प्रेस मीडिया लाईव्ह
निवडणूक अधिकाऱ्यांकडूनच आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी पुण्याच्या एका नागरिकाने मुख्य निवडणूक आयुक्त , नवी दिल्ली यांचेकडे पत्र पाठविले आहे. या संदर्भातील माहिती पुढीलप्रमाणे:-
निवडणुका जाहीर झाल्य की निवडणुकीसाठी उभे असलेले उमेदवार, राजकीय पक्ष यांना आचारसंहितेचे नियम लागू होतात. तसेच निवडणूक आयोगासदेखील काही बंधने आहेत. सध्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुकीचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणा दरम्यान एक महत्त्वाची बाब कर्मचाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणली जात असते. मतदान केंद्रामध्ये किंवा इतरत्र मतदान अधिकाऱ्यांनी निवडणुकीचे काम करताना कोणाचाही प्रचार होईल, अप्रत्यक्षरीत्या संदेश जाईल अशा प्रकारची वागणूक करू नये . याकरिता कोणत्याही पक्षाचा झेंडा, त्याचा रंग, चिन्ह , स्टिकर्स, कोणतेही धर्म, जात, संत, देव किंवा त्यांच्या मुर्त्या किंवा धार्मिक प्रकारचे स्टिकर्सचा वापर करू नये. मतदान केंद्र शाळा, महाविद्यालयांमध्ये असते. तेथे भिंतीवर जरी अशा प्रकारचा मजकूर आढळल्यास तो मजकूर झाकून टाकण्यात यावा. सदर मजकूर वर्तमानपत्राद्वारे झाकला गेल्यास वर्तमानपत्रांमध्ये देखील वरील बाबींचा समावेश असू नये व तो मतदारांना दिसू नये, याची दक्षता घेतली जाते. परंतु सध्या चालू असलेल्या निवडणुकीच्या प्रशिक्षणाच्या कार्यक्रमाच्या वेळेचे चित्र पाहता वेगळे दिसून येते. सहायक निवडणूक आयुक्त, उप निवडणूक आयुक्त, मायक्रोऑब्झर्वर / लघु निरीक्षक यांना शासनामार्फत पुरविल्या गेलेल्या चार चाकी वाहनांवर ऑन इलेक्शन ड्युटीचा बोर्ड लावलेला असतो. या चार चाकी वाहनांच्या ड्रायव्हर समोरील डॅशबोर्डवर वेगवेगळ्या देवतांचे फोटो व मुर्त्या लावलेल्या असतात, त्याचबरोबर काचेवर वेगवेगळ्या धर्माचे संत किंवा त्यांची चिन्हे, शब्द यांची स्टिकर्स लावलेली असतात. यामुळे एक प्रकारे निवडणूक आयोगाचे अधिकारीच आचारसंहितेचा भंग करतात.
पुण्यातील अण्णाभाऊ साठे प्रशिक्षण केंद्र, येरवडा , पुणे, कॉलेज ऑफ इंजीनियरिंग, पुणे, गणेश कला क्रीडा मंदिर, स्वारगेट, पुणे , पिंपरी , चिंचवड व इतर ठिकाणचे सर्वेक्षण केले असता हे निदर्शनास आले आहे. या ठिकाणी निवडणूक आयोगाच्या गाड्यांवर वापरलेल्या स्टिकर्स, मूर्ती, रंगांचे दोरे, स्केच, चित्रे यांचा समावेश असलेल्या गाड्यांचे क्रमांक यांची फोटोसहीत माहिती मुख्य निवडणूक आयुक्त , नवी दिल्ली यांचे कडे पुण्यातील एका नागरिकाने पाठविली आहे. एकूण 71 गाड्यांचे फोटो व नंबर प्लेट क्रमांक यांचा यामध्ये समावेश आहे . या गाड्या वापरणाऱ्या निवडणूक अधिकाऱ्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, त्यांचे कडून खुलासा मागविण्यात यावा किंवा त्यांची या पदावरून बदली करून नवीन पदाधिकारी नेमावेत , तसेच संपूर्ण भारतामध्ये या संदर्भातील सूचना जारी करण्यात याव्यात अशी विनंती निवडणूक आयोगास केली आहे.