प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१५ मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट हे मानवतेचे महाकवी होते. कारण 'कोणत्याही जातीय दंगलीत पक्षी मारले जात नाहीत, झाडे कापली जात नाहीत ,मारली व कापली जातात ती माणसे ‘असे म्हणणाऱ्या सुरेश भटांना मानवतेची जपणूक करणारी कविता अतिशय जवळची वाटत असे.किंबहुना तीच कविता त्यांनी लिहिली. सुरेश भट कविते मधल्या ‘गझल’ या काव्यप्रकारासाठी जन्मभर झिजत राहिले. स्वतः लिहीत असतानाच शेकडो कवींना त्यांनी लिहिते केले.
आपल्यामागे लिहिती पिढी निर्माण करणारा ऐतिहासिक कवी एखादाच असतो. मराठी कवितेच्या इतिहासात सुरेश भट हा असा इतिहास पुरुष आहे. त्यांच्यामुळेच महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्र बाहेर अगदी साता समुद्रापारही मराठी गझल मोठ्या प्रमाणात रुजताना दिसते आहे असे मत ज्येष्ठ गझलकार व समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने आयोजित सुरेश भट यांच्या ९२ व्या जन्मदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांना आदरांजली वाहताना बोलत होते.
प्रारंभी सुरेश भट यांच्या प्रतिमेला पांडूरंग पिसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी रमजान शेख, धोंडीराम शिंगारे,सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी ,अश्विनी कोळी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.