प्रेस मीडिया लाईव्ह :
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांच्या प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.सीबीएसईने वारंवार स्मरणपत्र देऊनही काही शाळांनी प्रात्यक्षिक परीक्षा, प्रकल्पाची कामे, आंतरिक मुल्यांकन, आंतरिक ग्रेड कालमर्यादेत पूर्ण केले नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही शाळांनी मुदत वाढवून देण्याची वारंवार मागणी केल्यानंतर मुदतवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याची अंतिम तारीख वाढवली असून. या बरोबरच बोर्डाने पोर्टलवर प्रात्यक्षिक, प्रकल्प कामे आणि अंतर्गत गुण अपलोड करण्याची अंतिम तारीख ३१ मार्चपर्यंत वाढवली आहे. याबाबत सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा नियंत्रकांनी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना परिपत्रकही जारी केलेले आहे.
प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी गुण वितरणासह विषयांची यादीही जारी केली आहे. सीबीएसईने एका विषयाला दिलेले जास्तीत जास्त १०० गुण असल्याचे जाहीर केले होते. यात थिअरी, प्रॅक्टिकल, प्रोजेक्ट आणि इंटर्नल असेसमेंटचे गुण असणार आहेत.
प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी मुदतवाढ देण्यात आल्याचा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. ज्या विद्यार्थ्यांना आरोग्याच्या किंवा इतर काही अत्यावश्यक कारणामुळे प्रात्यक्षिक परीक्षा देता येत नाही. बोर्डाच्या नियमानुसार प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यासाठी बाह्य परीक्षकांची गरज असते. त्याच्याशिवाय या परीक्षा घेता येत नाहीत.
शाळांची संख्या जास्त असून त्या प्रमाणात बाह्य परीक्षकांचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे काही शाळांना प्रात्यक्षिक परीक्षा घेता आल्या नाहीत. तांत्रिक अडचणींमुळे आंतरिक मुल्यांकन करता आले नाही. या शाळांसाठी मुदतवाढीचा निर्णय आता महत्वाचा ठरणार आहे.