प्रेस मीडिया लाईव्ह :
हेरले प्रतिनिधी / संदीप कोले
हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे सुरू असलेल्या पंचकल्याणक प्रतिष्ठा महा महोत्सवात परमपूज्य आचार्य १०८ श्री विशुद्ध सागरजी महाराज यांच्या पावन हस्ते २१४ मुलांच्यावर मौजी बंधन संस्कार करण्यात आले.
श्री १००८भगवान चंद्रप्रभ मानस्तंभ द्विद्वादश वर्षपुर्ती निमित्त एवं नवनिर्मित श्रीमद्देवाधिदेव १००८ भगवान मुनिस्रुव्रतनाथ तिर्थंकर जिनबिंब पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवात तिसऱ्या दिवशी परमपूज्य १०८ विशुद्ध सागरजी महाराज स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या हस्ते व युवा प्रतिष्ठा रत्नाकर पंडित सम्मेद अजित उपाध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली २१४ मुलांच्यावर धार्मिक विधीपूर्वक मौजी बंधनाचे संस्कार करण्यात आले. यानंतर मौजी बंधनाचे संस्कार झालेल्या मुलांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली.
यावेळी परमपूज्य आचार्य श्री विशुद्ध सागरजी महाराज म्हणाले. जैन धर्मात मुलांच्या वरती करण्यात येणारे मौजी बंधन संस्कार हे अत्यंत महत्त्वाचे आहे. या माध्यमातून मुलांच्या वरती विधी पूर्वक संस्कार केले जातात. हे संस्कार भावी पिढीसाठी अविस्मरणीय आहे. म्हणूनच लहानपणी धार्मिक संस्कार होणे तितकेच महत्त्वाचे आहे.
या वेळी सकाळी धर्मानुरागी देवेंद्र भाऊ चौगुले परिवाराने व बाबुराव जिन्नाप्पा तेरदाळे परिवाराने सायंकाळी हत्तीवरून मिरवणुकीने सभामंडपात जल कुंभ आणला. सकाळी मंदिरात व मंडपात जिनबिंबाचा पंचामृत अभिषेक शांतीधारा नित्य पूजा विधि व सायंकाळी परमपूज्य महाराजांचे मंगलमय प्रवचन झाले. तद नंतर अनेक श्रावक व श्रविकांच्या उपस्थितीत संगीतमय वातावरणात ५६ राजांचा भगवंतांना नजराणा अर्पण करण्यात आला. सायंकाळी संगीतमय आरती होऊन धार्मिक सोहळ्याची सांगता झाली. कार्यक्रमास पंचक्रोशी सह महाराष्ट्र व कर्नाटकातून मोठ्या संख्येने श्रावक व श्रविका उपस्थित होते.