प्रेस मीडिया लाईव्ह :
आजच्या इंटरनेट ,मोबाईलच्या काळात एकमेकांना पञे पाठवून खुशाली विचारण्याची, मनमोकळा संवाद साधण्याची गोष्ट काहीशी मागे पडली असली तरी ती कायमची नामशेष झालेली नाही. याला वस्ञनगरीतील सामाजिक कार्यकर्ते मोहन चौगुले यांनी देशातील विविध क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना १९८४ पासून नियमित पञे पाठवून त्या छंदातून संपर्क कायम ठेवण्याबरोबरच आपुलकी , जिव्हाळा अन् प्रेमाच्या नात्याचा संवाद सुरु ठेवून आपल्या अनोख्या छंदाचे वेगळेपण जपले आहे.विशेष म्हणजे केवळ तेच अनेकांना नियमित पञे पाठवतात ,असे नाही तर त्या पञांना संबंधित व्यक्ती किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून त्यांना उत्तरे दाखल पञेही येतात.अशी अनेक पञे त्यांनी आजतागायत जपून ठेवून त्याचा संग्रह केला आहे.त्यांनी आजतागायत तब्बल ९ हजार पञे लिहून ती पाठवली आहेत ,तर त्यांना उत्तरेदाखल ६ हजार पञे आली आहेत.
त्यांच्याकडे संग्रही असलेल्या पञांमध्ये विनोदी शैलीचे लेखन करणारे नामवंत साहित्यिक, हरहुन्नरी कलाकार पु. ल. देशपांडे, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज अर्थात वि. वि. शिरवाडकर, कवयित्री इंदिरा संत, कवी मंगेश पाडगांवकर, कवयित्री शांता शेळके, लेखक व्यंकटेश माडगुळकर, प्रसिद्ध गायिका भारतरत्न लता मंगेशकर, शत्रुघ्न सिन्हा, अभिनेत्री जया बच्चन, सुपरस्टार अमिताभ बच्चन, अमेरिकेचे माजी अध्यक्ष बिल क्लिंटन, माजी अध्यक्ष जॉर्ज बुश, सवेरा ग्रुपचे शिल्पकार खास. मोरेश्वर सावे, डाॅ.विकास आमटे ,अंतराळवीर सुनिता विल्यमस्, टेनिसपटू स्टेफी ग्राफ, थोर शास्त्रज्ञ भारतरत्न यु.आर.राव, माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, एअर मार्शल अरुप राहा, प्रसिद्ध अमेरिकन डॉ. चित्तरंजन राणावत अशा अनेक व्यक्तींच्या पञांचा समावेश आहे.वरकरणी पञ पाठवणे ही साधी गोष्ट वाटत असली तरी त्यातून विश्वासाने नातेसंबंध जोडून ते अधिक टिकवून ठेवणे हे जगण्याची गोडी वाढवणारी आहे.इंटरनेट , मोबाईलच्या जमान्यात जगात काही क्षणात कुणालाही कधीही मेसेज पाठवणे खूप सोपे झाले आहे.पण , धकाधकीच्या जीवनात तेही आता खूप अवघड बनत चालले आहे.त्यामुळे एकमेकांना पञे पाठवून एकमेकांची खुशाली जाणून घेणं ,हे तर फारच क्षुल्लक अन् कमी महत्त्वाचे मानले जाण्याची मानसिकता समाजाची बनत चालली आहे.एकंदरीत , इंटरनेट व मोबाईलच्या जमान्यात जग खूप जवळ आले असली तरी माणसं एकमेकांपासून दुरावत चालली आहेत ,हे भयानक वास्तव कुणीही नाकारु शकत नाही.अशा बेभरवशाच्या काळात मोहन चौगुले यांनी पञ लेखनाचा छंद जोपासून नाती जपण्याची सुरु ठेवलेली प्रामाणिक धडपड ही निश्चितच कौतुकास्पद अन्चांगला माणूस बनून जगण्याची खरी मजा लुटता येण्यासाठी निश्चितच अनुकरणीय ठरली आहे.त्यांनी पञाच्या माध्यमातून अनेक मान्यवरांशी जोडलेले नाते तितकेच आत्मीयतेने जपत जगण्याची खरी श्रीमंती काय असते ,हेच सर्वांना दाखवून दिले आहे.तसेच त्यांनी धार्मिक, सामाजिक कार्यात सातत्याने सहभागी होत , गरजूंना मदतीचा हात देत जपलेली सामाजिक बांधिलकी ही त्यांच्यातील सेवाभावी वृत्तीची खरीखुरी प्रचिती आणून देणारी ठरली आहे.त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांना नुकताच पणजी येथे महाराष्ट्र जर्नालिस्ट फौंडेशनच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री ॲड.रमाकांत खलप यांच्या हस्ते पञ भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी जेष्ठ साहित्यिक पद्मश्री विनायक खेडकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.त्यांच्या या पुरस्काराने पञाच्या माध्यमातून नाती जपणा-या एका सच्चा माणसाचा उचित गौरव झाला ,असे म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही.सामाजिक कार्यकर्ते व भगवान महावीर धर्मादाय दवाखान्याचे संचालक मोहन चौगुले यांचे समाजाच्या भल्यासाठी सुरु असलेले सेवाभावी कार्य हे निश्चितच समाज विकासात योगदान देत सेवाभावी वृत्तीने माणुसकीचा खराखुरा धर्म जोपासणारे ठरले आहे.त्यांना मिळालेल्या पञ लेखन पुरस्काराबद्दल त्यांचे मनापासून अभिनंदन व त्यांच्या पुढील वाटचालीस खूप सा-या शुभेच्छा !