प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ. तुषार निकाळजे
पुणे:- नुकत्याच झालेल्या निवडणुकांमधील मतदान प्रक्रियेमध्ये एका नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेने ॲम्बुलन्सद्वारे प्रवास करून 32 किलोमीटर अंतरावरील मतदान केंद्रावर मतदान केल्याची घटना निदर्शनास आली आहे. या महिलेने केलेल्या या कृतीबद्दल बोलण्याचा किंवा लिहिण्याचा हेतू नाही हि कृती निश्चित प्रशंसनीय आहे.
परंतु ही कृती घडवून आणणाऱ्या निवडणूक आयोगाचा व निवडणूक अधिकाऱ्यांचा निषेध करणे आवश्यक आहे. चाकण ते पुणे हे 32 किलोमीटरचे अंतर किमान एक तास अद्ययावत ॲम्बुलन्स प्रवास करून मतदान केंद्रावर मतदान केले व त्यानंतर या महिलेस प्रसुतीकरिता दवाखान्यात दाखल करण्यात आले. याबाबतचा प्रशासकीय आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक आयुक्त यांनी उप- जिल्हाधिकारी तथा उप- जिल्हानिवडणूक आयुक्त यांना दिला. उपजिल्हाधिकारी असलेल्या महिला अधिकाऱ्याने याबाबत प्रशासकीय व वैद्यकीय व्यवस्था करून चाकण येथून पुणे येथे या नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेस मतदान केंद्रावर आणून मतदान करण्यास सहकार्य केले. ही निवडणूक आयोगाची प्रशासकीय बाब कौतुकास्पद आहे का?
अशा प्रकरणांमध्ये किमान पुढील दोन पर्याय आहेत. याकरिता राज्य निवडणूक आयुक्त किंवा मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली यांच्याकडे तात्काळ किंवा अधिक तात्काळ या पर्यायांची मागणी केल्यास मान्यते संदर्भात कळविले गेले असते अथवा जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतःचे विशेष अधिकार वापरून या पर्यायाचा अवलंब केला असता तर त्यांचे निश्चितच आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक झाले असते. परंतु पुढील दोन पर्यायांचा या निवडणूक अधिकाऱ्यांनी विचार का केला नाही? सर्वात सोपा पर्याय:- टेंडर वोटिंग करिता वापरली जाणारी मतपत्रिका व समकक्ष कार्यपद्धतीचा वापर येथे करता आला असता. पुण्यातील मतदान अधिकाऱ्यांनी एक निवडणूक आयोगाचे चार चाकी गाडी घेऊन चाकण येथे जाणे, जाताना एक पोलीस अधिकारी, दोन मतदान अधिकारी, उमेदवारांचे दोन मतदान प्रतिनिधी व फॉर्म क्रमांक 17 बी व सी , मतदाराच्या स्वाक्षरीची यादीची प्रत, एक शासकीय टेंडर वोट सिलिंग पाकीट, डिंक, पितळी मोहोर, बाणफुलीचा रबरी शिक्का, बंद पाकिटावर सील करण्यासाठी वापरण्यात येणारी लाख इत्यादी आवश्यक साहित्य घेऊन जाणे. चाकण येथील या गर्भवती महिलेच्या घराजवळील शाळेमध्ये किंवा ग्रामपंचायत कार्यालय किंवा शासकीय कार्यालय येथील एक खोली मतदान केंद्र म्हणून वापरणे. या महिलेस उमेदवारांची यादी असलेल्या छापील मतपत्रिकेवर ( टेंडर वोटिंग स्लिप ) बानुफुलीचा शिक्का करून सदर मतपत्रिका त्या महिलेकडूनच व्यवस्थितरित्या घडी करून शासकीय पाकिटामध्ये टाकून घेणे. त्या पाकिटावर त्या महिलेकडूनच डिंक लावून चिकटवून घेणे, चिकटवलेल्या ठिकाणी त्या महिलेची