मतदान प्रक्रियेची ओळख प्रत्येक मतदाराला होण्यासाठी निवडणूक आयोगाने यंदा छापील माहिती मतदारांपर्यंत पोहोचविण्याचा निर्णय घेतला आहे. ही माहिती मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेमध्ये छपाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे. या संदर्भात पुण्याचे संशोधक डॉ. तुषार निकाळजे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली, राज्य निवडणूक आयुक्त महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना ई-मेल द्वारे कळविले होते. या ई-मेलमध्ये वर्ष २००९ मधील स्वाईन फ्लू, वर्ष २०१९ मधील कोविड- १९ व इतर संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव यांचा उल्लेख करून भारतातील अंदाजे १० लाख मतदान केंद्रावर काम करणारे ५३ लाख निवडणूक व मतदान अधिकारी व सुरक्षा अधिकारी यांचे कामकाज सुखकर व जलद व्हावे याचा प्रस्ताव सादर केला. यामध्ये ९० कोटी मतदारांचा उल्लेख आहे. यामुळे प्रत्येक मतदान केंद्रावरील ३४ मिनिटांचा वेळ वाचणार आहे, असे डॉ. निकाळजे यांनी निवडणूक आयोगास सांख्यिकी माहितीसह कळविले होते. याची दखल घेऊन निवडणूक आयोगाने मतदान प्रक्रियेची ओळख करून देणारी माहिती लिखित स्वरूपात मतदारांपर्यंत पोहोचवण्याचे ठरविले आहे. डॉ. निकाळजे यांनी सदर माहिती इयत्ता दहावीच्या इतिहास व नागरिक शास्त्र या विषयाच्या निवडणूक विषयक प्रकरणांमध्ये समाविष्ट करण्यासंदर्भात विनंती केली होती. तसेच हे प्रकरण भारतातील इतर राज्यांच्या इयत्ता दहावीच्या पुस्तकात समाविष्ट करण्याची विनंती केली होती. डॉ. निकाळजे यांनी वर्ष २०२२ पासून निवडणूक प्रक्रियेतील वेगवेगळ्या बदलांची सूचना मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्याचे निवडणूक आयुक्त, इतर १८ राज्यांचे निवडणूक आयुक्त तसेच पुणे जिल्ह्याचे निवडणूक आयुक्त यांना कळविल्या आहेत. काही सूचना निवडणूक आयोगाच्या समिती पुढे विचाराधीन आहेत.
डॉ. निकाळजे यांच्या निवडणूक प्रशासन विषयक सूचना उपयुक्त असल्याचे निवडणूक आयोगाने त्यांना कळविले आहे.
तसेच डॉ. तुषार निकाळजे या संशोधकाने नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये "कोविड- १९ च्या अनुषंगाने निवडणूक प्रशासन व्यवस्थेतील बदल
" या विषयावर शोधनिबंध सादर केला होता. त्यामध्ये काही प्रशासकीय सूचनांचे बदल सुचविले होते.
डॉ. तुषार निकाळजे यांनी जून २०२२ मध्ये प्रेस मीडिया लाईव्ह या समाज माध्यमाद्वारे "महोत्सव लोकशाहीचा" या सदराखाली निवडणूक प्रशासन विषयावरील बदल यांचे लेख प्रकाशित केले होते. तसेच वर्ष २०१४, २०१७, २०१९ , २०२३ मध्ये वर्तमानपत्रांमध्ये निवडणूक विषयक लेख प्रकाशित झाले आहेत.
डॉ. निकाळजे यांनी भारतीय निवडणूक प्रणाली या विषयावर संशोधन केलेले आहे. तसेच त्यांची निवडणूक विषयावरील दोन पुस्तके ०९ विद्यापीठे व ०४ स्वायत्त महाविद्यालये यांच्या अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तक म्हणून मान्यता प्राप्त आहेत. डॉ. निकाळजे यांना राज्य निवडणूक आयोगाने वर्ष २०१९ मध्ये निवडणूक विषयक तज्ञ म्हणून समितीमध्ये नेमणूक केली होती.
डॉ. तुषार निकाळजे हे सध्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय निवडणूक विषयक संशोधनात व्यस्त आहेत. तसेच त्यांचे निवडणूक विषयक कार्यपद्धतीचे एक पेटंट आंतरराष्ट्रीय स्तरावर सादर करण्याचे प्रयत्न करीत आहेत. याकरिता त्यांनी भारतीय पेटंट अधिकार मंडळ यांचेकडून ना- हरकत प्रमाणपत्र घेतले आहे. येत्या निवडणूकांमध्ये मतदानाचा टक्का वाढण्यासाठी काही उपाययोजना सुचविलेल्या आहेत. त्यामध्ये सहकारी गृहरचना संस्थांमधील क्लब हाऊस मध्ये मतदान केंद्रांची स्थापना करण्यासंदर्भात माहिती निवडणूक आयोगास दिली आहे. यामुळे सहकारी संस्थांमध्ये असलेल्या घरांमध्ये अथवा फ्लॅट मधील वयोवृद्ध, दिव्यांग, आजारी व्यक्तींना मतदान करणे सहज शक्य होईल. यामुळे किमान ८ ते १२ टक्के मतदान वाढेल, अशी आशा डॉ. निकाळजे यांनी व्यक्त केली आहे. वोटिंग अवेअरनेस व्हॅनद्वारे शहर व ग्रामीण भागातील समाज केंद्रे, गृहरचना संस्था, शाळा, महाविद्यालये व शैक्षणिक संस्था यांमध्ये मतदान प्रक्रियेची माहिती व जागरूकता याबाबतचा प्रकल्प वर्ष २०२२ मध्ये सादर केला आहे . डॉ. निकाळजे गेली १९ वर्षे निवडणूक, सामान्य प्रशासन ,विद्यापीठ प्रशासन व कायदे या विषयांवर संशोधन करीत आहेत.