महर्षी शिंदे यांच्या १५१ व्या जन्मदिना निमित्त



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

एकीकडे अठराव्या लोकसभा निवडणुकांचा गदारोळ सुरू आहे. तर दुसरीकडे आर्थिक, राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक असे सर्व क्षेत्रीय प्रदूषण वाढत आहे. राजकारण हे फक्त आणि फक्त सत्ताकारण बनत चाललेले आहे. सर्वसामान्यांच्या उद्धाराची ,त्यांचे जीवनमान सुधारण्याची राजकीय, आर्थिक धोरणे राबवण्यासाठी लोकचळवळ उभी राहण्यासाठी लोक जागृती करणे अत्यंत महत्त्वाचे आहे .जनतेच्या जागृतीतूनच सामाजिक, आर्थिक ,राजकीय व सांस्कृतिक पर्यावरण समृद्ध होत असते.ते करण्यासाठी कटिबद्ध राहणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. असा संदेश वर्तमानाने दिला आहे तो ध्यानात  वाटचाल केली पाहिजे. असाच एक व्यापक दृष्टिकोन घेऊन आयुष्यभर कार्य केलेले व्यक्तिमत्व म्हणजे ‘महर्षी विठ्ठल रामजी शिंदे ‘आज त्यांचा १५१ वा जन्मदिन  आहे. (२३ एप्रिल १८७३ - ०२ जानेवारी १९४४)


” महर्षी विठ्ठल रामजी उर्फ अण्णासाहेब शिंदे हे एक झाकलेल माणिक! अण्णासाहेबांच जीवन म्हणजे सातत्याने धगधगत राहिलेल यज्ञकुंडच.अण्णासाहेबांनी संपूर्ण जीवनभर कणाकणाने जळत राहून आपल्या आयुष्याच्या यज्ञकुंडातला वन्ही सतत प्रज्वलित ठेवला.विसाव्या शतकातील समाज परिवर्तनाच्या चळवळचा मागोवा घेतल्यास महाराष्ट्राच्या सामाजिक ,सांस्कृतिक व राजकीय जीवनावर जबरदस्त प्रभाव टाकणाऱ्या अण्णासाहेबांच्या वाट्याला जेवढी उपेक्षा आली तेवढी ती अन्य कोणत्याही समाजपुरुषाच्या वाट्याला आलेली नाही.महाराष्ट्रातले पुरोगामी व्यासंगी व साक्षेपी विचारवंत प्रा. गं.बा. सरदार यांच्या ‘महाराष्ट्राचे उपेक्षित मानकरी ‘या पुस्तकातील उपेक्षितांच्या यादीतही अण्णासाहेबांचा नाव अंतर्भूत होऊ शकलं नाही..या उपेक्षित मानकऱ्यांच्या यादीतही आपले अण्णासाहेब पुन्हा उपेक्षित ते उपेक्षितच. समाजकारण हे असे क्षेत्र आहे की ,तेथे समाजाला न आवडणाऱ्या गोष्टी समाजसुधारकांना बोलाव्या लागतात, कराव्या लागतात.समाजमनाला त्या पटत नसतात ,पचत नसतात. तथापि केवळ समाजमनाचा अनुनय करून समाज सुधारता येत नसतो.समाजसुधारकांना समाजाचा रोष पत्करून हे सतीचे वाण घ्यावे लागते. सहाजिकच ,समाज अशा नेत्यांचा छळ करतो .अर्थातच या छळाचे प्रकार कालानुरुप आणि व्यक्तीनुरूप भिन्नभिन्न असतात.” असे ज्येष्ठ विचारवंत कालवश प्रा.डॉ.एन.डी.पाटील यांनी ‘ महर्षी विठ्ठल रामजी शिंदे :एक उपेक्षित महात्मा ‘ या पुस्तकात म्हटले आहे. 



