प्रेस मीडिया लाईव्ह :
2024 च्या निवडणुकीत बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये भाजपाला मोठा फटका बसेल. बिहार आणि महाराष्ट्रात चांगली चाललेली सरकारे उलथवणे ह्यामुळे रोष असेल. दिल्लीत केजरीवाल अटकेत असल्याने भाजपचे नुकसान नक्की होणार. राजस्थानात वसुंधरा मुद्दाम काही जागा पाडायला मदत करेल. कर्नाटकात सत्ताबदल आणि रेवन्ना प्रकरण भाजपाला अजून नुकसान करणार. थोडक्यात, जिथे जिथे गेल्या निवडणुकीत यांनी सरसकट जागा जिंकल्या होत्या त्या राज्यात यांचे लीड घसरणार.
आता राहिले सगळ्यात मोठे राज्य - उत्तर प्रदेश! तर जो जो भाजपचा नेता दोन वेळा मुख्यमंत्री झाला त्याला केंद्रातल्या जोडगोळीने पायात पाय घालून पाडले आहे, कारण तो नेता त्यांच्यासाठी स्पर्धक आहे ... शिवराज सिंग, रमण सिंग, पर्रीकर, वसुंधराराजे अशी मोठी यादी आहे. योगी आदित्यनाथ आधीच भक्तांच्या गळ्यातला ताईत आहे, त्यामुळे जोडगोळी त्याचा टांगा कधीही पलटी करू शकते... हे योगीला माहीत आहे त्यामुळे तो जोडगोळीला सत्तेत येवू देणार नाही. थोडक्यात, उत्तर प्रदेशातही नुकसान!
आता हे सार्वत्रिक नुकसान होत असताना फक्त भाजपचा आकडा 400 पार सोडा, बहुमताचे 272 ओलांडेल नाही हेही अशक्य दिसतेय. वाजपेयी आणि मनमोहन सिंग या दोघांच्या विजयाच्या 4 निवडणुका (1998, 1999, 2004, 2009) यामध्ये लोकांनी पहिल्या निवडणुकीपेक्षा जास्त मते देत दुसऱ्या निवडणुकीत वाजपेयी आणि सिंग यांना सत्तेत आणले, आणि त्याच्या पुढच्या निवडणुकीत सपशेल आदळले. मोदी याच पॅटर्नने 2014 पेक्षा 2019 मध्ये जास्त मते घेवून सत्तेत आले. आणि आता anti-incumbency जोरात आहे.
आता जर 272 पेक्षा 10 जागा जरी भाजपला कमी मिळाल्या आणि NDA आघाडीला जरी बहुमत असेल तर जोडगोळीला बाकीचे सहकारी पक्ष केराच्या टोपलीत टाकून देतील. भाजपचे आताचे सहकारी हे ED, CBI, IT वगैरेना घाबरून सोबत आहेत कारण एकट्या भाजपचे 303 खासदार आहेत. उद्या तो भाजपचा आकडा 272 च्या खाली गेला तर तोच सहकारी पक्ष जोडगोळीला पाठिंबा देवून, सत्तेत आणून स्वतः भीतीच्या छायेत कशाला राहील? त्यापेक्षा तो सहकारी पक्ष जोडगोळी सोडून इतर कुणी भाजपचा पंतप्रधान होत असेल तर पाठिंबा देईल. पण तसा नेता भाजपमध्ये गडकरी वगळता कुणी नाही. त्यावेळी संघ काय करेल यावर बऱ्याच गोष्टी ठरतील.
अजुन एक शक्यता त्यातून निर्माण होते ती अशी की अशावेळी जेव्हा निव्वळ भाजप 272 पासून लांब असेल तेव्हा NDA आघाडी फुटून काही मोठे पक्ष इंडिया आघाडीसोबत येवून सरकार बनवू शकतात. नितीशकुमार, चंद्राबाबू नायडू, कुमारस्वामी, आठवले वगैरे लोक रात्रीत इंडिया आघाडीसोबत येवू शकतात... जे तिकडे जाऊ शकतात, ते इकडेही येवू शकतात. शरद पवार आणि लालूप्रसाद यादव हे दोन नेते इथे मोठी भूमिका बजावू शकतात. तुम्हाला जर ही शक्यता दूरची वाटत असेल तर शिवसेनेचे उदाहरण समोर आहे ज्यांनी 2019 ला सोबत निवडणूक लढली आणि नंतर बाजू बदलली. राजकारणात सगळे शक्य आहे!
येते वर्ष-दीडवर्ष प्रचंड उलथापालथीचे असणार आहे... गुजराल-देवेगौडा किंवा 1998-99 मधल्या सलग दोन वर्ष लोकसभा निवडणूका... असे काहीसे पाहायला मिळाले तरी आश्चर्य वाटून घेवू नका!