प्रेस मीडिया लाईव्ह :
आधुनिकीकरणाच्या नव्या संकल्पनेत करोडो लोकांचा ' स्क्रीन टाईम ' मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. तसेच सतत व्यस्त असल्याच्या,कामाचा ताण असल्याच्या,दमून जात असल्याच्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. मात्र या तक्रारीना आपण स्वतः जबाबदार किती ? याचा विचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. 'डेटा दीड जीबी आणि सारा गाव बीझी 'ही नवी म्हण आता समाज जीवनात रूढ झाली आहे.परिणामी इंटरनेटचा अतिवापर होतो आहे. तो कामापेक्षा बिन कामाचा जास्त होत आहे .मोबाईलवर गेम खेळणे ,रील्स पाहणे, मालिका पाहणे यामध्ये दिवसातील तासनतास वाया घालवले जात आहेत. यात अबाल-वृद्ध -स्त्री-पुरुष अशा साऱ्यांचा समावेश आहे.आपल्या कुटुंबातील माणसांकडे दुर्लक्ष करून मोबाईल वरील आभासी जीवनात स्वतःला व्यस्त ठेवणे हे गंभीर मानसिक अनारोग्याचे लक्षण आहे. स्वतःकडे पाहण्याऐवजी दुसऱ्याच्यात डोकावणे हा प्रकार वाढत आहे. मोबाईलच्या अतिवापरामुळे एकाकीपणा आणि चिडचिडेपणा यामध्ये कमालीची वाढ होत आहे. डोळ्यांसह आरोग्याच्या अनेज तक्रारी निर्माण होत आहेत. व्यायामासाठी वेळ नाही म्हणणारे अनेकजण दिवसातील पाच-सहा तास मोबाईलवरील बिनकामी कामात सहजपणे मग्न असतात हे वास्तव आहे. जीबी संपवण्यालाच बिझी म्हणत राहणे शहाणपणाचे नाही. तर ते आपणच आपल्या पायावर कुऱ्हाड मारून घेणे आहे.
दररोज करोडो मानवी तास कौटुंबिक-सामाजिक संवादा ऐवजी, श्रमा ऐवजी, संपत्ती निर्मिती ऐवजी एकाकीपणा ओढवून घेण्यात, आणि माणूस म्हणून खिळखिळे होण्यात खर्च होत असतील तर हे अतिशय उग्र स्वरूपाचे राष्ट्रीय संकट आहे.या साऱ्यातून मोठे प्रश्न निर्माण होत आहेत असे तज्ञ सांगत आहेत. मोबाईलचे व्यसन हा एक वाढता गंभीर आजार बनून घराघरात शिरला आहे. तो प्रत्येकाच्या हातात हात घालतो आहे.मानसोपचार तज्ञांकडे येणाऱ्या रुग्णात स्क्रीनवर अधिक वेळ घालवणाऱ्याचे प्रमाण अतिशय वाढलेले आहे. तेव्हा प्रत्येकाने या गोष्टीचा अधिक गांभीर्याने विचार केला पाहिजे. दिवसभरातील आपला वेळ नेमका कुठे खर्च होतो ?त्यातून निष्पन्न काय होते ? आपण खरंच अति श्रमाने त्रस्त आहोत का ? आपण खरे श्रम किती करतो ?आणि श्रमपरिहार म्हणून विरंगुळा मिळवण्यासाठी मोबाईलवर किती तास असतो याचा विचार करण्याची गरज आहे. कारण हा धोका व्यक्ती ,कुटुंब आणि समाज असा टप्प्याटप्प्याने ग्रासत चालला आहे.आणि एकाकीपणा, चिडचिडेपणा , दुराभाव निर्माण करणारा आहे. मोबाईलच्या अती व्यासानापायी आपण कशाचे मोल देत आहोत ? याचा प्रत्येकाने साकल्याने विचार करण्याची गरज आहे.