महाराष्ट्राच्या प्रबोधन परंपरेमध्ये महर्षी वि.रा. शिंदे यांची भागीदारी अतिशय मोठी आहे. ते कर्ते सुधारक होते, कर्मवीर होते, तत्त्वचिंतक होते आणि धर्मसुधारकही होते.धर्माच्या नावे केल्या जाणाऱ्या अनिष्ट रूढी -परंपरेविरुद्ध त्यानी आवाज उठविला होता.प्रभावी वक्ते, मार्मिक व मर्मग्राही लेखक, इतिहास संशोधक म्हणूनही त्यांचा लौकिक मोठा आहे. महर्षी शिंदे हे तुलनात्मक आणि समन्वयक पद्धतीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते स्वतंत्र व स्वावलंबी विचाराने कार्यरत राहीले.डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी ऑफ इंडिया (१९०६) कौटुंबिक उपासना मंडळ (१९२४ )ब्राह्मोसमाज ( १९३३) या संस्थांची स्थापना त्यांनी केली. भारतीय अस्पृश्यांचा प्रश्न, माझ्या आठवणी ,शिंदे लेख संग्रह आदी महत्त्वाचे ग्रंथ त्यांनी लिहिले. गेल्या काही वर्षात महर्षी शिंदे यांच्यावर चरित्रपर ,संशोधनपर लेखन अनेक मान्यवरांनी केलेले आहे.२३ एप्रिल १८७३ रोजी कर्नाटकातील जमखंडी येथे जन्मलेले महर्षी शिंदे २ जानेवारी १९४४ रोजी पुणे रोजी कालवश झाले.आधुनिक प्रबोधन चळवळीचे अध्वर्यू म्हणुन ज्यांचा उल्लेख करावा लागेल त्या राजा राममोहन रॉय यांच्यापासून भारतामध्ये धर्मसुधारणा आणि समाज सुधारणेबाबत एक नवा विचारप्रवाह सुरू झाला. त्याबाबतची सैद्धांतिक मांडणी सुरु झाली. त्या अध्यात्मप्रवण विचार परंपरेत महर्षी शिंदे यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे.


खास करून त्यांनी दलित उद्धाराचे केलेले कार्य अतिशय महत्त्वाचे आहे.त्यांना प्रचंड टिकेला नेहमीच तोंड द्यावे लागले.ते म्हणतात ” निंदानालस्ती च्या नियमित रतीबावरच समाजसुधारकांची गुजराण होत असते.’विठ्ठल रामजी यांचे वडील रामजी हे वारकरी होते आणि आई यमुनाबाई अत्यंत धार्मिक वृत्तीचे होत्या. त्यांच्या घरी जाती-पाती बाबतचा भेदभाव नव्हता. हे समतेचे बाळकडू विठ्ठल रामजीना घरातच मिळू लागले. ते लिहितात ,’माझ्या पुढील आयुष्याचं तारु अनेक तुफानातून सुरक्षितपणे चालले त्याला आधार काय ?तर ती माझ्या आई बाबांची आत्मसंतुष्ट वृत्ती.माझी आई तर आत्मसंतोषाच दिव्य आगरच. या दाम्पत्याने आपल्या मुलांची नावेही कृष्णा ,विठू, जनाबाई, मुक्ताबाई, एकनाथ अशीच वारकरी संप्रदायात ठेवली होती.विठ्ठल रामजी हे हुशार ,चुणचुणीत होते.सामाजिक कार्यात ते हीरिरीने सहभागी होत असत. १८९१ मध्ये ते मॅट्रिक झाले. पुढे ते पुण्याला फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकू लागले.१८९८ मध्ये बी.ए.झाले.सुधारकाग्रणी गोपाळ गणेश आगकरांच्या’ सुधारक ‘ पत्रातील विचाराने ते प्रभावित झाले. तसेच मिल ,स्पेन्सर मॅक्सम्युलर आदी अनेकांच्या विचारांचा त्यांच्यावर प्रभाव पडला.१८९५ च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनात त्यांनी स्वयंसेवक म्हणून काम केले होते.

 

