जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचेकडून माध्यम कक्षाची पाहणी
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने लोकसभा मतदारसंघ 47 व 48 करिता माध्यम कक्षाची स्थापना कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर करण्यात आली आहे. या माध्यम कक्षाला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेट देवून कामकाजाबाबत आवश्यक सूचना दिल्या.
या कक्षामध्ये माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समिती (MCMC) मार्फत दिल्या जाणाऱ्या राजकीय जाहिरातींचे प्रमाणिकरण करणे, पेड न्यूजची पडताळणी करणे, फेक न्यूज, आक्षेपार्ह मजूकर तपासणे, राजकीय जाहिरातींचा खर्च तपशील देणे या विषयांवर कामकाज करण्यात येणार आहे . राजकीय जाहिराती प्रमाणिकरणासाठी किंवा अधिक माहितीसाठी माध्यम कक्ष, 3 रा मजला , सांख्यिकी कार्यालयाजवळ, नियोजन भवन इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे किंवा दूरध्वनी क्रमांक 0231-2992930 वर संपर्क साधावा. या भेटीवेळी उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, निवडणूक खर्च परिक्षण नोडल अधिकारी अतुल आकुर्डे, माध्यम कक्ष नोडल अधिकारी सचिन अडसूळ, सामाजिक माध्यम तज्ञ तथा जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे उपस्थित होते.
राजकीय जाहिरात प्रमाणिकरणासाठी घेताना विहित नमुन्यात घ्यावी, पेड न्यूज बाबत बारकाईने लक्ष ठेवा, सोशल मीडियातून आक्षेपार्ह मजकूर आल्यास तातडीने निदर्शनास आणा या अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी भेटीवेळी सूचना दिल्या. सोशल मीडिया हा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये गणला जातो. सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींचा खर्च उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट होत असतो. सोशल मीडियावरील राजकीय जाहिरातींना प्रमाणिकरण गरजेचे असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. या कक्षाकडून इलेक्ट्रॉनिक मीडियावरील प्रत्येक जाहीरातीला प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले आहे किंवा नाही याची खात्री करण्यात येणार आहे.
मुद्रित माध्यमातील राजकीय जाहिरात उमेदवारांच्या अनुमतीशिवाय प्रकाशित करता येणार नाही. मुद्रित माध्यमांना राजकीय जाहिरातीचे प्रमाणिकरण करण्याची आवश्यकता नाही. मात्र मतदानाच्या एक दिवस अगोदर व मतदानादिवशी मुद्रित माध्यमांना देण्यात येणारी राजकिय जाहिरात उमेदवार किंवा पक्षाला माध्यम कक्षाकडून तपासून प्रमाणपत्र घेणे अनिवार्य असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांनी सांगितले. माध्यम कक्षात पेड न्यूज, टिव्ही, रेडिओ एफएम, सोशल मीडिया, माध्यम प्रमाणिकरण, वृत्त आणि कात्रण युनिट स्थापन करण्यात आले आहे. राजकीय जाहिरात प्रमाणिकरणासाठी पक्ष किंवा उमेदवारांनी माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीच्या माध्यम कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी तथा माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीचे सदस्य सचिव सचिन अडसूळ यांनी केले आहे.