प्रबोधिनीच्या चर्चासत्रातील मत
प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१४ संसदीय लोकशाही निवडणूक व्यवस्थेत राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्याना मोठे महत्त्व आहे. कारण आम्हाला सत्ता मिळाल्यावर कोणती धोरणे राबवायची आहेत, कोणती उद्दिष्टे गाठायची आहेत, याबाबतचे ते जाहीर निवेदन असते.या जाहीरनाम्यातून पक्षाची, युतीची,आघाडीची सैद्धांतिक बैठकही दिसत असते.मात्र अलीकडे राजकीय पक्षांच्या उक्ती आणि कृतीमध्ये जो प्रचंड फरक पडला आहे त्यामुळे जाहीरनामा ही बाब प्रचार साधनातील शेवटचा मुद्दा बनला आहे. नाही म्हणायला सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत जाहीरनाम्यावर थोडीफार चर्चा होऊ लागली आहे ही त्यातल्या त्यात चांगली बाब आहे. या जाहीरनाम्यांचे दर सहा महिन्यांनी सामाजिक परीक्षण होण्याची नितांत गरज आहे ,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले. समाजवादी प्रबोधिनीचा ४७ वा वर्धापन दिन आणि सुरू असलेली अठरावी लोकसभा निवडणूक याचे औचित्य साधून 'जाहीरनाम्याचे महत्त्व 'या विषयावर हे चर्चासत्र आयोजित केले होते.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी, शशांक बावचकर, राहुल खंजिरे, दयानंद लिपारे, अशोक केसरकर, शकील मुल्ला, पांडूरंग पिसे, रामभाऊ ठीकणे,सचिन पाटोळे, मनोहर जोशी आदींनी सहभाग घेतला.
या चर्चासत्रातून असे मत पुढे आले की सत्तेवर आलेल्यांनी आपला जाहीरनामा काटेकोरपणा अमलात आणण्यासाठी पावले उचलायला हवीत.त्यांना पाठिंबा देणाऱ्या इतर पक्षांनीही आपापले जाहीरनामे अमलात आणण्यासाठी दबाव आणला पाहिजे. तसेच विरोधी पक्षाने आपापल्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्द्यांवर संघर्ष केला पाहिजे. आंदोलने केली पाहिजेत. तरच या निवडणूक पूर्व जाहीरनाम्याना काहीतरी न्याय मिळेल.अन्यथा या जाहीरनाम्यामध्ये भारतभूला नंदनवन करण्याची ताकद आहे. ती जाहीरनाम्याच्या कलमांमध्ये बंदिस्त न ठेवता तिला कृतिशीलतेची जोड दिली तरच लोकमताला जागल्यासारखे होणार आहे. सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक ,शिक्षण ,कृषी ,आरोग्य आदी विविध क्षेत्रात जे भयावह प्रश्न निर्माण झाले आहेत त्यांची सोडवणूक जाहीरनाम्याच्या आधारे कशा पद्धतीने केली जाणार याची खुली चर्चा जनतेतही होत राहण्याची गरज आहे. निवडणुका जवळ आल्या की जाहीरनामा काढला ,संपल्या की जाहीरनामा गुंडाळला ही बेफिकीर वृत्ती लोकशाहीला अतिशय घातक आहे .भारतीय राज्यघटनेचा सरनामा हा भारतीय जनतेचा मुख्य जाहीरनामा आहे.त्या दिशेने वाटचालीसाठी जी उपकलमे आवश्यक असतात ती राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात असतात.त्यामुळे आपण लोकांनी त्याचे महत्त्व जाणून गांभीर्याने त्याकडे पाहिले पाहिजे.आणि राजकीय पक्षांना तसे भाग पाडले पाहिजे. तसेच निवडणूक आयोगाची ही जाहीरनाम्यांकरडी नजर असण्याची गरज आहे. या चर्चासत्रात या निवडणुकीसाठी निरनिराळ्या पक्षाने जे जाहीरनामे जाहीर केले त्याची संदर्भासह चर्चा करण्यात आली.यावेळी अन्वर पटेल, शहाजी धस्ते, अशोक मगदूम, पाटलोबा पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.