प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : राज्यात आणि देशात आत्तापर्यंत झालेल्या तीनही टप्प्यावरील मतदानामधून जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपबद्दल रोष असल्याचे चित्र आहे. मोदी पुन्हा सत्तेवर आल्यानंतर देशाचे संविधान बदलतील, त्यामुळे जनतेत मोदी व भाजप विरोधी लाट आहे, असे मत नागपूर लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार विकास ठाकरे यांनी व्यक्त केले.
पुणे लोकसभा मतदार संघातील काँग्रेस महाविकास आघाडी, इंडिया आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ काँग्रेस भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ठाकरे बोलत होते. यावेळी उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, सोशालिस्ट पक्षाचे डॉ. अभिजीत वैद्य, पुणे लोकसभा प्रचार प्रमुख माजी आमदार मोहन जोशी, राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी उपस्थित होते.
विकास ठाकरे म्हणाले, आरएसएस चे मुख्यालय विदर्भात असल्याने त्यांचा सर्व कारभार नागपूरमधून चालतो. याच विदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप विरोधी लाट आहे. मोदी सरकारने हुकुमशाही पद्धतीने काम केले. त्यांचे नेते संविधान बदलण्याची भाषा करत आहेत. मोदी पुन्हा सत्तेवर आले तर देश लुटून टाकतील व संविधान संपवतील, या भितीने लोकांमध्ये मोदी विरोधी लाट आहे. ‘चंदा दो धंदा दो’, म्हणत निवडणुक रोख्यांच्या माध्यमातून मोदी व भाजपने माया गोळा केली. या माध्यमातून लूट केली. त्यामुळे आतापर्यंतच्या तीनही टप्प्यात झालेल्या मतदानात नागरिकांनी मोदी व भाजपला नाकारल्याचे चित्र आहे. मी मत मागणार नाही, असे म्हणणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपूरात गल्लोगल्ली मते मागत फिरत होते. पुण्यातही मोदी सरकारच्या विरोधात लाट आहे. जनतेमध्ये मोठा उत्साह आहे. त्यामुळे पुण्यात महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वासही ठाकरे यांनी व्यक्त केला.
अरविंद शिंदे
अध्यक्ष
पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी
९८२२०२०००५