प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सिंहगड रस्ता परिसरातील नऱ्हे भागात एका गोदामावर छापा टाकून जोरदार कारवाई करीत एक कोटी ३९ लाख रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणाहून गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल देखील मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणीच गुटखा तयार केला जात असल्याचा पोलिसांना संशय असून या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून त्यांचा एक साथीदार फरार झाला आहे.
पुष्पेंद्र अकबाल सिंग (वय २७, रा. नऱ्हे, मूळ रा. उत्तर प्रदेश), सुनील पथ्थन सिंग (वय ४५, रा. नऱ्हे, मूळ. रा. उत्तर प्रदेश), मुकेश कालुराम गेहलोत (वय २८, रा. आंबेगाव, मूळ. रा, राजस्थान), चंदन अजयपाल सिंग (वय ३२, रा. नऱ्हे, मूळ. रा. उत्तर प्रदेश) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचा साथीदार नीलेश ललवानी (वय ४०, रा. नऱ्हे) फरार झाला आहे. आरोपींविरुद्ध अन्नसुरक्षा मानदे कायदा अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नऱ्हे येथील एका गोदमात गुटख्याचा मोठा साठा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या गोदामा मधून शहारातील विविध भागात असलेल्या विक्रेत्यांना हा गुटखा पाठविला जात होता. शनिवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभाग, तसेच गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी एक कोटी ३९ लाख रुपयांचा गुटखा जप्त केला. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.