डॉ. दाभोळकर हत्या निकालाच्या निमित्ताने....

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर यांची २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये हत्या झाली होती.त्या खटल्याचा निकाल अकरा वर्षानंतर शुक्रवार ता.१० मे २०२४ रोजी विशेष न्यायालयाने जाहीर केला. त्यानुसार सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोन आरोपींना जन्मठेप आणि प्रत्येकी पाच लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर डॉ.वीरेंद्रसिंह तावडे , ऍड.संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांना सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्त करण्यात आलेले आहे. विशेष न्यायालयाने दिलेला हा निकाल स्वागतार्ह आहे. पण या खुनशी विचारधारेचे सूत्रधार अज्ञातच राहिले आहेत यात शंका नाही. योग्य आणि परिपूर्ण न्यायासाठीचा कायदेशीर लढा उच्च न्यायालयात पुढे सुरू राहीलही. पण यानिमित्ताने पुन्हा एकदा विवेकवादी चळवळीने आव्हानांची तीव्रता समजून घेऊन एकजुटीने लढा देण्याची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे.


डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या खुनानंतर एक आठवड्याच्या आत मी समाजवादी प्रबोधिनीच्या ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिका मध्ये एक दीर्घ एक लिहिलेला होता . दाभोळकरांच्या पहिल्या मासिक स्मृतिदिनी म्हणजे २० सप्टेंबर २०१३ रोजी श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने त्या दीर्घ लेखाची पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. त्याला कॉ.गोविंद पानसरे यांनी प्रस्तावना लिहिलेली होती. विवेकवादाच्या जागरणासाठी कॉ.पानसरे आणि मी यांनी मिळून अनेक सभाही घेतलेल्या होत्या. पण २० फेब्रुवारी २०१५रोजी कॉ. गोविंद पानसरे व कॉ. उमाताई पानसरे यांच्यावर गोळीबार करण्यात आला. त्यामध्ये कॉ.पानसरे शहीद झाले. कॉ.पानसरे  यांच्या हत्ये पाठोपाठ ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश आणि नामवंत अभ्यासक डॉ. कलबुर्गी यांच्याही हत्या झाल्या. पानसरे यांच्यासह या सर्वांच्या खुन्यानाही लवकरात लवकर शिक्षा झाली पाहिजे.


डॉ.दाभोळकर अंनिसच्या कामाची चतु:सूत्री सांगत असत .१) शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करणे.(२) वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे.(३)कालसुसंगत धर्म चिकित्सा करणे.(४) व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे. याप्रमाणे डॉ दाभोळकर अखेरपर्यंत कार्यरत राहिले. पण वैज्ञानिक दृष्टिकोन मांडणाऱ्यांना, काल सुसंगत धर्मचिकित्सा करणाऱ्यांना, शोषण करणाऱ्या रूढी परंपरांना वांधश्रद्धांना विरोध करणाऱ्यांना शतकानू शतके विरोध होत आलेला आहे. असे विचार मांडणाऱ्या व्यक्तीची हत्या केली की ते विचार थांबतील असे हत्या करणाऱ्या भ्याडांना वाटत आलेले आहे. जे खरे देव आणि धर्म मानतात ते खुनशी विचारधारेचे होऊ शकत नाहीत. कारण देव आणि धर्म असली शिकवण देत नसतो. खुनशी कृती करणारी माणसं फक्त आणि फक्त विकृती शरण असतात असे इतिहास सांगतो. वाईट गोष्ट अशी आहे की धर्म आणि राजकारण यांची सांगड घालून अलीकडे अशा भंपक,विकृत,खुनशी  विकृताना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली जात आहे. भोंदूगिरी आणि विकारग्रस्त असलेल्या या विकृतांना जनतेने वेळेवर ओळखले पाहिजे. नाहीतर ही विषवल्ली फोफावत राहते आणि त्याची मोठी किंमत संपूर्ण समाजाला चुकवावी लागते.


माणसाचा खून करून, त्यांच्या कबरी खोदून ,मूर्तीभंजन करून ,पुतळे फोडून च प्रतिमा जाळून ,विटंबना करून विचार नष्ट करता येत नसतात. उलट अशा हल्ल्यातून त्या विचारधारेच्या अंगीकार करणारी माणसे अधिक सजग, जागरुक होत असतात .परिघावर असलेले पाठीराखे त्यांच्या वर्तुळात प्रवेश करतात. परिणामी हा विचार वाढत जातो हाही इतिहास नजरे कडून नजरेआड करून चालणार नाही. डॉ. दाभोळकर व्यापक असलेल्या प्रबोधन चळवळीतील काही मुद्द्यांवर आग्रही भूमिका मांडत होते. अंधश्रद्धा निर्मूलन , जातीअंत, आंतरजातीय विवाह ,पर्यावरण रक्षण ,वैज्ञानिक दृष्टिकोन आदी मुद्द्यांवर ते हिरीरीने काम करत होते .त्यासाठी त्यांना विवेकवाद महत्त्वाचा वाटत होता .विवेक वाहिनेचे जाळे पसरवून समाजाला पुढे नेता येईल ही त्यांची पक्की धारणा होती. त्यासाठी ते सदैव कार्यरत होते. 


