पद्मभूषण काझी नजरूल इस्लाम यांचा १२५ जन्मदिन


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com

थोर स्वातंत्र्य सेनानी ,क्रांतिकारक बंगाली कवी, काझी नजरुल इस्लाम यांचा शनिवार ता. २५ मे २०२४ रोजी १२५ वा जन्मदिन आहे.बंगाली मुस्लिम कुटुंबात २५ मे १८९९ रोजी जन्मलेले काझी नजरूल इस्लाम ढाका येथे २९ ऑगस्ट १९७६ रोजी कालवश झाले. त्यांचा जन्म पश्चिम बंगालमधील बर्दवान जिल्ह्यातील चुरीलिया  या गावात वडील काझी फकीर आणि आई जाहेदा खातून या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांना दोन भाऊ व एक बहीण होती.त्यांचे वडील स्थानिक मशिदीचे इमाम होते. नजरूल यांचे दहावीपर्यंत शिक्षण झाले होते. पण पुढे शिकणे शक्य नसल्याने त्यांना शाळा सोडावी लागली.१९०८ साली वडिलांचे निधन झाल्याने त्यांना लहान वयातच उदरनिर्वाहासाठी काम करावे लागले. याच काळात ते एका नाट्यसंस्थेशी जोडले गेले. तेथे त्यांनी कविता व नाट्य लेखन केले. कवी, लेखक,पत्रकार ,संगीतकार ,अनुवादक, गायक , वादक,अभिनेता, चित्रपट दिग्दर्शक अशी विविध अंगाने त्यांची ओळख होती.


 महात्मा गांधींच्या असहकार चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता . स्वातंत्र्य आंदोलनात त्यांना अनेकदा कारावासही भोगला.बंगालमध्ये सर्वप्रथम कामगार व किसान संघटना त्यांनी तयार केली. हिंदू मुस्लिम ऐक्याचा त्यांनी हिरीरीने पुरस्कार केला. फाळणीला प्रखर विरोध केला. शंभर वर्षांपूर्वी म्हणजे २५ एप्रिल १९२४ साली  त्यांनी एका बंगाली ब्राह्मण मुलीशी तिला इस्लामची दीक्षा न देता केलेला विवाह त्या काळात बराच गाजला. दोन्ही धर्मीयांचा त्यांना प्रखर विरोध झाला पण त्यांनी त्या विरोधाला भिक घातली नाही. ही महिला म्हणजे ब्राह्मो समाजाच्या सदस्या अशालता सोनगुप्ता (प्रमिला देवी )होत. या दाम्पत्याला झालेल्या मुलांची नावे हिंदू मुस्लिम अशी संमिश्र ठेवली कृष्ण मोहम्मद , अरींदम खालिद, काझी सव्यसाची ,काझी अनिरुद्ध अशी ही नावे होती. काझी नजरूल इस्लाम सातत्याने आपल्या सदसदविवेक बुद्धीवर विश्वास ठेवून कार्यरत राहिले. धार्मिक मूलतत्त्ववादाचा त्यांनी सतत तीव्र धिक्कार केला.


लहान वयातच त्यांनी बंगाली, अरबी, फारसी या भाषा आत्मसात केल्या होत्या. तसेच ते नेहमी कवी, लेखकांच्या गोतावळ्यात रमत. आणि स्वतः लेखनही करत.पहिले महायुद्ध सुरू झाले तेव्हा ते सैन्यात भरती झाले. ब्रिटिशांना अद्दल घडवण्यासाठी शस्त्रास्त्राचे प्रशिक्षण आपल्याला उपयोगी पडेल ही त्यांची त्यामागील भूमिका होती.नोकरी निमित्ताने त्यांनी कराची आणि मेसोपेटीमिया येथे काम केले. कराची मध्ये त्यांच्यावर बोलशेविक क्रांतीच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला. दोन वर्षे सैन्यात काम केल्यावर ते १९१९ साली बंगालमध्ये मूळ गावी परतले. 


भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात त्यांनी झोकून दिले .भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्यत्व त्यांनी स्वीकारले. याच दरम्यान त्यांनी गद्य व पद्य लेखन  अतिशय मोठ्या प्रमाणात केले.त्यांच्या कवितेतून जनतेमध्ये स्वदेशाविषयीचे प्रेम आणि ब्रिटिश सत्तेविरुद्धचा असंतोष व्यापक प्रमाणामध्ये दिसून येई. त्यामुळे त्यांना विद्रोही कवी असेही म्हटले जात असे. त्यांची कविता सर्वसामान्यांच्या सुखदुःखाशी आपुलकी दर्शवते  त्याच पद्धतीने ती दाहक आणि निर्भयही आहे. त्यांना शास्त्रीय संगीताची सखोल माहिती होती. आवाजही उत्तम होता. अनेक वाद्ये ते उत्तम पद्धतीने वाजवत असत.नजरूल यांनी हजारो गाणे लिहिली. त्यात पाचशेहून अधिक हिंदू भक्ती गीते लिहिली.ती सर्व गाणी ' नजरूल गीती ' नावाने ओळखली जातात. एचएमव्ही कंपनीने त्यांच्या अनेक रेकॉर्ड प्रसिद्ध केल्या.क्रांती ,स्वातंत्र्य ,मानवतावाद, साम्यवाद, न्याय ,स्त्री हक्क, धर्मनिरपेक्षता, सामाजिक सौहार्द हे त्यांच्या लेखनाचे प्रमुख विषय होते. त्यांनी बालसाहित्यही मोठ्या प्रमाणात लिहिले.


नजरुल यांनी कथा ,कविता, कादंबरी, नाटक, निबंध अशा सर्व प्रकारांमध्ये लेखन केले. त्यांची पंचवीसहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. त्यांच्या पुस्तकांचे विविध भाषात अनुवादही झाले. ' नवयुग ' आणि ' धूमकेतू ' या नियतकालिकांचे त्यांनी संपादनही केले. या नियतकालिकातून त्यांनी ब्रिटिश साम्राज्यशाहीवर प्रचंड कोरडे ओढले. या लेखनाबद्दलही त्यांना तुरुंगवास भोगाव लागला. तेथेही त्यांनी कैद्यांच्या परिस्थितीत सुधारणा झाली पाहिजे व त्यांच्या न्याय्य हक्काचे संरक्षण झाले पाहिजे या मागणीसाठी चाळीस दिवसांचे उपोषण केले होते.ब्रिटिश सरकारने त्यांच्या विविध स्वरूपाच्या लेखनावर बंदी घातलेली होती. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी १९२३ आपले ' बसंता ' हे नाटक नजरूल यांना अर्पण केले होते. त्यावर टागोरांचे आभार मानण्यासाठी नजरुल यांनी एक कविताही लिहिलेली होती. रवींद्र टागोर यांच्या' गोरा 'कादंबरी वरील चित्रपटाचे संगीत दिग्दर्शन नजरूल यांनी केले होते.


वयाच्या ४३  व्या वर्षी म्हणजे १९४२ मध्ये त्यांना गंभीर आजार झाला.या आजारामध्ये त्यांचा आवाज पूर्णतः गेला. अखेर पर्यंतचा तीन दशकांहून अधिक काळ त्यांना पूर्णतः मौनात घालवावा लागला. तसेच त्यांची स्मरणशक्ती ही कमालीची कमजोर झाली.रांची येथील रुग्णालयात अनेक वर्षे त्यांच्यावर उपचार करण्यात आले. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना लंडन, व्हिएन्ना येथेही उपचारासाठी नेले मात्र काही उपयोग झाला नाही. १९७२ साली बांगलादेशच्या निमंत्रणावरून त्यांचे कुटुंबीय त्यांना बांगलादेशला घेऊन गेले. तेथे बांगलादेशने त्यांना ' 'राष्ट्रीय कवी' म्हणून सन्मान बहाल केला.चार वर्षानंतर बांगलादेशातच त्यांचे निधन झाले. ढाका विद्यापीठाच्या परिसरात त्यांचे दफन करण्यात आले. त्यांचे दफन भारतात व्हावे अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यावेळी केली व तशी मागणी आजही केली जाते.त्यांना भारत आणि बांगलादेश सरकारने अनेक पुरस्कार दिले. अनेक संस्थांनी त्यांना मानद डॉक्टरेट दिली. दोन्ही देशात त्यांच्या नावाने विविध विद्यापीठात अध्यासने आहेत. त्यांचे नाव अनेक नाट्यगृहांना, ग्रंथालयांना ,चित्रपटगृहांना ,संस्थांना देण्यात आलेले आहे. त्यांच्या नावाने अनेक संस्था उभ्या राहिल्या.'नजरूल सेना' ही बांगलादेशमध्ये शिक्षणासाठी काम करणारी एक मोठी संस्था आहे.भारत ,पाकिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही  देशांनी त्यांच्यावर टपाल तिकीट काढले.भारत सरकारने १९६० साली त्यांना' पद्मभूषण 'देऊन सन्मानित केले होते. अशा या महान क्रांतिकारक ,कवी आणि प्रगल्भ व्यक्तित्वाला त्यांच्या १२५ व्या जन्मदिनी विनम्र अभिवादन...!



(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post