प्रयत्न निश्चीतपणाने झाले. पण ते पुरेसे व सातत्यपूर्ण झालेले नाहीत हे वास्तव आहे. माणसाची सतप्रवृत्ती आणि सौजन्यशीलता या गृहीतकावर आधारित संपूर्ण क्रांतीची भूमिका होती. मात्र ती व्यवहारवादापासून दूर असल्याने ती कृतीत येऊ शकली नाही. आदर्शवादाला व्यवहार्य पातळीवर आणणे हे नेहमीच कठीण असते.मात्र तरीही त्यामागील विचार हा निश्चितपणाने महत्त्वाचा होता असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.
संपूर्ण क्रांती च्या पन्नासाव्या वर्षानिमित्त या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.या चर्चेत प्रसाद कुलकर्णी ,राहुल खंजिरे ,अशोक केसरकर, पांडुरंग पिसे, शकील मुल्ला ,रामचंद्र ठिकणे, अशोक मगदूम, मनोहर जोशी आदींनी सहभाग घेतला. प्रारंभी मनुस्मृती आणि तत्सम विषमतावादी ग्रंथातील आशय शालेय अभ्यासक्रमामध्ये येऊ देऊ नये अशी मागणी करण्यात आली. आणि मनुवादी प्रवृत्तीचा धिक्कार करण्यात आला.
या चर्चासत्रात असे मत व्यक्त करण्यात आले की, कोणताही विचार वारसा जर बळकट करायचं असेल तर त्यासाठीचा कृती वारसा हा विस्तारित करत जावा लागतो. संपूर्ण क्रांती या भूमिकेचे समर्थक त्याबाबत कमी पडले हे मान्य करावे लागेल. क्रांतीचे साधन कायदा नव्हे तर केवळ मनःपरिवर्तनानेच क्रांती होईल हे मानणे भाबडेपणाचे असते.आधुनिक काळात कायद्याचे राज्य ही रूढ झालेली संकल्पना नजरेआड करून चालणार नाही. गांधीजी ,आचार्य विनोबा भावे यांच्यानंतर जयप्रकाश नारायण यांनी तरुणांना पुरोगामी चळवळीत पूर्ण वेळ समाजकारण करण्यासाठी आणण्यात मोठी भूमिका बजावली. संपूर्ण क्रांती या घोषणेने ती मोठ्या प्रमाणात साकारही झाली. आज या घोषणेच्या पन्नास वर्षानंतरची वास्तव परिस्थिती ध्यानात घेऊन समाजकारण करण्याची गरज आहे.