(माझे मत) खासदारांकडुन अपेक्षा

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

हातकणंगले  लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवार ता. ७ मे रोजी मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. संसदीय लोकशाही व्यवस्था मजबूत करण्यासाठी सर्वच मतदारांनी आपल्या मताधिकाराचा वापर करावा ही अपेक्षा आहे. आपला हा मतदारसंघ कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील काही तालुक्यांचा बनलेला आहे. अन्य भागापेक्षा काहीसा विकसित असलेल्या या मतदारसंघाचे काही प्रश्न आहेत. पण आपण प्रामुख्याने इचलकरंजीचा विचार केला तर इचलकरंजी या वस्त्रोद्योगनगरीत आता महानगरपालिका झाली आहे. या नगरीतील पिण्याचे पाणी,कचरा व्यवस्थापन, वीज, शहरांतर्गत वाहतूक इत्यादी विषय महत्वाचे आहेत. हे विषय स्थानिक प्रशासन व राज्य सरकार यांनी सोडवणे आवश्यक आहे.पण ते सोडवण्यासाठी महानगरपालिका,राज्य शासन आणि संबंधित शासकीय यंत्रणांवर दबाव टाकून खासदारांनी हे प्रश्न कायमस्वरूपी सोडवले पाहिजेत. आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी संसदेमध्ये आवाज उठवणे, प्रश्नांची नेमकी मांडणी करणे आणि त्याच्या सोडवणुकीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे हे खासदारांचे काम असते. केंद्र सरकारच्या विकासाच्या सर्व योजना आपल्या मतदारसंघात राबवण्यास खासदारानी प्राधान्य दिले पाहिजे. दिल्लीतून पाझरणाऱ्या विकास योजना गल्लीपर्यंत कशा पोहोचतील हे पाहणे खासदारांचे काम आहे.

तसेच वस्त्रोद्योगाचे प्रश्न , शेतीचे प्रश्न, महापुराचे व्यवस्थापन, क्षारपड जमिनीचा प्रश्न, पाण्याच्या प्रश्नावरून निर्माण होणारे तणाव, पंचगंगेचे प्रामाणिक शुद्धीकरण, शहरांतर्गत वाहतूक, पर्यटनदृष्ट्या नियोजन,शहरी व शहरालगतचे रस्ते,औद्योगिक गुंतवणूक,उर्वरित रेल्वे प्रश्न याकडेही लक्ष दिले पाहिजे. इचलकरंजी व परिसरात सामाजिक सौहार्दाच्या आरोग्याचे काही प्रश्न तयार झाले आहेत. अन्न, वस्त्र, निवारा ,शिक्षण आणि आरोग्य या प्रत्येक नागरिकाच्या मूलभूत गरजा असतात .त्याच्या सोडवणूकीला अग्रक्रम केंद्र सरकारच्या माध्यमातून देण्याची भूमिका खासदारांनी घेण्याची गरज आहे.स्थानिक पातळीवर सर्वांगीण विकास होईल त्याकडेही खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून निरनिराळे प्रकल्प आणून रोजगार निर्मितीला चालना देणे याकडेही खासदारांनी लक्ष देण्याची गरज आहे.

खासदारांनी ठरवले तर संपूर्ण मतदारसंघात अतिशय भरीव स्वरूपाचे काम ते करू शकतात. आपल्या मतदारसंघात आपण नेमके कोणते काम केले याबाबतचा अहवाल दरवर्षी खासदारानी लिखित स्वरूपात मांडण्याची नितांत गरज आहे.

 प्रत्येक तालुक्यात महिन्यातील एक दिवस खासदारांनी जनता दरबार भरवून लोकांची गाऱ्हाणी समजून घेतली पाहीजेत.कारण गेल्या काही वर्षात लोकसभा निवडणूकीत खासदारांची भेट होत नाही,खासदार बेपत्ता आहे अशी चर्चा होण्याचे प्रमाण वाढले आहे. खासदारांचा स्थानिक स्वराज्य संस्थेतील लोकप्रतिनिधींशी सातत्यपूर्ण  संवाद असला पाहिजे.लाखो लोकांचा प्रतिनिधी म्हणून खासदार निवडून जात असतात. त्यामुळे संसदीय लोकशाही व्यवस्थेमध्ये एका अर्थाने लाखाचा पोशिंदा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. आघाडी युती आणि पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन खासदारांनी याचे भान बाळगणे गरजेचे आहे. निवडून आलेले खासदार हे त्या संपूर्ण मतदारसंघाचे प्रतिनिधी असतात याचे भान ठेवले पाहिजे.ज्या पक्षाचे उमेदवार म्हणून खासदारांना निवडून दिले जाते त्यांनी पक्ष बदल करून जनतेशी प्रतारणा करू नये. कारण अलीकडे सत्तेच्या राजकरणात पक्ष उभा फुटण्याचे अथवा फोडण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.याचेही भान संसदीय लोकशाहीचे रक्षणकर्ते प्रतिनिधी म्हणून निवडून येणाऱ्या खासदारांनी बाळगले पाहिजे.


प्रसाद माधव कुलकर्णी,इचलकरंजी

Post a Comment

Previous Post Next Post