न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे ,डॉ. रामकृष्ण भांडारकर ,केशवचंद्र सेन, चंदावरकर आदी अनेक राष्ट्रीय सभेचे पुढारी प्रार्थना समाजाचेही नेते होते.प्रार्थना समाजाची उपासना व प्रवचने ऐकून विठ्ठल रामजी प्रार्थना समाजात सामील झाले. त्यांनी अजन्म धर्मप्रचारक होण्याची शपथ घेतली होती. ते म्हणतात,’ मी प्रार्थना समाजात गेलो म्हणून सुधारक झालो नाही तर मी हाडाचा सुधारक होतो म्हणून प्रार्थना समाजात गेलो. ‘ धर्मशास्त्राच्या व समाजशास्त्राच्या अभ्यासासाठी ते विलायतेला गेले. त्यांना युनेटेरियन स्कॉलरशिप मिळाली.तसेच सयाजीराव गायकवाड महाराजांनी मोठे आर्थिक सहकार्य केले. त्यामुळे एलएलबी च्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण सोडून ते विलायती गेले.१९०१ साली त्यांनी मंचेस्टर येथील कॉलेज ऑफ थिओलॉजी ‘ मध्ये प्रवेश घेतला. ‘ सत्य,स्वातंत्र्य व धर्म ‘ हे या कॉलेजचे ब्रीद होते.त्यांना मराठी,कानडी,संस्कृत,इंग्रजी भाषा येत होतीच.पाली भाषाही त्यांनी अवगत केली. तेथे त्यांनी सर्व धर्माचे तौलनिक अध्ययन केले. भरपूर प्रवास केला आणि भरपूर लेखन केले.माणसाच्या उद्धारासाठी सतधर्म हाच उपाय आहे असे त्यांचे मत बनले.त्यांना राजा राममोहन रॉय यांचा विभूतीपूजा व व्यक्तिपूजा नाकारणारा ब्राह्मो समाज महत्वाचा वाटला. त्यातून प्रेरणा घेऊन त्यांनी स्थापन केलेला ब्राह्मो समाज व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही, समता व स्वावलंबन हे मूल्य मानून व एक ईश्वर, एक धर्म ,एकच मानवता हे सूत्र मांडून कार्य करू लागला.त्यांनी प्रार्थना समाजाच्या प्रसारासाठी भारतभर प्रवास केला. त्यांनी टाइम्स ऑफ इंडिया आणि इंडियन सोशल रिफॉर्मर या वृत्तपत्रात याबाबत लेखन केले.महर्षी शिंदे राजकारण, समाजकारण, धर्मकारण या विषयात जहाल मताचे होते. टिळक आणि गांधी यांच्याविषयी त्यांना प्रचंड आदर होता. पण धर्म व समाज सुधारणेच्या क्षेत्रात जेव्हा या मंडळीनी मवाळ मते मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा महर्षींनी त्यांना विरोध केला. विश्वधर्माच्या पायावर राष्ट्रीय एकात्मता साकारली जावी म्हणून कुटुंबीयांसह त्यांनी स्वतःला वाहून घेतले.


त्यांनी देवदासी व मुरळ्या वाहण्याच्या चालीला विरोध केला. मुलांप्रमाणेच मुलींनाही सक्तीचे शिक्षण मिळावे म्हणून चळवळ केली.अनिष्ट परंपरा नष्ट कराव्यात आणि दारूबंदी व्हावी म्हणून प्रयत्न केले. चूल व मूल यातून स्त्रियांनी बाहेर पडावे म्हणून पुण्यात कौटुंबिक उपासना मंडळ स्थापन केले.महर्षी शिंदे यांनी ब्राह्मणेतरात व दलितात राष्ट्रीय वृत्ती निर्माण व्हावी म्हणून ‘राष्ट्रीय मराठा संघ ‘ व ‘ अस्पृश्यताविरोधी समिती ‘ स्थापन केली. महात्मा गांधी यांच्या भारतातील कार्याला सुरुवात होण्यापूर्वी चौदा वर्षे विठ्ठल रामजी दलितांच्या उद्धारासाठी कार्यरत होते. गांधीजींनीही त्यांचे या कामातील श्रेष्ठत्व मान्य केले होते.वर्गीय दृष्टिकोनातून शेतकरी, मजूर ,अस्पृश्य या दुर्बल घटकांच्या उत्थानासाठी बहुजन पक्ष ‘ स्थापन केला.१९२०मधील कौंन्सिलच्या निवडणूक मराठा जातीसाठी असलेल्या राखीव जागेवर शिंदे यांनी उभे राहावे अशी सूचना राजर्षी शाहू महाराजांनी केली. पण शिंदे यांनी ती नम्रपणे नाकारली. ते सर्वसाधारण जागेवर उभे राहिले आणि पराभूत झाले. महर्षी शिंदे यांनी सायमन कमिशनवर बहिष्कार घालण्याचा सल्ला ब्राह्मणेतराना दिला. अनेक सत्यशोधक ब्राह्मणेतर पुढारी काँग्रेस व महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात उतरले.काँग्रेसमध्ये बहुजनसमाज दिसू लागला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. पण दलित आणि दलितेतर यात नवी राजकीय दरी निर्माण होईल. असे मत व्यक्त करुन महर्षी शिंदे यांनी स्वतंत्र मतदार संघाच्या मागणीला विरोध केला.


