प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
विल्यम शेक्सपियर म्हणजे आपल्या वाङ्मयांने जगभर गेली चार शतके गारुड केलेला एक प्रतिभावंत साहित्यिक. १५६४ रोजी जन्मलेले शेक्सपियर २३ एप्रिल १६१६ रोजी कालवश झाले. छपाईचा शोध लागल्यानंतर जगातील सर्वाधिक छापला गेलेला, वाचला गेलेला, चर्चा झालेला ,आपल्या साहित्यावर लिहिला गेलेला, अनुवाद झालेला हा सर्वात लोकप्रिय लेखक आहे.तसेच त्यांच्या लेखनावर आधारित सर्वात जास्त साहित्य निर्मितीही विविध भाषांतून झाली आहे. २३ एप्रिल हा त्यांचा स्मृतिदिन 'जागतिक ग्रंथ दिन ' म्हणून जगभर साजरा केला जातो. साहित्याच्या प्रांतातले जागतिक सम्राटपद शतकानुशतके त्यांच्या नावे आढळपणे सर्वमान्य झाले आहे.ज्या मराठी वाचकांना शेक्सपियर जाणून घ्यायचा आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी अध्यक्ष असताना १९७९ साली प्रकाशित केलेला शेक्सपियर परिचय ग्रंथ हा आवर्जून वाचला पाहिजे. हे आजच्या जागतिक ग्रंथदिनी आवर्जून सांगावेसे वाटते.
स्थळकाळाची बंधने ओलांडून जगमान्यता आणि अमरत्व लाभलेला हा लेखक आहे. गेल्या चारशे वर्षात जग कमालीच्या वेगाने बदलले आहे. आमच्या साम्राज्यवरील सूर्य मावळत नाही ही ब्रिटिश साम्राज्यवाद्यांची कधीकाळची दर्पोक्तीही कालबाह्य झाली आहे.पण तरीही
सर्वसामान्य इंग्रजी लोक म्हणतात एक वेळ आम्ही आमच साम्राज्य देऊ पण आमच्या शेक्सपियर देणार नाही.या भावनेची कदर केली जाते. सर्वसामान्य माणसांची इतके प्रेम जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही साहित्यिकाला लाभलेले नाही. जागतिक वाङ्मयात मोलाची भर घालणाऱ्या शेक्सपियरचे जन्मस्थळ १८४७ साली शेक्सपियर ईस्टच्या स्वाधीन गेले.तेथे वस्तुसंग्रहालय असून त्यात शेक्सपियर संबंधित अनेक वस्तू आहेत. त्याचा अर्धपुतळा आहे.नाट्यगृह ,ग्रंथालय आहे .या ग्रंथालयात शेक्सपियर संबंधीची हजारो पुस्तके आहेत.येथील नाट्यगृह सातत्याने प्रयोग आणि गजबजलेले असते.हे स्मारक इंग्लंडचे राष्ट्रीय स्मारक मानले जाते.
शेक्सपियरचा जन्म इंग्लंड मधल्या वर्विकशायर परगण्यातील स्टँडफोर्ड भागातील ऑन ऍव्हन या उपनगरात एका सुखवस्तू कुटुंबात झाला. जॉन हे त्याच्या वडिलांचे नाव.१६०१ साली कालवश झाले.तर त्यांची आई मेरी यांचे निधन १६०८ साली झाले.या दंपत्याला आठ अपत्ये होती.विल्यम हे त्याचे दुसरे अपत्य. वडील जॉन हे व्यवहार कुशल व कर्तबगार होते.ते ग्रामपंचायतीत विविध पदांवर कार्यरत होते. पण काही कारणामुळे त्यांची नोकरी गेली. आणि या कुटुंबाला हलाखीचे दिवस आले. १५९६ साली जॉन यांना ' किंग ऑफ आर्मस ' हे सरकारी मानचिन्ह मिळाले. या मानचीन्हामुळे शिक्षण चे घराणे जेंटलमन या पदवीचे हक्कदार बनले. इंग्लंडच्या त्याकाळच्या समाजरचनेत या पदवीला मोठी प्रतिष्ठा होती.अर्थात ही प्रतिष्ठा विल्यमच्या लेखन कार्याचाही भाग होती यात शंका नाही.
