गुंडाळलेला पुणे सिटी स्मार्ट प्रकल्प आम्ही मार्गी लावू........ रवींद्र धंगेकर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे दिनांक ६.... केंद्र सरकारने गुंडाळलेला पुणे स्मार्ट सिटी प्रकल्प आम्ही मार्गी लावू आणि पुणेकरांना आशा लावण्यात आलेल्या प्रकल्पाची पूर्तता करू अशी ग्वाही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिली आहे

यासंदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात धंगेकर यांनी म्हटले आहे की स्मार्ट सिटी प्रकल्पाचा बराच गाजावाजा केला गेला. त्यामुळे पुणेकर काही प्रमाणात हुरळून गेले होते. पण प्रत्यक्षात मात्र पुणेकरांच्या पदरी घोर निराशाच आली आहे. हा प्रकल्प संपूर्ण पुणे शहरासाठी नव्हता तर शहरातला केवळ एक छोटा भाग विकसित करण्याचा प्रकल्प होता हे सुद्धा पुणेकरांना उशिराने कळाले.

 यासाठी पुण्यातला बाणेर बालेवाडी चा कोपरा जो आधीच विकसित आहे तो निवडला गेला आणि तेथेही या प्रकल्पाच्या कामाची पूर्तता झाली नाही. वास्तविक यूपीए सरकारच्या काळात जवाहरलाल नेहरू अर्बन रिन्यूअल मिशन ही योजना राबवली गेली. त्यातून शहराच्या विकासाला 50 टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जात होता.   अत्यंत उपयुक्त अशी ही योजना बंद करण्यासाठीच केंद्रातील भाजप सरकारने स्मार्ट सिटी योजना पुढे आणली आणि जे एन एन यू आर एम ही योजना बंद पाडली. त्यामुळे पुण्याला केंद्राकडून मिळणारा प्रत्येक प्रकल्पाच्या 50% निधी मिळू शकला नाही. 

स्मार्ट सिटी हे केवळ एक गाजर होते हे नागरिकांच्या लक्षात आले. आता ही योजना केंद्र सरकारने अधिकृतपणे मुदत संपल्याचे कारण देऊन बंद केली आहे. त्यामुळे पुणेकरांचे स्मार्ट सिटी चे स्वप्न अधुरेच राहिले आहे. नागरिकांची झालेली ही घोर फसवणूक आहे. तथापि आपण खासदार म्हणून निवडून आल्यानंतर पुन्हा जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्यूअल मिशन  स्वरूपाची योजना सुरू करण्याचा आग्रह केंद्राकडे धरू आणि पुण्याला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणू असा दावाही धंगेकर यांनी यावेळी केला. केंद्र सरकारने पुण्यात नदी सुधार योजना गाजावाजा करून हाती घेतली त्या योजनेलाही अजून पर्यंत वाटाण्याच्या अक्षताच लावण्यात आल्या आहेत. समान पाणीपुरवठा योजनेचा बोजवाराही अशाच पद्धतीने उडाला आहे. आज पुणे शहरातील अनेक उपनगरे पाणीटंचाई ने त्रस्त आहेत. नागरिकांच्या या सगळ्या घोर समस्यांना काँग्रेसचे सरकार उत्तर देऊ शकते त्यामुळे काँग्रेसला विजयी करा आणि अर्धवट विकास कामे पूर्णत्वाकडे न्या असे आवाहन धंगेकर यांनी केले आहे.

अरविंद शिंदे अध्यक्ष 

पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post