महर्षी शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही आवाज उठवला. तुकडेजोड बिलामुळे गरीब शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका होता हे ओळखून त्यांनी शेतकरी परिषदेच्या अध्यक्ष स्थानावरुन त्याला कडाडून विरोध केला.महाराष्ट्रात अनेक मोठ्या शेतकरी परिषदा भरवल्या.भांडवलशाहीचे दुष्परिणाम सांगून समाजवादाची आवश्यकता त्यांनी प्रतिपादित केली.ते म्हणतात,’ हल्लीच्या औद्योगिक क्रांतीच्या काळात भांडवलसुराचा जन्म झालेला आहे.तो चिरंजीव नाही. इतर प्राचीन असुराप्रमाणे हाही आपल्या कर्माने आणि इतरांच्या जागृतीने मरणार आहे.’ शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व शेतकऱ्यांनीच केले पाहिजे हे त्यांनी आग्रहाने मांडले.कॉग्रेस शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीरपणे मांडत नाही हे त्यांनी ठणकावून सांगितले. ते म्हणतात, ‘…. शेतकरी हा राष्ट्राचा एक पोशिंदा म्हणून सर्वात महत्त्वाचा व संख्येने मोठा वर्ग आहे हे खरे आहे. तथापि इतर अल्पसंख्यांक आणि परिपुष्ट वर्गा इतके शेतकऱ्यांचे वजन आजवर कोणत्याच पार्लमेंटवर पडलेले नाही. मग अनेकांच्या वजनाखाली सहज दडपून जाणाऱ्या आमच्या राष्ट्रीय सभेवर शेतकरी बंधूंना तुमचे काय म्हणून वजन पडावे ?पुढे या देशात भिन्नभिन्न वर्गामध्ये स्पर्ध किंवा वैर माजल्यावर जमीनदार विरुद्ध शेतकरी, खोत विरुद्ध कुळ, गिरणीमालक विरुद्ध कामगार असे हितसंबंधी वैर माजल्यावर तुमच्या संबंधीची कळकळ टिकेल किंबहुना टिकली तरी तुम्हाला खरे आर्थिक स्वातंत्र्य व स्वयंनिर्णय आयतेच आणून देण्याइतकी परिणामकारक ठरेल असे समजणे म्हणजे निव्वळ दूधखुळेपणा आहे.’


