डॉ. तुषार निकाळजे
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे:- यावर्षी सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये असलेल्या क्लब हाऊस मध्ये मतदान केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. हा प्रयोग पुण्यामध्ये प्रथम होत आहे. वर्ष 1952 ते 2023 पर्यंत झालेल्या जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, विधानसभा, लोकसभा निवडणुकांमध्ये हा पहिलाच वेगळा प्रयोग आहे. ही संकल्पना निवडणूक विषयाचे पुण्यातील संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांनी निवडणूक आयोगास सादर केली होती.
दि. 7 जुलै 2023 रोजी मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली, तसेच राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना सादर केली होती. डॉ. तुषार निकाळजे यांनी नागपूर येथे दिनांक 17 ऑक्टोबर 2022 मध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रामध्ये "कोविड - 19 च्या अनुषंगाने निवडणूक प्रशासकीय व्यवस्थेतील बदलांची गरज" या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यामध्ये सहकारी गृह रचना संस्था यांच्या इमारतींमधील क्लब हाऊसमध्ये मतदान केंद्र स्थापन करावे अशी सूचना केली होती. यामुळे मतदानाचा टक्का किमान 8 ते कमाल 14% वाढणार आहे. तसेच वयोवृद्ध, दिव्यांग व आजारी व्यक्तींना दूरच्या मतदान केंद्रावर न जाता सहजरित्या सोसायटीतील मतदान केंद्रावर मतदान करता येणे शक्य होईल. तसेच इतर मतदान केंद्रावरील मतदारांची संख्या कमी होऊन निवडणूक कर्मचारी व अधिकारी यांचा अतिरिक्त ताण कमी होईल .
याप्रसंगी डॉ. तुषार निकाळजे यांनी समाधान व्यक्त केले. डॉ. तुषार निकाळजे हे भारतीय निवडणूक प्रणाली या विषयाचे संशोधक आहेत. त्यांची निवडणूक या विषयावरील दोन पुस्तके महाराष्ट्राच्या सात विद्यापीठे व तीन स्वायत्त महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमास मान्यता प्राप्त आहेत. तसेच त्यांना आजपर्यंत शैक्षणिक व संशोधनात्मक कार्याबद्दल राज्य , राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय 14 पुरस्कार मिळाले आहेत . डॉ. निकाळजे यांनी वर्ष 2021 पासून आजपर्यंत निवडणूक आयोगास वेगवेगळे पाच प्रस्ताव पाठविले आहेत.
प्रायोगिक तत्वावर वडगाव शेरी, विश्रांतवाडी, कस्तुरबा सोसायटी, कोथरूड, वारजे, वडगाव बुद्रुक, धायरी, भोर येथे काही सहकारी गृहरचना संस्थांमध्ये मतदान केंद्रे असतील.