पुन्हा वादळ येतंय, या जिल्ह्यात वाहणार ताशी 40 किमी वेगाने वारे; हवामान खात्याचा इशारा



प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

 दोन दिवसांपूर्वी मुंबई आणि आसपासच्या भागात धुळीचं वादळ येऊन गेलं. या वादळावेळी मुंबईत दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. वादळ काही वेळात थांबले, मात्र फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून या वादळाची चर्चा अद्यापही काही थांबण्याचं नाव घेत नाही आहे.अशातच आता हवामान खात्याने पुन्हा वादळाचा इशारा दिला आहे. ताशी 40 KM वेगाने वारे वाहतील, असे हवामान खात्याने म्हटले आहे. 

दोन दिवसांपूर्वीच म्हणजेच 13 मे रोजी मुंबई आणि आसपासच्या भागात आलेल्या वादळामुळे दोन मोठ्या दुर्घटना घडल्या. घाटकोपरमध्ये अनधिकृत 120 फूट लांब आणि 120 फुट रूंदीचा जाहिरात होर्डिंग वाऱ्याच्या वेगामुळे जवळच असणाऱ्या पेट्रोल पंपाच्‍या छतावर कोसळले. यावेळी दुर्घटनेवेळी पेट्रोल पंपावर 100 हून अधिक लोक अडकले होते. या दुर्घटनेत 14 जणांना आपला जीव गमवावा लागला, तर 74 जखमींना सुखरूपपणे बाहेर काढण्‍यात आले आहे. त्‍यापैकी 42 जखमींवर महानगरपालिकेच्‍या विविध रूग्‍णालयांमध्‍ये उपचार सुरू आहेत. तर वडाळ्यातील घटनेतील लोखंडी टॉवर कार पार्किंगवर कोसळले. या घटनेत 12 ते 13 वाहनाचं नुकसान झाले. या दोन्ही घटनांमधून नागरिक सावरत असतानाच आता हवामान खात्याने पुन्हा वादळाचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याने म्हटले की, पुढील तीन ते चार तासांत नुंदरबार, धुळे, नाशिक, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद जिल्ह्यात ताशी 30-40 किमी प्रतितास प्रचंड वेगाने वारे वाहणार आहेत.तसेच या जिल्ह्यांना हवामान खात्याने अलर्ट जारी केला आहे. घराबाहेर जाताना खबरदारी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले आहे. आज मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. तर जळगाव, नाशिक, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गारपिटीचा इशारा (यलो अलर्ट) देण्यात आला आहे. कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये उष्ण लाटेचा इशारा देण्यात आला आहे.

पुणे हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा मान्सून दोन दिवस आधीच अंदमानात सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मान्सूनची पुढील वाटचाल बंगालच्या उपसागरातील वातावरणाच्या स्थितीवर अवलंबून असते. परिणामी मान्सूनच्या वाटचालीत कोणतेही अडथळे न आल्यास साधारण 1 जूनच्या आसपास मान्सून केरळमध्ये दाखल होईल. तर महाराष्ट्रात मान्सून 8 जूनच्या आसपास सक्रिय होईल, असा अंदाज भारतीय हवामना खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा कोकणात मान्सून लवकर दाखल होणार, असेही सांगण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post