उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी'
प्रसाद लाड असे कोणाला म्हणाले ?
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई, ८ मे : काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फरक नाही. उद्धव ठाकरे देखील आपल्याच विचारधारेचे आहेत. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी, नेहरु यांच्या विचाराचे आहोत. यामुळे येणाऱ्या काळात लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत शरद पवार यांनी हे मत व्यक्त केले आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटासह उबाठा गट देखील काँग्रेसमध्ये विलीन होणार का? अशा चर्चा आता सुरु झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड यांनी एक्सवर (पूर्वीचे ट्वीटर) ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे गटाला काही प्रश्न विचारले असून, 'उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी' अशी अवस्था उद्धव ठाकरे गटाची झाली असल्याचे म्हटले आहे.
यावेळी आमदार लाड म्हणाले की, "स्वातंत्र्यवीर सावरकरांना विरोध करणाऱ्या कॉंग्रेसला धरले! माझ्या तमाम हिंदू बांधवांनो ... म्हणणे सोडले! कॉंग्रेसच्या म्हणण्यानुसार लांगूलचालन सुरु केले! उबाठा गट आता कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का?
उद्धव ठाकरे यांची गत 'उंदीर गेला लुटी आणल्या दोन मुठी' (अर्थ-प्रत्येक मनुष्य आपल्या क्षमतेनुसार काम करतो) अशी झालीय!
शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार समान विचारधारेचा छोटा प्रादेशिक पक्ष उबाठा गट पण कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? कॉंग्रेस सरकारच्या काळात देशावर झालेले विविध हल्ले, विधानसभा विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी २६/११ च्या हल्ल्याबद्दल केलेला देश विरोधी दावा आणि कॉंग्रेसचा राम मंदिराला असलेला विरोध!, हे सर्व उद्धव ठाकरेंना मान्य आहे का? अशा काँग्रेसी विचारधारेला भाजपचा कायमच विरोध असेल!, परंतु उद्धव ठाकरेंना हे सर्व मान्य आहे का?" असा प्रश्न आमदार प्रसाद लाड यांनी उपस्थित केला आहे.
महायुतीचे समन्वयक आमदार लाड यांनी उबाठा गटाला हे प्रश्न विचारले असून, शरद पवार यांच्या म्हणण्यानुसार समान विचारधारेचे पक्ष अथवा उद्धव ठाकरे गट यांचा उबाठा गट देखील कॉंग्रेसमध्ये विलीन होणार का? हे येणारा काळच ठरवेल!
https://x.com/prasadladind/status/1788075774836187515?s=46&t=fj_rF6JrfDk48u2uStHf1g