प्रेस मीडिया लाईव्ह :
डॉ. तुषार निकाळजे
महाराष्ट्र बोर्डच्या इयत्ता दहावीतील इतिहास व नागरिक शास्त्र या विषयाच्या पृष्ठ क्रमांक ७९ वर असलेल्या मतदान प्रक्रिया संदर्भातील मजकुरामध्ये मतदान प्रक्रियेची स्पष्ट ओळख करून देणारी माहिती अभ्यासक्रमात असावी अथवा या संदर्भात स्वतंत्र प्रकरण तयार करावे अशी विनंती डॉ. तुषार निकाळजे यांनी शालेय शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई यांना केली आहे. तसेच या संदर्भातील पत्राची प्रत मुख्य निवडणूक आयुक्त, नवी दिल्ली व राज्य निवडणूक आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांना देखील दिली आहे.
मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी धूम्रपान करू नये, तसेच शक्यतो मास्कचा वापर करावा. वर्ष २००९ मधील स्वाइन फ्लू व वर्ष २०१९ मधील कोविड-१९ या आजाराचे व इतर संसर्गजन्य आजारांचे गांभीर्य लक्षात घेणे अपेक्षित आहे. केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी क्रमांक एक ,दोन , तीन यांच्या कामाची माहिती व मतदाराने त्यांना कसे सहकार्य करावे इत्यादी मतदान प्रक्रियेची माहिती असणारे प्रकरणाचा समावेश दहावीच्या पाठ्यपुस्तकामध्ये असावा, अशी विनंती डॉ. निकाळजे यांनी केली आहे.
वरील निवेदनात पुस्तकातील प्रकरणाचा मसुदा डॉ. निकाळजे यांनी सादर केला आहे .यामुळे मतदान प्रक्रिया जलद गतीने होईल व एका मतदान केंद्रावरील दिवसभरातील ३४ मिनिटांचा वेळ वाचेल व मतदान अधिकारी व कर्मचारी पुढील कामे जलदतेने करतील. भारतामध्ये साधारणतः १० लाख मतदान केंद्रे असतात. यामध्ये काम करणारे ५३ लाख कर्मचारी व सुरक्षा अधिकारी असतात. यांचा दिवसभरातील प्रत्येकी ३४ मिनिटांचा वेळ वाचेल.
डॉ. निकाळजे यांनी भारतातील सर्व शाळांमधील अभ्यासक्रमात सदर माहिती समाविष्ट करण्याची विनंती केली आहे. त्याकरिता असलेले केंद्रीय विद्यालय, महाराष्ट्र बोर्ड व इतर राज्य यांचे बोर्ड, आयसीसी, सीबीएससी बोर्ड इत्यादींचा उल्लेख केला आहे.