प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागाने शनिवारी येरवड्यातील कल्याणी नगर परिसरातील एलरो’ आणि ‘युनिकॉर्न’ या दोन्ही पबचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केले.
या बाबत पुणे पोलिसांनी या पबचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी पुणे महापालिकेला पत्र दिले होते. यापूर्वी देखील मागील वर्षी दोन वेळा पत्र देण्यात आलेले होते. मात्र, महापालिकेकडून बोटचेपी भूमिका घेतली जात होती. मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई करण्याबाबत कडक धोरण आवलंबल्याने महापालिकेला कारवाई करावी लागली.
शहरातील पब, बार, रेस्टॉरंट आणि रूप टॉप हॉटेलला रात्री दीड वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे. यावेळेनंतर हॉटेल सुरू ठेवल्यास कारवाईचा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला होता.मात्र त्या नंतरही रात्री उशीरापर्यंत सुरु राहत होते. यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कल्याणी नगर येथील युनिकॉर्न हाऊस व एलरो या पबवर कारवाई करत २८ लाखाचा मुद्देमाल जप्त करत ८ जणांवर गुन्हा दाखल केला होता. येरवड्यातील (कल्याणीनगर) युनिकॉर्न आणि एलरो पबवर पुणे पोलिसांनी कारवाई केल्यानंतर महापालिकेच्या बांधकाम विभागानेही एलरो पबवर शनिवारी कारवाई केली.
या कारवाई नंतर पुणे पोलिसांनी संबंधीत पबवर कारवाई करण्याचे पत्र महापालिकेला दिले होते. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने शनिवारी एलरो पबवर कारवाई करत अनधिकृत बांधकाम व शेड पाडले. ही कारवाई कार्यकारी अभियंता अजित सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम निरीक्षक विष्णू तौर, राजेंद्र फुंदे, योगेश गुरव यांच्या पथकाने केली.