समाजवादी प्रबोधिनीचे ४८ व्या वर्षात पदार्पण


प्रेस मीडिया लाईव्ह :

महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळख असणाऱ्या वस्त्रनगरी इचलकरंजी मध्ये‘वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ‘ हे ब्रीद घेऊन ११ मे १९७७ रोजी समाजवादी प्रबोधिनीची स्थापना झाली. या महिन्यात प्रबोधिनीने ४८ व्या वर्षात पदार्पण करून  सुवर्ण महोत्सवी वर्षाकडे वाटचाल सुरू केली आहे.महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेरही ख्यातनाम असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची स्थापना थोर स्वातंत्र्यसैनिक आणि ज्येष्ठ विचारवंत आचार्य शांताराम गरुड यांच्या पुढाकाराने आणि इतर अनेक विचारवंत सहकाऱ्यांच्या मदतीने झाली. प्राचार्य ए.ए.पाटील,प्रा. डॉ.एन. डी.पाटील ,कॉम्रेड गोविंद पानसरे, भाई ज्ञा.स.नार्वेकर, प्राचार्य म.द.देशपांडे ,पी.बी.साळुंखे ऍड. डी.ए. माने,बाळासाहेब पोतदार,वि.स.पागे,डॉ.अक्षय मोहंती,अनंतराव भिडे आदी अनेक मान्यवर यात सहभागी होते. आणखी दोन वर्षांनी समाजवादी प्रबोधिनीचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असेल त्यावेळी समाजवादी प्रबोधिनी सर्वार्थाने अधिकाधिक सक्षम व्हावी यासाठी काही योजना आखण्याचा व उपक्रम आखण्याचा मानस आहे. त्या वेळोवेळी आपल्यास कळवल्या जातील आपण सर्वांनी त्यामध्ये योगदान द्यावे ही नम्र विनंती. सध्या लोकसभा निवडणुकांच्या गदारोळ सुरू आहे. ४ जून रोजी देशाचा कौल स्पष्ट होणार आहे. आपण सर्वजण त्याकडे लक्ष देऊन आहोत. त्यानंतर या उपक्रमांची व योजनांची आखणी होईल. 


संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे १९७७ पासून ३ सप्टेंबर २०११ रोजी कालवश होईपर्यंत आचार्य शांताराम गरुड समाजवादी प्रबोधिनीचे काम अविरतपणे करत होते. त्यांच्या बरोबर १९८५ पासून म्हणजे गेली अडतीस वर्षे प्रसाद कुलकर्णी समाजवादी प्रबोधिनीचे पूर्णवेळ कार्य करत आहेत. आचार्य शांताराम गरुड यांच्या पश्चात प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि इतर सर्व सहकाऱ्यांच्या सहकार्याने समाजवादी प्रबोधिनीचे काम वाढत्या उपक्रमशीलतेने सुरू ठेवले आहे.गतवर्षी १७ जानेवारी २०२२ रोजी प्रा. डॉ.एन.डी. पाटील सुद्धा आपल्याला सोडून गेले.एन.डी.सरांच्या जाण्याने समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थापकांतील अखेरचा बुलंद आवाज आणि शिलेदार आपण गमावला आहे. तसेच प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांच्या निधनानंतर ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ.जे.एफ.पाटील हे सर्वानुमते समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष झाले होते.मात्र ७ डिसेंबर २०२२ रोजी डॉ.जे.एफ.पाटील हेही अचानक कालवश झाले. २०२२ या गेल्या वर्षाने समाजवादी प्रबोधिनीला असे दोन मोठे धक्के सहन करावे लागले.गतवर्षी समाजवादी प्रबोधिनीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ विचारवंत प्रा.डॉ.अशोक चौसाळकर यांची एकमताने निवड  करण्यात आली.


