बुद्ध जयंती निमित्ताने

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.kulkarni65@gmail.com

गुरुवार ता. २३ मे २०२४ रोजी बुद्ध पौर्णिमा अर्थात गौतम बुद्धांचा

जन्मदिन आहे . तीन हजार वर्षांपूर्वी गौतम बुद्धांनी मांडलेले तत्वज्ञान  जगातील प्राचीन तत्वज्ञानांपैकी एक महत्त्वाचे तत्त्वज्ञान आहे. बुद्धानी  माणसाची दुःखापासून मुक्ती व्हावी यासाठी जे चिंतन, मनन, संवाद केला ते म्हणजेच बुद्धाचे तत्वज्ञान. राजपुत्र गौतमाने समाज जीवनातील दुःख, दैन्य पाहिल्यानंतर सत्याचा शोध घेण्यासाठी गृहत्याग केला. माणसाच्या मनात कशाचीही इच्छा, विकार ,असूया असता कामा नये. त्याचे हृदय ममत्वाच्या आणि निर्वैराच्या भावनेने व्यापलेले असले पाहिजे. इच्छा, आकांक्षा, भय, आकर्षण या साऱ्या पलीकडे अनिकेत अवस्थेत जगणे महत्त्वाचे आहे. हाच मार्ग माणसाची रोग, वार्धक्य, दुःख आणि मृत्यू यापासून सुटका करू शकेल. अशा विचारा परत भवताल पाहून सिद्धार्थ गौतम आले होते. वयाच्या तिशीत गृहत्याग केलेल्या गौतम बुद्धांनी पुढची चाळीस-पन्नास वर्षे आपल्या उक्ती आणि कृतीतून एक मोठी शिकवण दिली.गौतम बुद्धांनी त्याकाळी अत्यंत सोप्या भाषेत शिकवण दिली. बुद्धाला सर्वसामान्य लोकांविषयी आस्था व जिव्हाळा वाटत असल्याने ते त्या वेळच्या प्राकृत लोकभाषेतच विचार व्यक्त करत असत. प्रारंभीच्या काळात म्हणूनच बौद्ध साहित्य हे पाली आणि मागधी भाषेतच तयार झाले.

सर्वमान्य भाषा असल्याने बुद्धांची शिकवण दूरवर पसरली. बुद्धाचे तत्त्वज्ञान हे अतिशय व्यापक आहे. माणसाकडे निखळ माणूस म्हणून पाहणारे आहे. म्हणूनच ते नंतर तिबेट, चीन, श्रीलंका ,ब्रह्मदेश अशा अनेक देशांमध्ये गेले.


बुद्धांचा उदय झाला त्यावेळी सामाजिक परिस्थितीमध्ये कर्मकांडाचा अतिरेक झालेला होता. चातुवर्ण्य व्यवस्थेच्या मर्यादा स्पष्ट होत होत्या. यज्ञाच्या आधारे पारलौकिक फळे मिळतात यावरील लोकांचा विश्वास डळमळीत होऊ लागलेला होता. बाह्य कर्मकांड यांत्रिक ,विचाररहित आणि औपचारिक झालेले होते.कर्मकांडा पेक्षा नैतिक सदाचरणाचा, चित्तशुद्धीचा विचार महत्त्वाचा मानला जाऊ लागला होता. तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री यांनी म्हटले होते , माणसाला मोक्ष किंवा परम कल्याण देणारी ईश्वरासारखी शक्ती माणसाच्या बाहेर आणि वर आहे आणि माणूस त्याच्यावर अवलंबून आहे या वेद व उपनिषदांच्या विचारात माणसाची महत्ता कमी होऊन त्याला गौणत्व आले होते. मात्र सांख्यांनी ईश्वराला अमान्य करून अशी शक्ती माणसामध्येच आहे असे सांगून माणसाची महत्ता आणि उंची वाढवली. माणसाचे ईश्वरावरील किंवा दैवीशक्ती वरील अवलंबन अमान्य करून माणसातील सुक्त सामर्थ्य प्रगट करण्याला मानवाला प्रवृत्त व समर्थ करण्याचे मोठे कार्य बुद्धांनी केले. माणसाच्या अंतिम कल्याणाचे सर्वोच्च माणसातच आहे हे त्यांनी सांगितले.


