प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापुर- डॉ.बाबासाहेब आंबेडकर 133 वी .जयंती शहरात ठिकठिकाणी पारंपारिक पद्धतीने साजरी करण्यात आली.शहरात ठिकठिकाणी महामानवाच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले असून दिवसभर विवीध कार्यक्रम राबविण्यात आले.या जयंतीचे औचित्य साधून काही ठिकाणी महाप्रसादाचे वाटप करून सांस्कृतिक कार्यक्रमासह पुरस्काराचे वितरणही करण्यात आले.संयुक्त जयंती महोत्सव समितीच्या वतीने सायंकाळी दसरा चौकातुन मिरवणूकीस सुरुवात होऊन यात धनगरी ढ़ोलसह चित्ररथ काढ़ण्यात येऊन या मिरवणूकीची सांगता करण्यात आली.यात विवीध पक्षाचे मान्यवर उपस्थित होते.सिध्दार्थनगराच्या वतीने मोठ्या उत्साहात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली असून मान्यवरांच्या उपस्थितीत महामानवांच्या प्रतिमेचे पूजन करून बुध्द वंदना घेण्यात येऊन सायंकाळी साडे सहाच्या सुमारास मा.आ .सतेज पाटील आणि माजी आ.मालोजीराजे यांच्या हस्ते मिरवणुकीस प्रारंभ झाला.
या मिरवणूकीत पारंपारिक वाद्येसह लहान मुलींचे लेझीम पथक सहभागी झाले होते.तसेच रिक्षावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे फलक लावले होते.आणि डॉ.आंबेडकर यांच्या मुर्तीसह गौतम बुद्ध यांची मूर्तीही लक्ष वेधून घेत होती.तसेच या मिरवणुकीचे खास आकर्षण असलेल्या छत्रपती शाहू महाराज,डॉ.आंबेडकर ,महात्मा जोतिबा फुले यांची वेशभुषा केलेले कार्यकर्ते सहभागी झाले होते.
ही मिरवणुक सिध्दार्थनगर येथुन दसरा चौक ,बिंदु चौक,मिरजकर तिकटी ,बिनखांबी गणेश मंदीर ,पापाची तिकटी ,महानगरपालिका, शनिवार पेठ,बुध्दवार पेठ मार्गे येऊन सिध्दार्थनगर येथे सांगता झाली.या मिरवणुकीत जयंती उत्सव समितीचे कार्यकर्ते,सर्व तरुण मंडळे ,सर्व महिलां बचत गटासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.यात निळे फ़ेटे ,पांढ़री साडी परिधान करून महिला सामील होऊन सर्व महापुरुषाचा जयघोष करीत शिस्तबद्ध पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.शहरात डॉ.आंबेडकर यांच्या जयंती निमित्त पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.बिंदु चौक येथे लोकजनशक्ती पार्टीच्या वतीने भिम गितांचा कार्यक्रम आयोजित केला होता.