उमेदवारांच्या खर्चाच्या अंतरिम यादीबाबतच्या हरकती 14 मार्च पर्यंत सादर कर - जिल्हाधिकारी अमोल येडगे
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : आगामी लोकसभा निवडणुक लढविणाऱ्या सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या खर्चाच्या अंतरिम यादीतील दराबाबतच्या हरकती गुरुवार 14 मार्च 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले
सार्वत्रिक लोकसभा निवडणूक-२०२४ च्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हास्तरीय निवडणूक खर्च सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे, उपविभागीय अधिकारी हरिष धार्मिक, जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा जिल्हा खर्च समन्वय समितीचे नोडल अधिकारी अतुल आकुर्डे, जिल्हा कोषागार अधिकारी अश्विनी नराजे तसेच संबंधित अधिकारी व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका लढवणाऱ्या उमेदवारांच्या खर्चाची दर निश्चिती करण्याबाबत जिल्ह्यातील विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान होणाऱ्या विविध बाबींच्या खर्चाच्या दराबाबत चर्चा करण्यात आली. खर्च समितीच्या वतीने दर निश्चिती करण्यात येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. येडगे यांनी केले.
आदर्श आचारसंहिता दरम्यान काय करावे व काय करु नये तसेच उमेदवारांच्या खर्च अहवालाबाबतची माहिती उप जिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेंडगे यांनी दिली.
नामनिर्देशन पत्र भरताना घ्यावयाच्या दक्षतेबाबत हरिष धार्मिक यांनी माहिती दिली.
जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा जिल्हा खर्च समन्वय समितीचे नोडल अधिकारी अतुल आकुर्डे यांनी म्हणाले, नामनिर्देशन पत्र दाखल केल्यापासून निकाल जाहीर होईपर्यंत होणारा खर्च उमेदवारारांच्या खर्चात नमूद करण्यात येतो. निवडणूक खर्च विषयक लेखे विहित नमुन्यात व मुदतीत सादर करणे बंधनकारक असल्याचे त्यांनी सांगितले.