 प्रबोधन चळवळीला अलीकडे काळ मोठा कठीण आला आहे हे खरे. कारण सारे इझम आणि संवैधानिक मूल्ये आज राज्यकर्त्यांकडून पायदळी तुडवली जात आहेत. प्रबोधन ही सातत्याने चालणारी प्रक्रिया आहेच.पण आजच्या अस्वथ वर्तमानात वैचारिक ,सैद्धांतिक पातळीवरील व्यापक प्रबोधनाची मोठी गरज आहे.१९७५ साली आलेली आणीबाणी राजकिय, सामाजिक कार्यकर्त्यांना अस्वस्थ करून गेली. त्यांची मने सैरभैर झाली होती. तसेच १९६० नंतरच्या काळात राजकीय पक्षांच्या बांधणीतही दोष दिसू लागले होते. भारतीय राज्यघटनेच्या तत्त्वज्ञानाचे व मूल्यांचे प्रबोधन करण्याचा उपक्रम सर्वप्रथम समाजवादी प्रबोधिनी सुरू केला. आज हा विषय सर्व पुरोगामी चळवळीच्या केंद्रस्थानी आलेला आहे. यातूनच प्रबोधिनीचे दृष्टेपणही दिसून येते . आणीबाणी नंतरच्या काळात पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये प्रबोधनाचा अभाव दिसून येत होता. त्यामुळे समाजजीवनात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली होती. ही पोकळी भरून काढावी आणि जिज्ञासू कार्यकर्त्यांचे ,समाजाचे प्रबोधन करावे या हेतूने समाजवादी प्रबोधिनी हे अपक्षीय ज्ञानपीठ तयार झाले.तत्कालीन  राजकीय आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या समाजवादी प्रबोधिनीचे व तिच्या कामाचे महत्त्व आजच्या वर्तमानी परिस्थितीतही अधिक महत्वाचे ठरते.


भारतीय राज्यघटनेच्या पायाभूत संकल्पनांची, राज्यघटनेच्या तत्वज्ञानाची, भारतीय संस्कृतीसह भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची आणि निरनिराळ्या इझमची (तत्वज्ञानांची) जाण असलेले ,तशी मानसिकता तयार असलेले कार्यकर्ते , लोकप्रतिनिधी , नागरिक प्रत्येक क्षेत्रात निर्माण करणे हा संस्थेचा स्थापनेपासूनचा मुख्य उद्देश आहे. हे कार्य अविरतपणे सुरू आहे. असे काम करणारी ‘ समाजवादी प्रबोधिनी ‘ही महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. १९९९ साली महाराष्ट्र फाउंडेशनचा समाजकार्य गौरव पुरस्कारही संस्थेला मिळाला आहे.तसेच इतरही अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.गेल्या ४७वर्षात व्याख्याने ,व्याख्यानमाला ,चर्चासत्रे ,अभ्यास शिबिरे ,परिसंवाद, मेळावे आदी स्वरूपाच्या साडेसहा हजारांवर कार्यक्रमाचे आयोजन समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने करण्यात आले आहे. इचलकरंजी या मुख्य केंद्राबरोबरच कोल्हापूर ,सांगली ,सातारा ,सोलापूर, सिंधुदुर्ग आणि बेळगाव या जिल्ह्यातील विविध शाखांच्या माध्यमातून हे काम अखंडपणे सुरू आहे. त्यामध्ये प्रत्येक शाखेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे अतिशय मौलिक स्वरूपाचे योगदान असते.