भाई माधवराव बागल यांनी महर्षी शिंदे यांचे वर्णन करताना म्हटले की, ‘ त्यांना पाहताच त्यांचे पाय मला धरावेसे वाटत असे.मी जात्याच चित्रकार. माझ्या दृष्टीसमोर जणू पुरातन काळ उभा होता. चित्रात पाहिलेले आणि कल्पनेने तरंगत असलेले वशिष्ठ, वाल्मिकी ऋषी यांची ही चालती बोलती मूर्ती होती. आधुनिक काळात वावर असलेल्या त्या मुर्तीने मला पुरातन काळात खेचून नेले. विद्वत्तेचे आणि गांभीर्य डोळ्यात चमकत होते.त्यागाच्या तपश्चर्येने त्यांच्यामागे सात्त्विक वलय निर्माण केले होते.एकाच वेळी आदर आणि भीती वाटे.त्यांचा भव्य केशसंभार डोक्यापासून पाठीच्या भव्य पठारावर पसरलेला, नाकावरील चष्म्याने त्यावर नव संस्कृतीचा रंग चढला होता.अहिंसा आणि क्षात्रधर्म यांचा संयोग होता तो. जणू सात्विक संताप व भूतदया यांचा समन्वय .विषमतेची चीड होती तशीच समतेची भूक होती.शिवछत्रपतीबद्दलचा अभिमान आणि गांधीजींविषयी भक्ती यामुळे महर्षी शिंदे हे सर्वार्थाने असामान्य सुधारक होते.’थोर विचारवंत कालवश रा.ना.चव्हाण यांनी म्हंटले आहे,’ सत्यशोधक समाजाला लागलेले अनिष्ट वळण नाहीसे होऊन त्याला उन्नत ,उदात्त स्वरूप मिळावे असा त्यांचा प्रयत्न असे. ज्याप्रमाणे ते ब्राह्मो व प्रार्थना समाज खेड्यापाड्यात जावेत म्हणून झटले तसेच सत्याग्रहाची चळवळ बहुजन समाजात पसरावी म्हणूनही त्यांनी आटोकाट प्रयत्न केले.यशा-अपयशाला कर्मवीर शिंदे समान मानत. अंधश्रद्धा नाहीशी होऊन डोळस श्रद्धा वाढावी यासाठी त्यांनी अध्यात्म प्रधान ब्राह्मो समाजाचे माध्यम उपयोगात आणले. शिंदे धर्मशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ, विविध भाषा व्युत्पत्ती तज्ञ होते. ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व व परमेश्वरावर निष्ठा लोकांच्या प्रचितीस आल्यामुळे लोक त्यांना महर्षी म्हणू लागले. प्रभावी वक्ते, मार्मिक लेखक ,इतिहास संशोधक वगैरे अनेक दृष्टींनी शिंदे अष्टपैलू होते .कोणत्याही समकालीन प्रवाहाला सर्वथा प्रमाण न मानता शिंदे स्वतंत्र आणि स्वावलंबी आचाराचे राहिले. तुलनात्मक व समन्वयक पद्धतीचे कर्ते पुरस्कर्ते असल्यामुळे कुशल संघटकही होते.धर्मचिंतक, तत्त्वचिंतक असा हा कर्ता समाज सुधारक एकमेव वाटतो. यांच्या समकाळात ते आगळे वेगळे वाटतात पण नंतरही त्यांचे असामान्यत्व अढळ राहणारे आहे. ‘

प्रारंभी नमूद केलेल्या पुस्तकाचा समारोप करतांना प्रा.एन.डी. लिहितात,’ अण्णासाहेब आयुष्यभर त्यांच्याच चालीत चालत राहिले. त्यांनी जगाचा निरोप घेतला तेव्हा स्मशानात त्यांना निरोप देण्यासाठी देखील मोजकीच माणसे जमलेली होती. आमच्या या थिट्या समाजाला अण्णासाहेबांचा महत्व समजणे शक्य नव्हतं इतकी त्यांची उंची होती.अण्णासाहेबांनी जाणीवपुर्वक न मळलेली वाट पत्करली होती. रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीच्या काव्यपंक्ती प्रमाणे ती न मळलेली वा चोखाळल्यामुळे त्यांना काटेकुटे बोचले असतील.त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले असतील. वेदना सहन कराव्या लागल्या असतील.मळलेल्या वाटेनेही त्यांना जाता आले असते. त्या मळलेल्या वाटेने जाणारेच अधिक लोक होते. त्या वाटेने ते गेले असते तर त्यांना काट्याकुट्याचा त्रास झाला नसता. त्यांचे पाय रक्तबंबाळ झाले नसते. प्रवासाचा कसलाच शीण जाणवला नसता. हे सारे खरे आहे.परंतु या मळलेल्या वाटेने जाणाऱ्यांना ती वाट नेईल तिकडेच जावे लागते. त्याना जिकडे जायचे असेल तिकडे ती वाट जात नसते. त्यांना प्रवाहपतिता प्रमाणे ती वाट नेईल तिकडे जावे लागते.अण्णासाहेबांनी त्यांना जिकडे जायचे होते तिकडे जाण्यासाठी नवीन वाट मळवली. काटेकुटे सहन केले. पाय रक्तबंबाळ झाले तरी त्याची कसलीही पर्वा केली नाही. हीच माणसं नवं जग शोधून काढतात. नवा माणूस ,नवा समाज घडवतात.रात्रीच्या नीरव शांततेत सारे जग झोपेच्या अधीन होत असताना आपल्याच नादात आपल्याच एकतारीवर शांतपणे भजन गात रस्त्याने जाणाऱ्या या अवलिया मुसाफिराला मानाचा मुजरा…



(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post