विवेकवाद ही ज्ञानमिमांसेतील एक विचारधारा आहे. सर्वोच्च मानवी ज्ञान केवळ विवेक आणि बुद्धीपासूनच मिळू शकते असे विवेकवाद मानतो. ज्ञान हे निश्चित आणि संशयातीत असले पाहिजे. ही विवेक वादाची भूमिका आहे .एखाद्या बाबीचे आपल्याला ज्ञान असणे आणि त्याबाबतची आपली समजूत असणे यात मोठा फरक असतो. विवेका धिष्टित ज्ञान हे निश्चितपणे सत्य असल्यामुळे स्थिर आणि शाश्वत असते. 

डॉ.दाभोळकर अशा शाश्वत ज्ञानाचे पुरस्कर्ते होते. म्हणून ते देवाला, धर्माला नव्हे तर त्याच्या आधारे केल्या जाणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध करत होते. हे लक्षात घेतले पाहिजे. 


विवेकवादाला प्राचीन असा इतिहास आहे .रूढ अर्थाने प्लेटो हा पहिला विवेकवादी होता .मात्र विवेक वादाची शास्त्रशुद्ध मांडणी सर्वप्रथम आधुनिक पाश्चाता तत्त्वज्ञानाचा प्रणेता मानला जाणाऱ्या रेने देकार्त याने केली. प्रमाणज्ञान अनुभवातून प्राप्त होत नाही हे त्याने अनुभववादी विचार मांडत विवेकवाद नाकारणाऱ्यांना ठणकावून सांगितले. मानवी ज्ञानाचा उगम इंद्रियानुभवातून होतो. इंद्रियानुभवाच्या क्षेत्रा पलीकडे मानवी ज्ञानाचा विस्तार होऊ शकत नाही असे सांगणाऱ्या अनुभववाद्यांना त्यांनी विचारांनी खोडून काढले. रेने देकार्त च्या मते, इंद्रियजन्य प्रत्यक्ष ज्ञान आणि त्यावर लाभणारे ज्ञान संशयग्रस्त असते .म्हणून ते खऱ्याखुऱ्या ज्ञानाच्या पदवीला पोहोचू शकत नाही. यथार्थपणे ज्याला ज्ञान म्हणता येईल असे ज्ञान आपल्याला गणितात उपलब्ध असते.गणिती ज्ञानाची सुरुवात स्वतः प्रमाण असलेल्या विधानांपासून झालेली असते. मराठी संत साहित्यानेही विवेकवादी विचारांचा जागर केलेला आहे. अंधश्रद्धा आणि कर्मकांडांना कठोर विरोध केलेला आहे. ' केले काय तुवा जाऊनिया तिर्था,सर्वथा विषयासी भुललासी! वरी दिसशी शुद्ध, परी अंतरी मलीन, तोवरी हे स्नान व्यर्थ होय ! पासून 'कथा करितो देवाची, अंतरी अशा बहु लोभाची ! तुका म्हणे तोचि वेडा ,त्याचे हाणूनी थोबाड फोडा !! असा शेकडो अभंगातून ओव्यातून जागर संतांनी केलेला आहे.


अगदी सोप्या भाषेमध्ये शहीद भगतसिंग यांनीही विवेकवाद मांडलेला आहे .वयाच्या अवघ्या एकविसाव्या  वर्षी त्यांनी ' मी नास्तिक का आहे ?' हा लेख लिहिला होता. त्यांनी त्यात म्हटले होते ,की माणसाच्या दुबळेपणातून ,मर्यादेतून देवाचे काल्पनिक अस्तित्व निर्माण झाले आहे

 अंधश्रद्धा नेहमीच आपला मेंदू शिथिल करतात आणि प्रतिगामी बनवितात. जगात जर परमेश्वर आहे तर तो लोकांना पाप करण्यापासून परावृत्त का करत नाही ? इंग्रजांना या देशातून जायला प्रवृत्त का करत नाही ? आणि जर तो परमेश्वर ही गतजन्माच्या कायद्याने बांधला गेला असेल तर तो सर्व शक्तिमान नाही. शहीद भगतसिंग यांनी हे सांगूनही आता नव्वद वर्षे झाली आहेत. इतरही अनेकांनी आणि विवेकवादी विचारधारा सातत्याने मांडली आहे आणि आज ही मांडत आहेत.डॉ.दाभोळकर समाज वास्तवाचे, लोकमानसिकतेचे भान ठेवून देवाला-धर्माला विरोध न करता त्या आधारे केल्या जाणाऱ्या शोषणाला, फसवेगिरीला, लबाडीला ,हातचलाखीला, चमत्कारांना, भोंदूगिरीला विरोध करत होते अशा विवेकवादी माणसांचा खून होणे हे चिंताजनक आहे .प्रबोधन चळवळी पुढील ते मोठे आव्हान आहे. त्याचा मुकाबला सामूहिक पातळीवर झाला पाहिजे. त्यासाठी विवेकवादी विचारांचा जागर सातत्याने होत राहिला पाहिजे. 


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post