विल्यम यांचे बालपण त्यांच्या काकाकडे स्टिनराफिल्ड या गावी गेले. त्यांना शिक्षणाबरोबर चरितार्थासाठी काम करावे लागले. एका अर्थाने त्याकाळच्या 'कमवा आणि शिका 'योजनेतूनच त्यांची वाटचाल झाली. त्यांनी कारकुनी ,वैद्यकी,अध्यापन ,मुद्रण आदी विविध क्षेत्रात काम केले. वयाच्या १८ व्या वर्षी म्हणजे १५८२ साली त्यांनी त्यांच्या पेक्षा आठ वर्षानी मोठ्या असलेल्या ऍन हथवे या मुलीशी विवाह केला.या दाम्पत्याला तीन अपत्ये झाली. त्यापैकी हॅम्लेट या त्याच्या मुलाचे वयाच्या अकराव्या वर्षी म्हणजे १५९६ मध्ये निधन झाले.त्याची मोठी मुलगी सुझान हीचे १६०७ साली आणि धाकटी मुलगी ज्युडिथ हिचे १६१६ साली लग्न झाले.या मुलीच्या लग्नानंतर दोन महिन्यांनी शेक्सपियरचे निधन झाले.
हा सारा जीवनसंघर्ष करत असताना शेक्सपियर यांचा 'नाटक 'या साहित्य प्रकाराचा सर्व अंगाने अभ्यास सुरू होता. नाटकातील सर्व तंत्र, मंत्र आत्मसात करायला त्यांनी सुरुवात केली होती. १५८३ ते १६१३ या तीस वर्षात त्यांनी ३७ नाटके लिहिली. १५९२ ते ९४ ही दोन वर्षे प्लेगमुळे नाट्यगृहे बंद होती. या काळात त्यांनी नितांत सुंदर खंड काव्ये लिहीली.सोनेटस (सुनिते)या प्रकाराची रचना केली. ग्लोब नावाच्या थिएटरमध्ये शेक्सपियरने बहुतांश नाटके केली.त्यांच्या या स्तिमित करणाऱ्या रचनांमुळे ती कोणा एका लेखकाची निर्मिती नसावी असाही प्रवाद निर्माण झाला पण त्याला पुरावा मिळू शकला नाही. त्यांच्या नाटकातून मानवी मनाच्या विविध भावछटा फार ताकतीने उभ्या राहिल्या. प्रत्यक्ष संघर्षापेक्षा व्यापक संघर्ष माणसाच्या अंतरंगात सुरू असतो. आपला पराभव नियती नव्हे तर आपल्या स्वभावातील एखादी उणीवच करत असते.तो आपणच आपला केलेला दारूण पराभव असतो. असे तो पात्रांच्या संवादातून सांगतो. त्याच्या नाटकांचा काव्यमय अनुवाद आणि कवितांचे नाट्यरूपांतर जगातील शेकडो भाषेतून झाले. त्यांच्या लेखनामुळे समीक्षेच्याही कक्षा रुंदावल्या.हे महानपण वादातीत आहे.
जगभर सर्वत्र शेक्सपियर चे साहित्य वाचले जाते त्याचे कारण त्याला स्थल कालाची मर्यादा नाही. त्याने संपूर्ण मानव जातीच्या भावभावना आपल्या पात्रांच्या संवादातून ,घटना - घडामोडीतून मांडल्या आहेत. त्याच्या पात्रांचे स्वभाव विशेष विविध स्वरूपाचे आहेत. त्याच्या साहित्यात विपुल शब्दसंग्रह आणि कमालीचे शब्दसौष्ठव आहे. त्याचे संवाद कमालीचे सूचक आहेत.कोणताही कलावंत हा काळाची व भवतालाची निर्मिती असतो.संत ज्ञानेश्वरांच्या लेखनालाही तत्कालीन सामाजिक-राजकीय परिस्थिती ,पडलेला दुष्काळ कसा कारणीभूत ठरला आपण जाणतो. शेक्सपियर ही अनेक अर्थाने भवतालाची निर्मिती होता. शेक्सपियर आणि संत तुकाराम थोड्याफार फरकाने समकालीन. संत तुकारामांचे वांग्मय हे अस्सल व अव्वल आहे. तरी ते जगभर पोहचू शकले नाही. याचे कारण छपाईच्या शोधासह इतर सर्व विज्ञान तंत्रज्ञान आपल्याकडे पोहोचायला दीड दोनशे वर्षे उशीर झाला यातही लपलेले आहे. म्हणूनच शेक्सपियरच्या स्मृतिदिनी अर्थात जागतिक पुस्तक दिनी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचाही नेमका व इष्ट वापर तातडीने करणे किती गरजेचे असते हेही या निमित्ताने जाणून घेण्याची गरज आहे. महान साहित्यिक विल्यम शेक्सपियर यांना विनम्र अभिवादन...!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)