देशात भाजपची स्थिती वाईट ः डॉ. शशी थरूर

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे ः देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या विरोधात नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पहिल्या दोन टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणूकीत दक्षिण भारतातून भाजपला एकाही जागेवर विजय मिळताना दिसत नाही. तर, हिंदी भाषिक राज्यामध्ये भाजपचा मतदार हा कमी प्रमाणात घराबाहेर पडल्याचे चित्र आहे. त्यामुळे, देशभरात भाजपसाठी वाईट परिस्थिती असून, त्यांचे सरकार जाणार असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे, असे मत काँग्रेसचे खासदार डॉ. शशी थरूर यांनी व्यक्त केले.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ डॉ. शशी थरूर यांचा ’युवा संवाद कार्यक्रम’ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र काँग्रेसचे सहप्रभारी आशिष दुवा, प्रवक्त्या प्रगती आहिर, माजी आमदार उल्हास पवार, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अ‍ॅड. अभय छाजेड, माजी नगरसेवक sanjay बालगुडे, गोपाळ तिवारी, गौरव बोराडे आदी यावेळी उपस्थित होते.

डॉ. थरूर म्हणाले, भाजपला दोन वेळा संधी दिल्यानंतर मतदार त्यांना पुन्हा संधी देण्यास तयार नाहीत. ’अच्छे दिन’च्या नावाखाली मते मिळवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेमध्ये आले. त्यांनी जीएसटी आणि नोटबंदी आणली आणि अनेक लघुउद्योग व्यापार्‍यांना त्यांचे व्यवसाय बंद करावे लागले. त्यानंतरही सर्व स्तरातून नागरिक नाराज असल्यामुळे पुलवामा हल्ला आणि बालाकोटचा हल्ला हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे आणला. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा पुढे करून, रोजगार, महागाई, विकास या मुद्यांना बगल देत निवडणूका लढवल्या गेल्या.

शेतकर्‍याचे उत्पन्न दुप्पट करू म्हणत असतानाच, दहा टक्क्यांनी देखील शेतकर्‍याचे उत्पन्न वाढलेले नाही. सकल राष्ट्रीय उत्पादन देखील तेरा टक्क्यांवरून दहा टक्क्यांवर आले आहे. देशाची 80 टक्के अर्थव्यवस्था ही फक्त 20 टक्के लोकांच्या नियंत्रणात आहे. देशाच्या सुरक्षिततेबद्दल सांगत असताना आज चीनच्या अतिक्रमणाबद्दल शब्ददेखील बोलला जात नाही. भारत-चीन सीमारेषेवरील 65 ठिकाणांपैकी 26 ठिकाणी चीनचे सैनिक शस्त्र घेऊन थांबले आहेत. त्याठिकाणी असणार्‍या सैनिकांना गस्त घालता येत नसल्याचे सांगत, मोदी सरकारच्या विविध धोरणांवर डॉ. थरूर यांनी टिका केली.

डॉ. थरूर पुढे म्हणाले, देशाचा जमा होणार्‍या जीएसटीमधील 60 टक्के जीएसटी गरीब जनतेकडून जमा होत आहे. श्रीमंत नागरिकांपेक्षा गरिब जनता मोठ्या प्रमाणात जीएसटी भरत आहे. देशात धार्मिक तेढ निर्माण केला जात?असून, गंभीर गुन्ह्यातील आरोपी हे मोकाट फिरत?आहेत. शिक्षा भोगणार्‍या आणि कारागृहात असलेल्या आरोपींपेक्षा मोकाट फिरणारे आरोपी हे धोकादायक आहेत.  महिलासुरक्षेबद्दल सरकार असंवेदनशील आहे. काँग्रेसच्या जाहिरनाम्यामध्ये नसलेल्या गोष्टी वारंवार बोलून नागरिकांना भरकटवले जात असल्याचा आरोपदेखील डॉ. थरूर यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन संग्राम खोपडे यांनी केले. तर, अक्षय जैन यांनी आभार मानले.

------------

चौकट

स्किल इंडीयाचे प्रशिक्षण घेतलेले बेरोजगार

देशामध्ये मोठ्या प्रमाणात स्किल इंडीयाचा गवगवा करण्यात आला होता. मात्र, स्किल इंडियाच्या माध्मयातून ज्यांनी प्रशिक्षण घेतले, त्यांपैकी फक्त 25 टक्के प्रशिक्षार्थींनाच नोकर्‍या उपलब्ध झाल्या आहेत. तर, 75 टक्के लोकांना अद्याप नोकर्‍याच मिळालेल्या नाहीत. महाराष्ट्रातदेखील नोकर्‍यांची परिस्थितीदेखील आज तशीच असल्याचे डॉ. थरूर यांनी अधोरेखीत केले.

--------------

माध्यमांच्या स्वातंत्र्यावर घाला ः डॉ. थरूर

देशातील अनेक माध्यमे ही व्यावसायिकांच्या हातात गेलेली आहेत. याच व्यावसायिकांची वर्तमानपत्रे आणि वृत्तवाहिन्या आहेत. त्यांमध्ये सरकारच्या विरोधात बातम्या आल्याच, तर त्यांच्या मालकांवर व्यावसायिक दबाव टाकून त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतल्याचे प्रकार घडत आहेत. काँग्रेसच्या काळामध्ये देशातील माध्यमे ही सरकारवर सडकूर टिका करत होती. मात्र, अशाप्रकारे कोणालाही संपर्क साधून माध्यमांचे स्वातंत्र्य काँग्रेसने हिरावून घेतले नाही. येत्या काळामध्ये माध्यमांना त्यांचे पूर्ण स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून केला जाणार असल्याचेदेखील डॉ. थरूर यांनी अधोरेखित केले.


Post a Comment

Previous Post Next Post