सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे ३४ वे वर्ष...
प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : गांधी पेठ तालीम मित्र मंडळ ही पिंपरी चिंचवड शहरातील एक सामाजिक व प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करणारी अग्रगण्य संस्था आहे. गतवर्षीप्रमाणे या संस्थेच्या वतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे (वर्ष ३४ वे) आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन बुधवारी सायंकाळी सात वाजता, पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या हस्ते होणार आहे.
चिंचवड गाव, चापेकर चौक, चापेकर स्मारक उद्यान येथे रोज सायंकाळी सात वाजता सुरू होणाऱ्या या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प बुधवारी (दि. २४) माईंड पॉवर ट्रेनर व जेष्ठ समुपदेशक डॉ. दत्ता कोहिनकर हे "मनाची अमर्याद शक्ति व तणावमुक्ती" या विषयावर मार्गदर्शन करून गुंफणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे व व्याख्यानमालेचे समन्वयक सुहास पोफळे यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
गुरुवारी (दि.२५) निवेदिता धावडे या "प्रत्येक कृती राष्ट्रहिताची आणि विश्वशांतीची" या विषयावर, शुक्रवारी (दि.२६) विनोद बोधनकर हे "प्रदूषण नदीचे व प्लास्टिकचे"; शनिवारी (दि.२७) शिवशंभो विचार मंचचे संघटन मंत्री हभप शिरीष महाराज मोरे हे "शिवराज्याभिषेकाचे महत्व" आणि व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी रविवारी (दि.२८) निवृत्त न्यायाधीश संजय भाटे हे "माझे संविधान माझा अभिमान" या विषयावर व्याख्यान देणार आहेत. व्याख्यान रोज सायंकाळी सात वाजता सुरू होईल.
या कार्यक्रमाच्या आयोजनात गणेशोत्सव समिती अध्यक्ष विपुल नेवाळे, सदस्य महेश गावडे, अमित चौधरी, सिद्धेश गोलांडे, गोपी बाफना, धीरज गुत्ते, जगदीश घुले, प्रवीण भोकरे, संदीप जंगम, राहूल वाघुले आदींनी सहभाग घेतला आहे.
------------------------------------------------