गेल्या पाच तासांपासून भावाला शोधतोय, त्याचा फोन वाजतोय; तो जिवंत असेल अशी आशा'


प्रेस मीडिया लाईव्ह :

 विशेष प्रतिनिधी :  सुनील पाटील

डों बिवली एमआयडीसी मधल्या एका केमिकल कंपनीत गुरुवारी 23 मे दुपारी भीषण स्फोट होऊन आठ जणांचा मृत्यू झाला आहे.या घटनेत 60 लोक जखमी झाले आहेत, तर 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

 या स्फोटानंतर घटनास्थळी पोहोचलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की, "लाल कॅटेगरी मध्ये मोडणारे अतिधोकादायक युनिट  तातडीने बंद केले जातील. त्यांनी चेंज ऑफ युज करून नॉन हझार्डसमधलं प्रॉडक्शन करावं. जेणेकरून जीवीतहानी होणार नाही. शहरा बाहेरच्या एमआयडीसी मध्ये शिफ्टिंगची मुभा त्यांना दिली जाईल.या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. लोकांच्या जीविताशी तडजोड केली जाणार नाही."

मुख्यमंत्र्यांनी पुढे म्हटलं की, "जे लोक आणखीन अडकले आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सुरु आहे. इथे आजूबाजूला नागरी वसाहत मोठ्या प्रमाणावर आहे. यापूर्वीही इथे स्फोट झाला होता. मी आता या उद्योगांचं वर्गीकरण करायला सांगितलेलं आहे. या कंपनीचं पूर्वीच नाव अंबर होतं सध्या याचं नाव अमुदान असं होतं.

शासनाच्या माध्यमातून अशा प्रकारचे उद्योग सुरक्षितस्थळी हलवले जातील. सगळ्याच एमआयडीसीमध्ये अशा प्रकारच्या उद्योगांची सुरक्षितता बाळगण्यासाठी सूचना दिल्या जातील. उद्योग सचिव आणि मंत्र्यांशी मी बोललो आहे.ज्यांचा या घटनेत मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची मदत दिली जाईल आणि जखमींचा खर्च देखील सरकारतर्फे करण्यात येईल. यासोबतच अमुदान केमिकल्सकडूनही मदत मिळवून देण्याच्या सूचना आम्ही दिल्या आहेत."

डोंबिवलीत झालेल्या या स्फोटामुळे परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या तसेच काही किलोमीटरपर्यंत या स्फोटाची कंपनं जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

स्फोटाच्या काही तासानंतरही घटनास्थळी आगीचे लोळ मोठ्या प्रमाणावर येत होते. या दुर्घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून कंपनीत अडकलेल्याना बाहेर काढण्यासाठी नडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाचे जवान काम करत आहेत.

स्फोट नेमका कसा झाला..?

अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार डोंबिवली एमआयडीसीच्या फेज 2मध्ये असणाऱ्या अमुदान केमिकल कंपनीत दुपारच्या सुमारास मोठा स्फोट झाला.

या स्फोटाचे हादरे तीन ते चार किलोमीटरपर्यंत जाणवल्याची माहिती स्थानिकांनी दिली. हा स्फोट एवढा भीषण होता की यामुळे परिसरातील इमारतींच्या काचा फुटल्या आणि काही गाड्यांचंही नुकसान झाल्याची माहिती आहे

या घटनेनंतर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. गृहमंत्र्यांनी एक्सवर पोस्ट करून लिहिलं की, "डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान केमिकल कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना दु:खद आहे.

8 जण या घटनेत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आले आहे. जखमींच्या उपचाराची व्यवस्था करण्यात आली असून आणखी रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकार्‍यांशी माझी चर्चा झाली असून, तेही 10 मिनिटांत घटनास्थळी पोहोचत आहेत. एनडीआरएफ, टीडीआरएफ, अग्नीशमन दलाच्या चमू पाचारण करण्यात आल्या आहेत. जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो."

ज्यांनी स्फोट पाहिला ते काय म्हणाले..?

स्फोट झालेल्या अमुदान कंपनीच्या बाहेर घुटमळत उभ्या असलेल्या विवेककुमार यांनी बीबीसी मराठीला बोलताना सांगितलं की, "माझा भाऊ राकेशकुमार मागची वीस वर्ष सप्तवर्ण कंपनीत काम करत होता. ही कंपनी स्फोट झालेल्या अमुदान कंपनीच्या मागे आहे. राकेशकुमार हे सकाळी नेहमीप्रमाणे या कंपनीत गेले.

घरी त्यांची मुलं आणि पत्नी आहे. पण स्फोट झाल्यानंतर मी तातडीने इथे आलो. मागचे पाच तास त्यांना आम्ही शोधत आहोत. अजूनपर्यंत काहीही माहिती मिळालेली नाही. राकेशचा फोन वाजतोय. तो जिवंत असेल अशी आशा आहे."

डोंबिवली एमआयडीसीत कंपनी चालवणारे प्रसाद ढवळे म्हणाले की, "कंपनीत सहा जण होते ते सर्व जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागला आहे. हाताला काचा लागल्या आहेत. जसा ब्लास्ट झाला तसं आम्ही बाहेर पळालो. आगीची धगीमुळे थांबलो नाही. हे अरिंदम हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत."

स्फोटात जखमी झालेल्यांवर आजूबाजूच्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत.मंत्री उदय सामंत यांनी डोंबिवली एमआयडीसी येथील दुर्घटनास्थळी भेट देऊन मदतकार्याचा आढावा घेतला. या दुर्घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च सरकारतर्फे करण्यात येणार आहे. या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाईल, अशी माहितीही मंत्री सामंत यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

खासदार श्रीकांत शिंदे हेदेखील घटनास्थळी दाखल झाले. माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, "बॉयलरचा स्फोट झाला आहे. त्यामुळे कंपनीत आग लागली आहे. आम्ही जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो आहोत. जखमींना आम्ही विविध रुग्णालयात दाखल केलं आहे.

48 जण या घटनेत जखमी झाले आहेत. अतिधोकादायक रसायनं तयार करणाऱ्या कंपन्या शहराच्या बाहेर नेल्या जाव्यात अशी मागणी स्थानिकांकडून केली जाते आहे. आम्ही यासंदर्भात पुढच्या आठवड्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याशी आम्ही चर्चा करुन याविषयीचा निर्णय घेऊ. येत्या सहा महिन्यांत इथल्या अतिधोकादायक केमिकल तयार करणाऱ्या कंपन्या शहराबाहेर कशा नेता येतील यावर आम्ही लक्ष केंद्रीत करणार आहोत."

26 मे 2016 ला देखील डोंबिवली एमआयडीसीत झालेल्या भीषण स्फोटात 12 जणांचा मृत्यू झाला होता आणि कोट्यवधी रुपयांचा मालमत्तेचं नुकसान झालं होतं.डोंबिवलीतील स्फोटामुळे मोठ्या शहरांच्या आजूबाजूला असणाऱ्या कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post