वैशिष्ट्यपूर्ण मतदान केंद्रांना मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन यांची भेट
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हाधिकारी अमोल येडगे व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या संकल्पनेतून जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित 71 मतदान केंद्रे जिल्ह्यात तयार करण्यात आली आहेत. कागल तालुक्यातील बानगे येथे "कुस्ती पंढरी" या विषयावर तर लिंगनूर येथे "कोल्हापुरी कापशी चामडी चप्पल" विषयावर तसेच हुपरी येथे "चांदीची हुपरी कला गुणांची पंढरी" या विषयावर मतदान केंद्र तयार करण्यात आले आहे. या मतदान केंद्रांना आज जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी भेट देऊन केंद्रांची पाहणी केली.
कागल तालुक्यातील लिंगनुर येथे कापशी चामडी चप्पल बनवण्याची पद्धत त्याच्या वापराचे फायदे याबाबत माहिती फलक लावण्यात आले आहेत. तसेच येथील प्रसिद्ध कोल्हापुरी चप्पलांचे प्रदर्शन लवण्यात आले आहे.
बानगे मध्ये कुस्तीच्या आखाड्याची प्रतिकृती तयार करण्यात आली असून कुस्तीसाठी लागणारे साहित्यही दाखवण्यात आले आहे. तसेच कुस्ती आखाडा, कुस्ती साहित्य व कुस्तीचे पारंपरिक साहित्य याविषयी थोडक्यात माहिती देणारे आकर्षक फलक पद्धतीने लावण्यात आले आहेत.
हुपरी येथे चांदीपासून तयार करण्यात आलेल्या दागिन्यांचे व वस्तूंचे आकर्षक फलक लावण्यात आले आहेत.
यासह जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात आदर्श मतदान केंद्रे व जिल्ह्याच्या वैशिष्ट्यांवर आधारित नाविन्यपूर्ण मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत.
*******