स्वाक्षरी घेणे( आवश्यकता असल्यास), तसेच मतदारांची स्वाक्षरी असलेल्या यादीवर या गर्भवती महिलेच्या नावापुढे त्या महिलेची स्वाक्षरी अथवा अंगठा घेणे, हे स्वाक्षरी असलेल्या पुस्तक व सील केलेल्या मतपत्रिकेचे (टेंडर वोट सील पाकीट )नंतर मतदान अधिकाऱ्यांनी मोहोर बंद करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या लाख सिलाद्वारे सील करणे व त्यावर पितळी मोहर उमटविणे. या पाकिटावर शाई पेन किंवा स्केच पेनने पुण्यातील मतदान केंद्राचा क्रमांक टाकणे, याची नोंद फॉर्म सतरा सी मधील अनुक्रमांक 8 व 9 मध्ये करणे व हे सील बंद केलेले मतपत्रिकेचे पाकीट त्या मतदान अधिकार्यांनी चाकण येथून घेऊन पुण्यातील संबंधित मतदान केंद्रावर जमा करणे. यामुळे या गर्भवती महिलेस चाकण ते पुणे हा 32 किलोमीटर अंतराचा प्रवास टाळता येणे शक्य झाले असते परंतु निवडणूक आयोगाने तसे केले नाही.
पर्याय क्रमांक दोन:- पुण्याहून मूळ मतदार संघातील मतदान साहित्य, वोटिंग मशीन, कागदपत्रे इत्यादी घेऊन चाकण येथे मतदान केंद्र स्थापन करणे व तेथे या महिलेचे वोटिंग घेणे. भारतामध्ये दुर्गम ठिकाणी मतदान साहित्यासहित मतदान केंद्र स्थापन केली जातात. गुजरात मधील गीर येथील एका पर्वतावर मतदार असलेल्या एका साधूसाठी मतदान केंद्रासाठी लागणारे साहित्य, व्हीव्हीपॅट, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन, मतदान अधिकारी, कागदपत्रे हा सर्व प्रशासकीय समूह मतदान केंद्र स्थापन करून त्यांचे मतदान घेत असतात. आसाम सारख्या ठिकाणी जंगल, नद्या ओलांडण्यासाठी हत्तीच्या पाठीवर मतदान अधिकारी बसतात, तसेच त्या हत्तीच्या पाठीवर मतदान साहित्य बांधून मतदारांपर्यंत पोहोचतात. जगातील सर्वात उंच असलेल्या हिमाचल प्रदेशातील तेशीगांग या 4650 मिटर उंचीवर असलेल्या बर्फाळ मतदानाकरिता मतदान केंद्र स्थापित होत असते व मतदान प्रक्रिया होत असते. ब्रह्मपुत्रा नदी जवळील पालसबरी या खेडेगावात मतदान साहित्य आणण्यासाठी बैलगाडीचा वापर अद्यापही होत आहे. या गावांमध्ये मतदान केंद्र स्थापित केले जाते व मतदारांना मतदान प्रक्रियेत सामावून घेतले जाते. असे सर्व इतर पर्याय असताना पुण्यातील जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी यांनी चाकण ते पुणे 32 किलोमीटर अंतर एका गर्भवती महिलेस मतदानाकरिता आणणे किती योग्य? भारतीय प्रशासन सेवेमध्ये समाविष्ट असलेल्या या दोन सनदी अधिकाऱ्यांना यूपीएससी परीक्षेच्या वेळी महिला व बालकल्याण हा विषय शासनाने अभ्यासक्रमात ठेवला होता किंवा नाही? असा प्रश्न उपस्थित होतो आणि जर हा विषय अभ्यासक्रमात असेल तर या दोन सनदी अधिकाऱ्यांनी याचा अभ्यासच केला नाही का? दुर्दैवाची गोष्ट अशी की या प्रशासकीय कामकाजात उपजिल्हाधिकारी महिला होत्या. वरील घटनेची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयुक्त, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आली आहे. यासंदर्भात चौकशी करण्याची विनंती करण्यात आली आहे.