प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागाकडून रेल्वे स्थानकांवर आणि गाड्यांमध्ये अनधिकृत विक्री करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी धडक कारवाई करण्यात आली असून रेल्वेने अनधिकृत ५६० विक्रेत्यांवर कारवाई केली.तसेच एक हजार ९४५ विनापरवाना पॅकेज केलेल्या पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या.
या मोहिमे दरम्यान ५६० अनधिकृत विक्रेत्यांना पकडण्यात आले असून, त्यापैकी ३५१ विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांच्याकडून सामूहिक दंड म्हणून ३ लाख १७ हजार ४२५ रुपये वसूल करण्यात आले.अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध रेल्वे प्रशासनाकडून पंधरा दिवसांपूर्वी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे.
पुणे विभागातील पुणे, दौंड, मिरज, सातारा, अहमदनगर, कोपरगाव, बेलापूर इत्यादी प्रमुख स्थानके आणि प्रवासी गाड्यांमध्येही ही मोहीम राबविण्यात आली. अनधिकृत विक्रेते शिजवलेले अन्न, अनधिकृत ब्रँडचे पॅकेज केलेले पिण्याचे पाणी, अस्वच्छपणे पॅक केलेले स्नॅक्स तसेच गाडीमध्ये आणि प्लॅटफॉर्मवर तसेच परिसरात चहा, कॉफीची विक्री करताना आढळले. या मोहिमेदरम्यान एकूण ५६० अनधिकृत विक्रेते पकडण्यात आले असून, त्यापैकी ३५१ विक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच विनापरवाना पॅकेज केलेल्या पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. ही कारवाई विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आणि वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त यांच्या नेतृत्वाखाली सहायक वाणिज्य व्यवस्थापक, सहायक सुरक्षा आयुक्त, खानपान निरीक्षक आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची टीम तयार करून विशेष मोहीम राबविण्यात आली.