प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यांच्याविरुद्ध पुण्यातील एका नागरिकाने फसवणुकीची याचिका दाखल करण्याची राज्यपाल तथा कुलपती महाराष्ट्र राज्य यांच्याकडे परवानगी मागितली आहे . सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये वर्ष 2023 मध्ये अनियमित रॅप सॉंग प्रकरण घडले होते. या संदर्भात महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक श्री. जयंत उमराणीकर यांची चौकशी समिती नेमली होती. चौकशी समितीने विद्यापीठातील काही प्रशासकीय व सुरक्षा अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची शिफारस केली होती. सदर अहवाल मा. कुलपती तथा राज्यपाल यांच्याकडे विद्यापीठामार्फत पाठवण्यात आला होता. मा. राज्यपाल तथा कुलपती यांनी दोषींवर कारवाई करण्याचे लेखी पत्र कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना पाठविले होते.
परंतु सात महिने उलटूनही कारवाई न झाल्याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाने विद्यापीठाशी पत्र व्यवहार केला. या पत्रव्यवहारास कोणतेही उत्तर न दिल्याने या नागरिकाने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी उपोषण केले. त्यावेळी विद्यापीठाने या संदर्भात चर्चेसाठी उपोषण करणाऱ्या नागरिकास बोलाविले. चर्चेच्या वेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे उपस्थित होते. त्यांनी उपोषणकर्त्यास सांगितले, "कुलगुरू यासंदर्भात अधिकार मंडळापुढे सदर प्रस्ताव ठेवून पुढील कार्यवाही व कारवाई करतील". परंतु आज तीन महिने उलटूनही अनियमित रॅप सॉंग प्रकरणासंदर्भात विद्यापीठातील दोषी प्रशासकीय व सुरक्षा अधिकारी, कर्मचारी यांचेवर कारवाई केली गेलेले नाही. उपोषण करणाऱ्या या नागरिकाने ही एक प्रकारे फसवणूकच आहे असे मा. राज्यपाल यांना सादर केलेल्या निवेदनामध्ये म्हटले आहे. मा. राज्यपालांच्या आदेशाचे पालन न करणे हा एक प्रकारचा अवमान आहे.