प्रत्येक मतदारापर्यंत यंत्रणा पोहचावी; स्वीप अंतर्गत मतदार जनजागृतीला गती द्या - जिल्हाधिकारी अमोल येडगे
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : लोकसभा निवडणूकीची कामे गतिमान झाली असून आता प्रत्येक मतदारसंघात मनुष्यबळ पोहचत आहे. सर्व मतदारांपर्यंत आपापली निवडणूक यंत्रणा पोहचून आवश्यक माहिती व मतदार जनजागृती करेल याची खात्री प्रत्येक निवडणूकीसाठी नेमलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी करावी याबाबतच्या सूचना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात सर्व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल व सहाय्यक नोडल अधिकारी यांची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते. लोकसभा निवडणुका जिल्ह्यात नियोजनबद्ध व सुरळीत पार पाडण्यासाठी अधिकाऱ्यांनी निवडणुकीची कामे वेळेत पूर्ण करून सोपवलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडाव्यात, अशा सूचनाही जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिल्या. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन, निवडणूक निर्णय अधिकारी हातकणंगले संजय शिंदे, सारथीच्या अपर जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण श्रीम.किरण कुलकर्णी, उप जिल्हाधिकारी निवडणूक समाधान शेंडगे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली उपस्थित होते.
मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण ५ ते ८ एप्रिल दरम्यान मतदार संघात आयोजीत करण्यात आले आहे. यात एकूण कर्मचारी अधिकारी २७१ वि.स. मतदारसंघातील १६७३, २७१-२२०९, २७३-२२७०, २७४-२००४, २७५-१५७०, २७६-२९२७, २७७-२०००, २७८-१४७४, २७९-११२३, २८०-१८९० याप्रमाणे आहेत. प्रशिक्षणासाठी मास्टर ट्रेनर, त्याठिकाणच्या किमान आवश्यक सुविधा आणि प्रशिक्षण ठिकाण योग्य असल्याची खात्री करा. प्रशिक्षणानंतर मूल्यमापन करा अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. जिल्ह्यातील २४ नोडल अधिकाऱ्यांनी यावेळी माहिती सादर केली. वाहतूक आराखडा, आचारसंहिता, एक खिडकी परवानग्या, ईव्हीएम वाहतूक, घरपोच मतदान अशा विषयाबाबत दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करा असे त्यांनी सांगितले.
मतदानापर्यंत शासकीय यंत्रणेने स्वीप अंतर्गत वेगवेगळे कार्यक्रम घेवून जिल्हयातील मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रयत्न करावा. विशेषकरून गेल्या निवडणूकीमधे ज्या ठिकाणी कमी मतदान झाले त्या ठिकाणी विशेष लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या. मतदान प्रक्रियेत सहभागींचे प्रशिक्षण दिलेल्या वेळेत पुर्ण करून आवश्यक निवडणूक साहित्याचे वाटपही तातडीने करा अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी दिल्या.
सी व्हिजिल ॲप वर येणाऱ्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारींचे 100 मिनीटांत निराकरण होईल, याची दक्षता घ्या. प्रशिक्षण कालावधीत व मतदान प्रक्रियेदरम्यान कार्यरत कर्मचारी व नागरिकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये याची खबरदारी घ्या. निवडणूक कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सर्व पथकांनी आपापली भूमिका चोखपणे पार पाडावी. आंतरराज्य व आंतरजिल्हा तपासणी नाक्यांवर जिल्ह्यातून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी करा. निवडणूक कामातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन करा.
प्रशिक्षण ठिकाणी आवश्यक सुविधा, व्हिडिओग्राफरची नियुक्ती करण्याबाबत सूचना त्यांनी केल्या. नियुक्त निवडणूक अधिकारी व कर्मचारी यांचे यादृच्छिकीकरण (रँडमायझेशन) होणार असून संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या किंवा नियुक्त केलेले ठिकाण कोणत्याही स्थितीत रद्द करू नये यासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी दक्षता घेणेबाबत त्यांनी सूचना दिल्या.