प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.२८ वैज्ञानिक समाजवादाचे खुले ज्ञानपीठ हे ब्रीद घेऊन समाजवादी प्रबोधिनी ही संस्था जवळजवळ गेली पाच दशके लोकप्रबोधनाचे सातत्यपूर्ण काम करत आहे ही अतिशय स्पृहणीय बाब आहे. प्रबोधिनीच्या कामाचे महत्त्व आजच्या काळात अतिशय मोठे आहे.समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणारे ' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' हे मासिक आणि सुसज्ज असे समृद्ध प्रबोधन वाचनालय या उपक्रमांसह समकालीन घडामोडींवर सैद्धांतिक चर्चा घडवून आणण्याचे प्रबोधिनीचे काम जनजागरणाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
आचार्य शांताराम गरुड, प्रा.डॉ.एन. डी.पाटील ,शहीद गोविंद पानसरे आदी दिग्गजांनी स्थापन केलेली ही संस्था प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी आपल्या सहकाऱ्यांच्या सहभागाने गेली अनेक वर्षे अतिशय नेटाने पुढे नेत आहेत ही अभिमानास्पद बाब आहे . अशा प्रकारचे संस्थात्मक प्रबोधन करणारी समाजवादी प्रबोधिनी ही महाराष्ट्रातील एक महत्त्वाची संस्था आहे. लोकप्रबोधनाचे अवीरत काम करणाऱ्या या संस्थेशी जोडून घ्यायला मला आवडेल. प्रबोधिनीला भविष्यात सर्वतोपरी मदत माझ्याकडून केली जाईल असे मत हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार सत्यजित बाबासाहेब पाटील (आबा )यांनी व्यक्त केले. ते आपल्या प्रचार दौऱ्यामध्ये समाजवादी प्रबोधिनीला सदिच्छा भेट देताना बोलत होते. यावेळी प्रसाद कुलकर्णी यांनी त्यांचें गुच्छ व ग्रंथ देऊन स्वागत केले आणि प्रबोधिनीच्या कार्याची माहिती दिली .
सत्यजित पाटील यांनी प्रबोधन वाचनालय व प्रबोधिनीचे काम जाणून घेतले. यावेळी राहुल खंजिरे,अन्वर पटेल, तुकाराम अपराध ,राजन मुठाणे, शकील मुल्ला , सचिन कांबळे,ऋषभ गांजवे,संजय भस्मे, महेंद्र जाधव, रामदास कोळी, सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी ,अश्विनी कोळी ,बाळासाहेब नरशेट्टी,मारुती कुंभार, आशिष पाटील या प्रबोधिनीच्या कार्यकर्त्यांबरोबरच सयाजी चव्हाण ,संजय तेलनाडे,कैश बागवान आदी अनेकांची उपस्थिती होती.