प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : महाराष्ट्र गांधी स्मारक निधी,युवक क्रांती दल या संघटनांच्या वतीने बुधवार,दि.२७ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता गांधीभवन,कोथरूड येथे 'रोजा इफ्तार' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'निर्भय बनो आंदोलन' चे एड .असीम सरोदे,रिपब्लिकन युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल डंबाळे,रिजनल ख्रिश्चन सोसायटीचे लुकस केदारी,इस्लाही सोशल मीडिया फाउंडेशन चे अध्यक्ष पैगंबर शेख,पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे अध्यक्ष फिरोज मुल्ला हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी ,सचिव संदीप बर्वे, विश्वस्त अन्वर राजन हे देखील उपस्थित राहणार आहेत. युवक क्रांती दलाचे कार्यवाह जांबुवंत मनोहर,संघटक अप्पा अनारसे,पुणे शहराध्यक्ष मुस्कान परवीन बाबासाहेब,सुदर्शन चखाले यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली.
भुमिका आणि आवाहन
--------------
दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गांधी भवन मध्ये रोजा इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हिंदू-मुस्लिम ऐक्य, सर्वांना रोजगार आणि जातीनिर्मूलन हे गांधीजींनी सांगितलेले भारतीय राष्ट्रवादाचे तीन आधार आहेत. एकमेकांच्या धर्माचा आदर करणे आणि एकमेकांच्या सण-उत्सवात आनंदाने सहभागी होणे, हे भारतीय धर्मनिरपेक्षतेचे सौंदर्य आहे. दिवाळी, रमजान ईद आणि नाताळ हे त्यासंदर्भातले तीन प्रमुख सण आहेत, ज्यात प्रत्येक भारतीयाने सहभाग घेतला पाहीजे. राष्ट्राची एकता आणि एकात्मता याचे आश्वासन देणारी बंधूता निर्माण करण्याचा संकल्प भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये नमूद करण्यात आला आहे. त्या संकल्पाप्रमाणे आयोजित करण्यात आलेल्या या रोजा इफ्तार कार्यक्रमात दरवर्षीप्रमाणे सहभागी व्हावे,असे आवाहन करण्यात आले आहे .
या कार्यक्रमात रोजा म्हणजे दिवसभराचा उपवास सोडण्यासाठी मुस्लिम बंधू-भगिनी गांधी भवनमध्ये सायंकाळी ६ वाजता येतील. त्यांच्या सेवेसाठी सर्वधर्मीय कार्यकर्ते दुपारी ४ वाजता गांधी भवन मध्ये एकत्र येवून पुर्वतयारी करतील. ज्यांना या सेवाकार्यात सहभागी व्हायचे असेल, त्यांनी दुपारी ४ वाजता गांधी भवनला यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
आज देशामध्ये हिंदू-मुस्लिम ऐक्य तोडण्यासाठी काही राजकीय शक्ती अफवा, गैरसमज आणि असत्य पसरवत आहेत. त्याला बळी पडलेले लोक ठिकठिकाणी हिंसाचार करीत आहेत. या गंभीर वास्तवाचे भान ठेवून आपल्याला राष्ट्रीय एकात्मतेचे मूल्य बळकट करायचे आहे. म्हणून अधिक उत्साह आणि जोमाने या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दल च्या वतीने करण्यात आले आहे.