व्यवस्थेने अशक्त केलेल्यांना सशक्त करण्याचे काम समाजकारणाला करावे लागेल... प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

सांगली  :  व्यवस्थेने अशक्त केलेल्यांना सशक्त करण्याचे काम समाजकारणाला करावे लागेल. समाज म्हणजे केवळ व्यक्तींचा समूह नाही तर समूहात राहणाऱ्या व्यक्तींमध्ये असणाऱ्या संबंधांची व्यवस्था म्हणजे समाज असतो. बदल हा सृष्टीचा नियम आहे.म्हणून व्यवस्था परिवर्तनही अपेक्षित असते. बदलत्या परिस्थितीत समाजकारणाच्या कक्षा रुंदावल्या गेल्या पाहिजेत. समाजकारणातून सर्वोदय होण्यासाठी समाजकार्याला प्रबोधनाची व्यापक जोड द्यावी लागेल. 

राजकारण व अर्थकारणाचे बदलते संदर्भ ध्यानात घेऊन समाजकारणातही नवे मार्ग, नव्या दिशा शोधाव्या लागतील असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते वेरळा विकास संस्था व प्रा.अरुण चव्हाण परिवाराच्या वतीने प्रा. अरुण चव्हाण यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात " समाजकारण काल, आज आणि उद्या " या विषयावर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.मंचावर संस्थेचे अध्यक्ष दिलीप सव्वाशे ,उपाध्यक्ष प्रा.जे.बी.कदम ,सचिव डॉ. जाई कुलकर्णी होते.स्वागत व प्रास्ताविक डॉ. जाई कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी दीप प्रज्वलन करून कालवश प्रा . अरुण चव्हाण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी सह्याद्री -देवराई -अग्रणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून वृक्ष लागवड ,पर्यावरण यासह विविध क्षेत्रात आदर्शवत कार्य करणारे अग्रणी धुळगावचे लोकनियुक्त सरपंच शिवदास भोसले यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 'वेरळा पुरस्कार ' प्रदान करण्यात आला. पाच हजार रुपये व सन्मान चिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार विजेते शिवदास भोसले यांनी आपण सांघिकरीत्या करत असलेल्या प्रेरणादायक कार्याची सविस्तर माहिती दिली.


प्रमुख पाहुणे प्रसाद कुलकर्णी पुढे म्हणाले , कालपर्यंत समाजकार्यात बहुसंख्येने झोकून देणारा मध्यमवर्ग व नवमध्यमवर्ग आज समाजकारणापासून काहीसा अलिप्त झाल्यासारखा दिसतो आहे. त्याचे अग्रक्रम बदलले तो खालच्या वर्गाशी फटकून वागू लागला आहे.आत्मकेंद्रित झालेल्या या वर्गाला पुन्हा समाज केंद्रीत करावे लागेल. काल समाजकारणाचा वाहक असलेला वर्ग आज त्याबाबत उदासीन असणे किंवा विरोधक बनणे हे सुदृढ समाज व्यवस्थेचे लक्षण नाही. मध्यम व नव मध्यमवर्गानेही समाजकारणात कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपला वाढता सहभाग नोंदवला पाहिजे. एकीकडे जात्यांध आणि धर्मांधता जाणीवपूर्वक रुजवली जात असताना भारतीय राज्यघटनेचे सर्वांगीण समतावादी तत्वज्ञान समाजकारणाच्या माध्यमातून सर्व क्षेत्रात रूजवण्याची गरज आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या सविस्तर भाषणामध्ये समाज निर्मितीपासूनच्या समाजकारणापासून आजच्या वर्तमानी व उद्याच्या समाजकारणाच्या दिशेचा अनेक उदाहरणांच्या माध्यमातून उहापोह केला.

या कार्यक्रमास वेरळाचे मानद सचिव अंशुमन कुलकर्णी ,ज्येष्ठ लेखिका प्रा. डॉ .तारा भवाळकर, डॉ.दिलीप कुलकर्णी , क्रांती स्मृतीवनचे संपतराव पवार, तुकाराम मुळीक, प्रा. सुरेश पाटील, संग्राम जाधव ,गजानन साळुंखे ,वसंत पाटील, धोंडी जाधव, विष्णू थोरात ,महेश कराडकर ,ज्योती अदाटे , यू.जी.डफळापुरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष दिलीप सव्वाशे यांनी आभार मानले.संजीवनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post