प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे, दि. १६: आषाढी वारी पालखी सोहळ्यासाठी पाणी, स्वच्छता, वाहतूक व्यवस्था, रस्ते, रस्ता सुरक्षा, आरोग्य सुविधा आदी सर्व सोयी सुविधा योग्य पद्धतीने उपलब्ध करून देण्यासह सुरक्षित आणि हरित पालखी सोहळ्यासाठी सर्व यंत्रणांनी आतापासून सूक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज संस्थान आणि संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान पालखी सोहळ्याबाबत पूर्वतयारी आढावा बैठक डॉ. दिवसे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम आदी उपस्थित होते.
यंदा वेळेवर पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला असल्याचे सांगून डॉ. दिवसे म्हणाले, पावसाची स्थिती लक्षात घेऊन आवश्यक सुविधा करण्यात याव्यात. पावसाळा लक्षात घेता स्वच्छता आणि आरोग्याचा परस्पर संबंध असल्याने तात्पुरत्या शौचालयाच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे. स्वच्छतेच्या नियोजनासाठी स्वतंत्र नियंत्रण अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी.
पालखी सोहळा जगातील सर्वात शिस्तबद्ध असणारा सोहळा आहे. आपण अशा सोहळ्याचे भागीदार आहोत या भावनेने सोहळ्यासाठी आपले योगदान द्यावे. पालखीला टँकरने पाणीपुरवठा होणाऱ्या सर्व स्रोतांची तपासणी करावी. आवश्यक ती निर्जंतुकीकरणाची औषधे, दवाखान्यांमध्ये औषधे उपलब्ध ठेवावीत. पाणीपुरवठ्याचे टँकर आणि शौचालयांच्या संख्येत वाढ कण्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. पालखीच्या रस्त्यावर कोठे अतिक्रमणे असल्यास ती तात्काळ काढून टाकण्यात यावीत. आपत्कालीन व्यवस्थेसाठी नगरपालिकेकडील लायटिंग टॉवरचा उपयोग पालखी दरम्यान करण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
आरोग्य आणि स्वच्छतेशी संबंधित कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन याबाबत आदर्श कार्यपद्धती तयार करावी. वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी. शहरातील स्वच्छता आणि आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्यात यावी. त्यासाठी शहरातील तज्ज्ञ डॉक्टरांची बैठक घेऊन त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आलेल्या नियोजनाची यावेळी सादरीकरणाद्वारे माहिती देण्यात आली. स्वच्छता, पिण्याचे शुद्ध पाणी, तात्पुरते शौचालय, आरोग्य तपासणी, पालखी तळाचे सपाटीकरण, इंधन आणि वीज पुरवठा, शोषखड्डे, तात्पुरता निवारा केंद्र, आरोग्य किट आदींची माहिती यावेळी देण्यात आली.
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार ५००, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी १ हजार आणि संत सोपान महाराज पालखी सोहळ्यासाठी २०० शौचालयांची व्यवस्था करण्यात येणार आहे. १४० रुग्णवाहिका आणि ५७ रुग्णवाहिका पथक, ११२ वैद्यकीय अधिकारी, ३३६ आरोग्य अधिकारी नियुक्त करण्यात येणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी २०० टँकरची व्यवस्था करण्यात येणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी महानगरपालिका, संबंधित उपविभागीय अधिकारी, मुख्याधिकारी, गटविकास अधिकारी यांच्यासह भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, अन्न व औषध प्रशासन, महावितरण आदी विभागांकडून पूर्वतयारीचा आढावा घेतला.
बैठकीस श्री संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान, श्री संत तुकाराम महाराज देवस्थान, श्री संत सोपानदेव महाराज देवस्थान, श्री संत चांगावटेश्वर महाराज देवस्थान, श्री निळोबाराय देवस्थान पदाधिकारी, संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, आरोग्य विभाग, पोलीस, अग्निशमन विभाग, पशुसंवर्धन विभाग, परिवहन विभाग, राज्य मार्ग परिवहन महामंडळ आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.