 समाजवादी प्रबोधिनीच्या उपक्रमात विविध क्षेत्रातील राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय आणि राज्यस्तरीय मान्यवरांचा ,अभ्यासकांचा,विचारवंतांचा मोठा सहभाग असतो. लोक प्रबोधनाचे सातत्यपूर्ण उपक्रम हे प्रबोधिनीचे वैशिष्ट्य राहिले आहे. असे काम करणाऱ्या अनेक संस्था व चळवळी महाराष्ट्रात समाजवादी प्रबोधिनीच्या प्रेरणेतून तयार झाल्या याचा प्रबोधिनीला नेहमीच अभिमान आहे.समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने जानेवारी १९९० पासून गेली चौतीस वर्षे नियमितपणे ” प्रबोधन प्रकाशन ज्योती ” हे मासिक प्रकाशित केले जाते. lSSN प्राप्त असलेल्या या मासिकात वर्षभरात अंदाजे नऊशे पृष्ठांचा सकस वैचारिक मजकूर घरपोच केला जातो. आज अखेर ४३८ अंकाच्या माध्यमातून सत्तावीस हजारांवर छापील पृष्ठांचा मजकूर लोकप्रबोधनार्थ प्रकाशित केला आहे.” पुनर्मुद्रणाचा मुक्त परवाना ” हे या मासिकाचे वैशिष्ट्य आहे. 


कॉ. गोविंद पानसरे यांचे ‘शिवाजी कोण होता? , राजर्षी शाहू :वसा आणि वारसा ,मंडल आयोग तसेच प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांचे ‘शेवटी हे शिक्षण आहे तरी कोणासाठी ?,महर्षी शिंदे :एक उपेक्षित महात्मा आणि आचार्य शांताराम गरुड यांचे भारतीय राज्यघटना यासह अनेक अभ्यासकांच्या गाजलेल्या पुस्तक -पुस्तिका ‘ प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मधूनच सर्वप्रथम प्रकाशित झाल्या आहेत याचाही मोठा अभिमान प्रबोधिनीला आहे.या मासिकाचे १९९० ते २०२१ ही अकरा वर्षे आचार्य शांताराम गरुड संपादक होते. तर २००२ पासून गेली बावीस वर्षे मुख्य संपादक पदाची धुरा प्रसाद कुलकर्णी सांभाळत आहेत. या मासिकाचा वाचक वर्ग महाराष्ट्रभर पसरलेला आहे. जिज्ञासू – अभ्यासू वाचक, स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी, सामाजिक -राजकीय कार्यकर्ते , नागरिक बंधू – भगिनी या साऱ्यांनाच हे मासिक अतिशय उपयुक्त ठरते असा अनुभव आहे. या मासिकाच्या कार्यावर मुंबई विद्यापीठ आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ येथे पीएच.डी व एम.फिल. झालेले आहे. तसेच या मासिकाचा समावेश अनेक विद्यापीठांच्या भाषा व सोशल सायन्सच्या संदर्भ यादीमध्ये दिसून येतो.गेल्या चौतीस वर्षांमध्ये विविध विद्यापीठातील शेकडो प्रबंधांमध्ये या मासिकाचा उल्लेख संदर्भ म्हणून केला गेला आहे.याचाही विशेष आनंद आहे.


१९८४ साली समाजवादी प्रबोधिनीने ” प्रबोधन वाचनालय ” सुरू केले.शासनमान्य इतर ‘ अ ‘दर्जा प्राप्त असलेल्या या ग्रंथालयातआज कथा,कादंबरी,ललित,काव्य,चरित्र,नाटक,समीक्षा,धर्म,राजकीय,वैचारिक अशा सर्व साहित्य प्रकाराची एकतीस हजार पुस्तके आहेत.त्यामध्ये समृद्ध असा संदर्भ विभाग आणि तीन हजारांवर पुस्तकांचा बाल विभागही आहे.या वाचनालयात दररोज सोळा दैनिके येतात. तसेच शंभरावर नियतकालिकेही येतात.या मोफत वाचन विभागाचा आणि ग्रंथ विभागाचा लाभ शेकडो वाचक घेत असतात. प्रबोधन वाचनालयाच्या वतीनेही विविध साहित्य,कला, सांस्कृतिक उपक्रम सातत्याने राबवले जातात.


समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने अनेक शाखेवर कार्यकर्त्यांची साप्ताहिक,पाक्षिक बैठक होत असते. त्यातून ताज्या घडामोडींवर चर्चासत्र होत असते.तसेच प्रासंगिक व्याख्याने ,अर्थसंकल्प व्याख्यानमाला ,संवाद -संभाषणक्षम कार्यकर्ता प्रशिक्षण , संविधान साक्षरता मोहीम,राष्ट्रीय एकात्मता मोहीम ,मतदार जागृती मोहीम ,प्रायोगिक शैक्षणिक उपक्रम ,प्रबोधन महिला मंच, विविध भाषा शिक्षण वर्ग, बांधकाम कामगार प्रशिक्षण वर्ग, दिवाणजी व जमाखर्च प्रशिक्षण वर्ग ,ग्रंथालय प्रशिक्षण वर्ग यासारखे अनेक उपक्रम राबवले गेले व राबवले जात आहेत. इचलकरंजी मध्ये समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने वर्षभर सातत्याने कार्यक्रम सुरू असतात.समाजवादी प्रबोधिनीच्या मुरगूड शाखेच्यावतीने १९८६ पासून ‘ मुरगूड ‘ येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला घेतली जाते.तसेच किर्लोस्करवाडी शाखेच्या वतीने २०१२ पासून किर्लोस्करवाडी येथे ‘आचार्य शांताराम गरुड व्याख्यानमाला ‘ घेतली जाते. शिवाजी विद्यापीठा पासून विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमानेसुद्धा समाजवादी प्रबोधिनीने आजवर शेकडो उपक्रम घेतलेले आहेत.वृत्तपत्र लेखक संघ, अल्कोहोलिक ॲनॉनिमस, रंगयात्रा नाट्यसंस्था यासारख्या अनेक संस्था – संघटनांना समाजवादी प्रबोधिनीचे सातत्यपूर्ण सक्रीय सहकार्य असते. समाजवादी प्रबोधिनीच्या संस्थात्मक लोकप्रबोधन कामाचे महत्त्व पटल्यामुळे प्रबोधनाचे कार्य करणाऱ्या अशा आणखी काही संस्था महाराष्ट्रात उभ्या राहिलेल्या  आहेत. याचा प्रबोधिनीला सार्थ अभिमान आहे.समाजवादी प्रबोधिनीच्या मध्यवर्ती कार्यकारी मंडळासह विविध शाखांतील अनेक कार्यकर्ते व्यक्तिगत व सामूहिक पातळीवर समाजवादी प्रबोधिनीचे कार्य व्यापक व्हावे यासाठी सातत्याने कार्यरत असतात.लोकप्रबोधनाचे हे कार्य संघटितरूपाने सुरू आहे ही अभिमानाची बाब आहे.प्रबोधन चळवळीपुढील आव्हाने वाढत असतांना हे काम अधिक लोकसहभागाने करणे अत्यावश्यक आहे. म्हणूनच ज्या मंडळीना समाजवादी प्रबोधिनीच्या कार्यात सहभागी व्हायचे आहे त्यांनी जरूर संपर्क करावा. 


समाजवादी प्रबोधिनीचे मध्यवर्ती कार्यालय, एकतीस हजारावर ग्रंथ ,सोळा दैनिके व शंभरावर नियतकालकांनी समृद्ध असलेले प्रबोधन वाचनालय, गेली चौतीस वर्षे नियमित प्रकाशित होणारे ‘ ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘हे मासिक, तसेच नियोजित अभ्यासिकेची उभारणी,

सातत्याने होणारे असंख्य कार्यक्रम या सातत्यपूर्ण प्रबोधन कार्यासाठी, उपक्रमांसाठी दरवर्षी किमान दहा लाख रुपये खर्च येत असतो. यासाठीआपण देणगी रूपाने सहकार्य करावे अशी नम्र विनंती आहे. तसेच गेली चौतीस वर्षे सुरू असणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती’ मासिकाचेही आपण वर्गणीदार वाचक अद्याप झाला नसाल तर तेही व्हावे ही नम्र विनंती.या विनंतीचा स्वीकार करून त्वरित सहाय्य कराल ही अपेक्षा आहे. आपल्या सहकार्याच्या प्रतीक्षेत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post