गौतम बुद्धानी मानवी जीवनातील महत्त्वाच्या भेडसावणाऱ्या ज्वलंत समस्या सोडवण्याला प्राधान्य दिले.'या जगात जे जे म्हणून काही आहे ते सर्व अनित्य, क्षणिक आणि नाशवंत आहे.या विश्वात सर्व घटना  नियमानुसार घडतात. ईश्वर वगैरे कोणीही विश्वाचा व मानवाचा कर्ता आणि नियंता नाही. हे जग सतत बदलणाऱ्या प्रवाहासारखे आहे. त्यात नित्य,शाश्वत असे काहीच नसते. आणि मानवाचे सर्व विचार ,भावना, इच्छा व शक्ती त्याच्या दुःखाला कारणीभूत असतात. त्यापासून माणसाला मुक्त होता येते व तो त्यापासून मुक्त झाला तर तेच ' निर्माण 'म्हणजे 'अखंड शांती' असते.'हे सिद्धार्थाला कळाले आणि तो बुद्ध बनलाअसे मानले जाते.


बुद्ध सांगायचे की, माणसाने सर्व प्रकारच्या दुःखांपासून दूर राहिले पाहिजे. बुद्धांनी जीवनातील चार सत्ये सांगितली.केले जी नेहमी लक्षात ठेवावीत.(अ )जन्म, मृत्यू, रोग, इच्छा वगैरे सर्व दुःख देतात.(ब)कोणत्याही प्रकारची इच्छा सर्व दुःखांचे कारण आहे.(क)इच्छांवर नियंत्रण ठेवले पाहिजे जेणेकरून आपल्याला दुःख टाळता येईल.(४)

सांसारिक दु:ख दूर करण्याचे आठ मार्ग आहेत. त्यांना अष्टमार्ग किंवा मध्यम मार्ग असे म्हणतात. मध्यम मार्गाचा अवलंब करून मनुष्य निर्वाण प्राप्त करू शकतो.ते आठ मार्ग म्हणजे (१)सम्यक (शुद्ध) दृष्टी - सत्य, असत्य, पाप-पुण्य इत्यादी समजून घेणे.(२)सम्यक संकल्प - इच्छा आणि हिंसेच्या विचारांचा त्याग करणे.(३)सम्यक वाणी - सत्य बोलणे आणि विनम्र बोलणे.(४)सम्यक कर्म - नेहमी योग्य आणि चांगले कर्म करणे.(५)सम्यक आजीव - उदरनिर्वाहासाठी योग्य मार्गाने पैसे कमवणे.(६)योग्य व्यायाम - वाईट भावना टाळणे(७)योग्य स्मृती - चांगल्या गोष्टींचे आचरण करणे.

(८)सम्यक समाधी - एखाद्या विषयावर एकाग्रतेने विचार करणे. ही चार सत्य आणि आठ मार्ग यांचे महत्त्व बुद्ध विचारात मोठे आहे.



बुद्धाचे तत्त्वचिंतन हे जीवनाभिमुख आहे. डॉ. ग.ना.जोशी यांनी 'भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास ' या ग्रंथात म्हटले आहे 'बुद्धाच्या मते जीवन दुःखरहित पणाने जगण्यासाठी तत्त्वज्ञानातील कल्पना, संकल्पना, दृष्टिकोन, मते, उपपत्ती, सिद्धांत व तत्वे यांचे सहाय्यक कार्य असते. ती सर्व साधनवत असतात.त्यांचा भवसागर यशस्वीपणे तरुन जाण्यासाठी उपयोग करायचा असतो. समुद्र उल्लंघून पलीकडे गेल्यावर नावा किंवा तराफे डोक्यावर घेऊन जर आपण पुढेही चालत राहिलो तर ते मूर्खपणाचे ठरेल. तसेच तत्त्वज्ञानाचा किंवा तात्विक विचारांचा आवश्यक तेथे व तेवढा उपयोग करून घेतल्यावर ते बाजूला सारले पाहिजेत. त्यांना आपल्या डोक्यावर बसू देता कामा नये.आपल्यावर त्यांना कुरघोडी करू देता कामा नये. आपण त्यांचे दास बनता कामा नये.साधने ही साधनेच राहिली पाहिजेत साध्य होता कामा नये.दुःखविमुक्ती हे मुख्य उद्दिष्ट दृष्टीआड होऊ देता कामा नये. तत्त्वज्ञान किंवा तात्विक उपपत्ती हे सिद्धांत कितीही चांगले, सुंदर, पर्याप्त असले तरी त्यांना योग्य तेवढे व तेवढ्यापर्यंतच महत्त्व दिले पाहिजे. त्यांनी माणसावर कायम वर्चस्व व प्रभुत्व गाजवता कामा नये. शेवटी यशस्वी ,तृप्त, संतुष्ट जीवन जगणे हेच खरे ध्येय आपण समोर ठेवले पाहिजे असा बुद्धाचा दृष्टिकोन आहे व तो सध्याच्या अस्तित्ववादी दृष्टिकोना सारखा आहे असे म्हणता येईल.'


