सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात सापडला अमली पदार्थ


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात अमली पदार्थ सापडल्याचा खळबळजनक प्रकार दिनांक १४ मे रोजी उघडकीस आला  असताना  देखील पुणे विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे. या घटनेला १० दिवस होऊन गेले  तरी याबाबत काहीच  हालचाल विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या  मुलांचे वसतिगृह  क्रमांक ८ मध्ये सुमारे ७५० ग्रॅम गांजा  सापडला होता. यावर विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता प्रकरण दडपले असल्याचा आरोप विविध विद्यार्थी संघटनांनी केला आहे. त्यानंतर आता विद्यार्थी संघटनांच्या मागणीनंतर विद्यापीठ प्रशासनाने चौकशी समिती स्थापन करून या प्रकरणाची योग्य ती चौकशी करण्याचे आश्वासन दिले आहे.

या संदर्भात युवासेनेने निवेदन प्रसिद्ध करून येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, भारतीय युवक काँग्रेसचे  शिष्टमंडळ कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांची भेट घेऊन दोषींवर कारवाईची मागणी करणार आहे.

युवासेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शहरप्रमुख राम थरकुडे म्हणाले, ''कल्याणीनगर अपघाताच्या घटनेनंतर शहरातील पबवर कारवाई करण्यात आली. तरुणांनी व्यसनाला बळी पडू नये, यासाठी पुन्हा एकदा विविध संघटनांनी पब संस्कृतीवर आवाज उठवला. कल्याणीनगर अपघाताचे हे प्रकरण ताजे असतानाच आता विद्यापीठाच्या वसतिगृहातही अशी घटना घडणे लज्जास्पद आहे. ड्रग्जच्या घटनेनंतरही कारवाई होत नसल्याने विद्यापीठाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे.''

विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना माहिती देऊन अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या गैरप्रकारांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना मदत करावी. तसेच, विद्यापीठ परिसरात तसेच संलग्न महाविद्यालयांमध्ये अमली पदार्थांचा प्रवेश होणार नाही, यासाठी सतर्क राहावे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास विद्यापीठात झाला पाहिजे. तसेच, विद्यार्थी भरकटणार नाहीत, याची काळजी घेणेही तितकेच गरजेचे आहे. त्यानुसार विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्यांचे वय आणि शिक्षण लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन करावे. तसेच विद्यार्थी अमली पदार्थांकडे वळणार नाहीत, यासाठी विद्यापीठाने जनजागृती मोहीम राबवावी. येत्या दोन दिवसांत विद्यापीठाने याप्रकरणी कारवाई न केल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन राम थरकुडे यांनी विद्यापीठाचे कुलगुरू आणि कुलसचिव यांना दिले आहे


Post a Comment

Previous Post Next Post