कोल्हापूर जिल्ह्यात ७ मे रोजी होणार मतदान
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर, दि. १६ : मुख्य निवडणूक आयुक्त भारत सरकार यांच्याकडून शनिवारी दुपारी लोकसभा निवडणूक २०२४ ची घोषणा झाल्यानंतर कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून याबाबत तयारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी जिल्ह्यातील सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणुकीच्या अनुषंगाने काम पाहणारे सर्व नोडल अधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली.
लोकसभा निवडणूक भारतात एकूण ७ टप्प्यात होत असून यातील तिसऱ्या टप्प्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघाची निवडणूक ७ मे रोजी होत आहे. या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदर्श आचारसंहितेचे पालन करण्याबाबत तसेच निवडणूक कर्मचारी प्रशिक्षण, ईव्हीएम बाबतची व्यवस्था, आचारसंहिता लागू झाल्यानंतर २४ तासात, ४८ तासात आणि ७२ तासात करावयाची कार्यवाही या अनुषंगाने सूचना दिल्या.
उद्या रविवारी दुपारी ४ वाजता जिल्ह्यातील निवडणूक संदर्भात जिल्हाधिकारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत. झालेल्या बैठकीत अप्पर जिल्हाधिकारी तथा हातकणंगले निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे, अपर जिल्हाधिकारी सुरेश जाधव, किरण कुलकर्णी, उपजिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर, हातकणंगलेसह तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग येथील मतदान होणार आहे.