प्रेस मीडिया लाईव्ह :
समोरच्या पक्षातील मंडळी किती भ्रष्ट आणि खोटारडी आहेत, हे सांगण्यामध्ये राजकीय नेत्यांना स्वारस्य अधिक आहे राज्यातील राजकारणात गेल्या २ वर्षांत अनेक राजकीय भूकंप झाले कधीकाळी एखाद्यावर विश्वास टाकून खासगीत सांगितलेल्या गोष्टी आज प्रचारसभांतून चव्हाट्यावर मांडल्या जात आहेत. सत्तेत आल्यावर 'आम्ही नागरिकांसाठी हे करू ते करू , हे सांगण्यापेक्षा समोरच्या पक्षातील मंडळी किती भ्रष्ट आणि खोटारडी आहेत, हे सांगण्यामध्ये राजकीय नेत्यांना स्वारस्य अधिक आहे. सर्वच पक्षांच्या सभांमध्ये आज हेच चित्र आहे. एकाने टीका केली; म्हणून त्याला उत्तर देण्यासाठी समोरील पक्षाचा नेताही तितकीच जोरदार टीका करत आहे.
जो नेता गेल्या लोकसभा निवडणुकीत एका पक्षाचा प्रचार करत होता, तोच नेता यंदा जाहीर सभांतून त्याच पक्षाचे वाभाडे काढतांना दिसत आहे. अशा पक्षबदलू मंडळींच्या जुन्या ध्वनीचित्रफिती निवडणुकांच्या काळातच सामाजिक माध्यमांतून प्रसारित केल्या गेल्याने त्या पहाणार्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. सामान्य जनतेला निवडणुकांच्या माध्यमातून देशाला योग्य नेतृत्व द्यायचे आहे आणि आपल्या प्रभागाची काळजी घेणारा, लोकांच्या हाकेला धावून येणारा, प्रभागातील जनतेची कामे करणारा, त्यांच्या समस्या सोडवून विकास घडवून आणणारा, तसेच मतदान क्षेत्राशी कृतज्ञतेने वागणारा खासदार निवडायचा आहे. जनता सूज्ञ असल्याने ती योग्य उमेदवार निवडून आणेल; मात्र सध्याच्या राजकीय सभांतून केल्या जाणार्या टीकाटिपणीशी, आरोप-प्रत्यारोपांशी सामान्य जनतेला काहीच देणे-घेणे नाही, हेच खरे !