जातनिहाय जनगणना अल्पसंख्याकांसाठी गरजेची काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे प्रतिपादन

 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : ‘जातनिहाय जनगणनेतून अल्पसंख्याकांचे प्रश्न मार्गी लागतील. मात्र, केंद्रात सध्या असलेल्या सरकारला ते करायचे नाही. त्यामुळे देशभरातील सर्व अल्पसंख्याकांनी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे,’ असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोमवारी केले. हे ढोंगी सरकार खाली खेचण्याची भावना देशभरातील जनतेत आहे, अशी घणाघाती टीकाही त्यांनी केली.

पुणे शहरातील अल्पसंख्याकांच्या शिष्टमंडळाने पटोले यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर आयोजित बैठकीत ते बोलत होते. नॅशनल कॉन्फरन्स फॉर माइनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांच्या नेतृत्वाखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात शहरातील  मुस्लिम, ख्रिश्चन व बौद्ध समाजाच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, रिपब्लिकन युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सुवर्णा डंबाळे, कारी मोहम्मद उद्रीस, मौलना काझमी, माजी नगरसेवक अजित दरेकर , रफिक शेख , रिजनल ख्रिश्चन समूहाचे लुकस केदारी, रिपाइंचे अशोक जगताप, शैलेंद्र मोरे, स्नेहा कांबळे, जीवन घोंगडे , सुफियान कुरैशी आदी उपस्थित होते. 

नाना पाटोले पुढे म्हणाले की, ‘सध्या देशभरात मोदी सरकारविरोधात वातावरण तयार झाले आहे. ते निर्माण करण्यात आपल्या सर्व समाजघटकांचा महत्त्वाचा वाटा आहे. आता आपण एकमेकांसोबत मतभेद व्यक्त करण्याची वेळ नाही. आपल्याला फक्त हुकूमशाही सत्तेला पायउतार करायचे आहे. कारण सध्या फक्त चारच लोक देश चालवत आहेत. त्यातील दोघे विकत आहेत, तर दोघे विकत घेत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातील प्रत्येक उमेदवार निवडून देण्याची जबाबदारी आपली आहे,’ असेही ते म्हणाले.    

प्रारंभी नॅशनल कॉन्फरन्स फॉर माइनॉरिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी भूमिका विशद केली. त्यानंतर वक्फ कमिटीचे अघ्यक्ष आमदार वजाहत मिर्जा, अरविंद शिंदे, सुवर्णा डंबाळे, लुकस केदारी यांच्यासह अनेक प्रतिनिधींनी मनोगते व्यक्त केली.

..............

३ मे रोजी राहुल गांधींची पुण्यात सभा

 पटोले यांच्या भेटीनंतर अनेक माइनॉरिटीच्या   संघटनांनी महाराष्ट्रातही काँग्रेस उमेदवारांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. महाविकास आघाडीचे पुण्यातील उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे माजी अध्यक्ष, तसेच खासदार राहुल गांधी यांची ३ मे रोजी सायंकाळी चार वाजता एसएसपीएमएस कॉलेजच्या मैदानावर, पुणे रेल्वे स्टेशनच्या पाठीमागे जाहीर सभा होणार आहे. याचे जोरदार नियोजन सुरू असल्याचेही डंबाळे यांनी सांगितले.           

...........

अरविंद शिंदे अध्यक्ष 

पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी 

९८२२०२०००५

Post a Comment

Previous Post Next Post