सुहास सामंत यांनी कामगारांना लुटणे आणि BEST ला लुटणे या पलीकडे काहीही केलेलं नसून, उबाठा गटाने १७ वर्षांपासून बेस्टच्या कर्मचाऱ्यांना फसवण्याचे काम केले आहे. परंतु महायुतीच्या काळात १० महिन्यांच्या संघर्षानंतर बेस्ट कर्मचाऱ्यांच्या हिताचे ८ निर्णय घेण्यात आले!
-आमदार प्रसाद लाड (अध्यक्ष, श्रमिक उत्कर्ष सभा)
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, १६ मे: मुंबईत लोकल ट्रेननंतर, बेस्ट सर्व्हिसला दुसरी लाइफलाइन म्हणून ओळखले जाते. परंतु बेस्टच्या विद्युत विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होते. प्रामुख्याने बेस्टच्या विद्युत विभागातील कामगार, मागील १७ वर्षांपासून कायमस्वरूपी स्थितीची मागणी करत संघर्ष करत होते. यासाठी बेस्टच्या वीज पुरवठा विभागातील ७२५ कंत्राटी कामगारांनी ऑक्टोबर २०२३ मध्ये आझाद मैदानावर उपोषण देखील केले होते. श्रमिक उत्कर्ष सभेशी संलग्न असलेल्या बेस्टच्या दि इलेक्ट्रिक युनियनचे अध्यक्ष आमदार प्रसाद लाड यांनी त्यावेळी ताबडतोब कामगारांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या समजून घेत, त्यांचे उपोषण सोडवले होते. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून त्यांनी हा विषय मार्गी लावला होता, याबाबत त्यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून माहिती दिली.
मागील कित्येक वर्षांपासून बेस्ट आणि महापालिकेत उद्धव ठाकरे गट आणि इतर संघटना कार्यरत असताना, मराठी कामगार वर्गाला कुठल्याही प्रकारची मदत करण्याच्या बाबतीत सहकार्य झाले नव्हते. ही सर्व मुले कामगारांची मुले असून, १७ वर्षांपासून त्यांनी असंख्य वेळा आंदोलन केले. यामध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांना अनेक वेळा आश्वासन दिले होते. परंतु श्रमिक उत्कर्ष सभेच्या माध्यमातून अध्यक्ष प्रसाद लाड यांनी आझाद मैदानावर कामगारांना दिलेला शब्द पाळला असून, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून ५९३ कामगारांना सेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यात आले आहे. या अगोदर नोव्हेंबर २०२३ मध्ये १२३ कामगारांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देवून सेवेत सामावून घेण्यात आले होते.
ब्रिटीश काळापासून कार्यरत असलेली बेस्ट परिवहन विभागातील सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट ही सर्वात मोठी सेवा मानली जाते. या कामगारांची मागील ७ ते ८ वर्षांपासून असलेली प्रलंबित देणी, जी कुठल्याही संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आली नव्हती, ती देणी देण्याचे काम यामाध्यमातून करण्यात आले आहे.
या कामगारांपैकी ९० टक्के कर्मचारी मराठी आहेत. बेस्ट इनिशिएटिव्हच्या सेवानिवृत्त कामगारांच्या मुलांना सेवेत सामावून घेण्याऐवजी कंत्राटी कामगार म्हणून नियुक्त केले गेले होते. यामुळे ते कायमस्वरूपी दर्जा देण्याच्या मागणीसाठी १७ वर्षांपासून संघर्ष करत आहेत. या कामगारांची बाजू जाणून घेतल्यानंतर आमदार प्रसाद लाड यांनी संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेतली. यानंतर महापालिका आयुक्त आणि जीएम यांनी प्रसाद लाड यांच्या पुढाकाराने आणि श्रमिक उत्कर्षसभेच्या माध्यमातून ५९३ बेस्टच्या कंत्राटी कामगारांना बेस्ट उपक्रमाच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे.
कामगारांच्या कोविड भत्त्यासाठी ७८ कोटी मंजूर करण्यात आले, निवृत्त कामगारांची सर्व देणी देण्याचा निर्णय घेण्यात आला, १० वर्षांच्या अंतराने कर्मचारी आणि अधिकारी यांना ३ कालबद्ध पदोन्नती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचप्रमाणे नियमित पदोन्नत्या चालू केल्या आहेत, अभिलेखकांचा व सहाय्यक प्रशासकीय अधिकारी परीक्षार्थींचा प्रलंबित प्रश्न मार्गी लावला आहे. अंतर्गत पदविकाधारक / पदवीधारक अभियंत्यांची पदे भरण्यास मंजूरी देण्यात आली आहे.
या अनुषंगाने श्रमिक उत्कर्ष सभा, बेस्ट परिवहन विभाग व द इलेक्ट्रिक युनियनच्या माध्यमातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानण्यात आले आहेत. बेस्टच्या वसाहतींचा म्हाडाच्या माध्यमातून पुनर्विकास करण्यात यावा यातून बेस्ट कामगारांना घरे द्यावीत, बेस्ट डेपो विकसित करावे यासह अन्य विषयावर यावेळी आमदार भाष्य केले. त्याचप्रमाणे सुहास सामंत यांची सत्ता असतांना, त्यांनी बेस्टच्या ७०० कामगारांना सेवेत कायमस्वरूपी सामावून का घेतले नाही? असा सवाल देखील आमदार लाड यांनी उपस्थित केला आहे.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्याईवर उद्धव ठाकरे किती वर्ष जगणार आहेत? त्यांनी मराठी माणसासाठी नेमकं काय केलं आहे? ते तरी सांगावं! मागील १७ वर्षांपासून बेस्टचे कामगार उद्धव ठाकरे यांचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु कामगार बांधवांकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नव्हता! त्यामुळे त्यांनी स्वतःच कर्तृत्व सिद्ध करावं! अशा भावना श्रमिक उत्कर्ष सभा या कामगार संघटनेकडून व्यक्त करण्यात आल्या आहेत.