अनेक शतकांनंतर भारतामध्ये बौद्ध धर्माला नवा उजाळा देण्याचे मोठे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जातीसंस्थेचा दाह त्यांनी स्वतः सोसला होता. त्यांना स्वतःसह समाजाला त्यातून बाहेर काढायचे होते.जातिसंस्था नष्ट करायची असेल तर प्रथम धर्माचे आणि त्याच्या गुंतागुंतीचे स्वरूप समजून घेणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते.त्यातूनच त्यांनी धर्माची समीक्षा केलेली दिसते. डॉ. आंबेडकर  म्हणतात,’ धर्म हा केवळ कायदा किंवा आज्ञा नसाव्यात.ज्या क्षणी धर्माचे रूपांतर तत्वाऐवजी कायद्यात होते, त्याच क्षणाला तो धर्म भ्रष्ट होतो.आणि असा भ्रष्ट खऱ्या धार्मिक संकल्पनेचा आवश्यक गुणच मारून टाकतो.’ यातूनच त्यांना हिन्दू धर्मात मूलभूत सुधारणेची गरज वाटत होती.


१९३५ साली डॉ. आंबेडकरांनी धर्मांतराची घोषणा केली. जीवन आणि वास्तव यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनात आणि विचारात बदल करणे म्हणजे धर्मांतर ही त्यांची भूमिका होती.डॉ.आंबेडकर यांनी वर्णव्यवस्थेचीही सखोल समीक्षा ‘ शूद्रपूर्वी कोण होते ? ‘या ग्रंथात केली आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी धर्मांतर केले.त्यापूर्वी त्यांनी अनेक धर्मांचा व राजकीय विचारांचा अभ्यास केला होता.साम्यवाद आणि बौद्धधर्म या दोन महत्त्वाच्या तत्त्वप्रणाली आहेत यावर ते ठाम होते. बुद्ध की कार्ल मार्क्स या लेखात आणि बुद्ध आणि त्याचा धम्म या ग्रंथात त्यांनी त्याची चर्चाही केलेली आहे.डॉ.आंबेडकर यांनी धर्म आणि धम्म या दोन संकल्पनांची सखोल चर्चा केली आहे.त्यातील भेद स्पष्ट केला आहे .त्यांच्या मते धर्म हा वैयक्तिक असून धर्म हा मूलतः सामाजिक आहे. धम्म म्हणजे सदाचरण व जीवनातील सर्व क्षेत्रात माणसामाणसातील व्यवहार उचित असणे होय. धर्म या कल्पनेत वस्तूजाताच्या आरंभाच्या साक्षात्काराला महत्त्व दिले जाते.तर धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना हे आहे .धर्मात देव, आत्मा, प्रार्थना, पूजा, कर्मकांड यांना स्थान असून नितिला स्थान आहे. याउलट नीती हे धम्माचे सार आहे.डॉ. आंबेडकरांनी पारंपारिक बौद्ध धर्माची नव्याने मांडणी केली. अहिंसेबाबत भाष्य करताना डॉ. आंबेडकर म्हणतात,’ बुद्धाने तत्व आणि नियम यात भेद केलेला असल्यामुळे त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही.तत्वामध्ये तुम्हाला त्यानुसार वर्णन वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते, तसे नियमात नसते. नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता.’


बुद्धाची धर्मविषयक विचारधारा  गुढतेकडे , अतीन्द्रियतेकडे, पारलौकिकतेकडे झुकत नाही तर मानवी जीवनातील वास्तवानुभव याला प्राधान्य देते. म्हणूनच बुद्धाचा मुख्य हेतू  मानवी जीवन शुद्ध आणि सार्थ करणे याला प्राधान्य देतो. सर्व मानव जातीला व्यापून राहण्याची क्षमता बुद्ध विचारात आहे म्हणूनच तो जगभर पसरू शकला. शक्तीच्या आणि बळाच्या वापराला बुद्ध विचाराला स्थान नाही. तर प्रेमाच्या, मैत्रीच्या आणि करुणेच्या मार्गाने तो पसरलेला आहे. बुद्धाचा सर्वात जास्त विश्वास हा बोधी वर म्हणजेच स्वच्छ आणि स्पष्ट ज्ञान ,आकलन यावर आहे. बुद्धाचे तत्त्वज्ञान अत्यंत बारकाईने समजून घेण्याची नितांत गरज आहे. कारण अतिंद्रीय व पारलौकिकतेच्या चर्चेपेक्षा प्रत्यक्षानुभव , जीव आणि जीवन विषयक आकलन फार महत्त्वाचे आहे. बुद्ध विचारातील ही व्यापकता जाणून घेतली पाहिजे.

बुद्ध पौर्णिमेनिमित्त तथागत गौतम बुद्धांना विनम्र अभिवादन...!



(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post