प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
prasad.kulkarni65@gmail.com
शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू या तीन महान क्रांतिकारकांना ब्रिटिशांनी २३ मार्च १९३१ रोजी फाशी दिली. त्या घटनेला ९३ वर्षे पूर्ण होत आहेत .गेली नऊ-साडेनऊ दशके या क्रांतिकारकांचे शौर्य सर्वांनाच प्रेरणादायी वाटत आले आहे.शहीद भगतसिंग हे स्वतंत्र प्रज्ञेचे तरुण विचारवंत देशभक्त होते.देशप्रेमाची जाज्वल्य प्रेरणा त्यांनी जगाला दिली.भगतसिंग हे एक विवेकवादी अधिष्ठान असलेले प्रज्ञावंत होते. आज समाजाच्या सर्व पातळीवर विवेकवादापुढेच आव्हान उभे केले जात आहे. भगतसिंगानी जे जे नाकारले त्याचाच उदोउदो सुरूआहे. विवेक गमावलेला समाज अध:पतनाच्या दिशेने जात असतो हा इतिहास आहे.
विवेकवादाचा पुरस्कार करताना भगतसिंग यांनी देव, धर्म ,श्रद्धा, अंधश्रद्धा वगैरेचा बारकाईने अभ्यास केला होता. चिकित्सक दृष्टीने या गोष्टी समजून घेतल्या होत्या.' मी नास्तिक का आहे ?' ही त्यांची फार महत्त्वाची पुस्तिका आहे. देवाचा उगम कसा झाला ? हा प्रश्न उपस्थित करून उत्तर देताना ते म्हणतात ,माणसाच्या मर्यादा दुबळेपणा , त्रुटी यांची झालेली जाणीव विचारात घेऊन सर्व परिस्थितीला धैर्याने तोंड देण्यासाठी, सर्व प्रकारच्या संकटाना खंबीरपणे सामोरे जाण्यासाठी, भरभराटीच्या व समृद्धीच्या काळात माणसाला आवर घालून त्याच्या वागण्यावर ताबा ठेवण्यासाठी देवाचे काल्पनिक चित्र निर्माण करण्यात आले. देवाची, दयाळू व वात्सल्यमूर्ती वर्णिल्याने तो पिता,माता,भगिनी, बंधू, मित्र , मदतनीस अशा स्वरूपात उपयोगी पडू लागला.
भगतसिंग यांच्या मते अंधश्रद्धा मेंदू शिथिल करतात आणि माणसाला प्रतिगामी बनवतात. म्हणून जो स्वतःला वास्तववादी म्हणून घेतो त्याने संपूर्ण सनातन धर्मश्रद्धेला आव्हान दिले पाहिजे. विवेक बुद्धीच्या प्रखर हल्याला जरअंधश्रद्धा तोंड देऊ शकली नाही तर ती कोसळून पडेल. ते म्हणतात, जर ही पृथ्वी किंवा विश्व सर्वव्यापी, सर्वज्ञ, सर्व शक्तिमान अशा विधात्याने निर्माण केली असेल तर त्याने मुळात हे सर्व का निर्माण केले ? दैन्य आणि यातनांनी भरलेले हे जग लाखो शोकांतिकांची ही सतत बदलती पण चिरंतन गुंफण, ज्यात एकही प्राणीमात्र सर्वार्थाने समाधानी नाही. हे सर्व त्याने का निर्माण केले ? कृपा करून हाच त्याचा कायदा आहे असे म्हणू नका. जर तो नियमाने आणि कायद्याने बांधलेला असेल तर तो सर्वशक्तिमान नाही.तो आपल्यासारखाच गुलाम आहे. कृपा करून ही त्याची आनंदक्रीडा आहे असे म्हणू नका.
ज्या राजकीय स्वातंत्र्यासाठी भगतसिंग शहीद झाले त्याबाबतचे ही काही प्रश्न ते उपस्थित करताना दिसतात. त्यांच्या मते पाप किंवा गुन्हा करण्यापासून सर्व शक्तिमान ईश्वर परावृत्त का करत नाही ?युद्ध पेटवणाऱ्या सत्ताधीशांना त्याने ठार का मारले नाही ?किंवा त्यांच्यातील युद्धाची उर्मी का काढली नाही ?महायुद्धाने मानव जातीवर कोसळणारी आपत्ती त्याने का टाळली नाही ?भारताला स्वतंत्र करण्याची भावना तो ब्रिटिशांच्या मनात का निर्माण करत नाही ?उत्पादनाच्या साधनांवरील आपला वैयक्तिक मालकी हक्क सोडावा अशी उत्साही परोपकारी भावना तो सगळ्या भांडवलदारांच्या मनात का रूजवत नाही? असे विविध प्रश्न उभे करून भगतसिंग हे जग दैवी नव्हे तर वैज्ञानिक शक्तीवर अमानवी नव्हे तर मानवी शक्तीवर चालले आहे हे स्पष्ट करतात.
विवेकनिष्ठ जगणे सोपे नाही. अंधविश्वासापासून समाधान किंवा आधार मिळवणे सोपे आहे.पण तरीही विवेकनिष्ठ आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणे हे आपले कर्तव्य आहे असे ते सांगतात.शास्त्राची प्रगती होत असताना शोषित घटक स्वतःच्या मुक्तीसाठी स्वतः संघटित संघर्ष करीत असतांना परमेश्वराची, काल्पनिक त्रात्याची आवश्यकता नाही असे सांगतात त्यांच्या मते जो माणूस प्रगतीच्या बाजूचा आहे त्याने जुन्या श्रद्धेच्या प्रत्येक बाबीबद्दल टीका करायला ,अविश्वास दाखवायला हवा. तिला आव्हान द्यायला हवे. प्रचलित श्रद्धांच्या अगदी कानाकोपऱ्यात सुद्धा एक एक करून विश्लेषण करायला हवे.भगतसिंगांचे हौतात्म्य वाया घालवायचे नसेल तर हा विवेकवाद ही आपण स्वीकारायला हवा.
भगतसिंगांचे सहकारी सुखदेव हे पंजाबात जन्मले होते. त्यांच्याबाबत जी काही थोडीफार माहिती उपलब्ध आहे त्यावरून सुखदेव हे अतिशय बुद्धिमान होते स्पष्ट होते. कारण त्यांना 'क्रांतिकारकांचा मेंदू 'असे नाव दिले गेले होते. क्रांती करण्यासाठी जे विविध प्रकारचे कट रचावे लागतात त्याविषयी सुखदेव यांना विविध कल्पना सुचत असत. प्रत्यक्ष क्रांतीकार्यात ते फारसे सहभागी नसायचे. पण त्या कार्याची आखणी आणि नियोजन त्यांचेच असे. त्याचा क्रम आणि इतर तपशीलही तेच ठरवत असत. सुखदेव यांची बुद्धिमत्ता आणि संघटनचातुर्य यामुळे बहुतेक क्रांतिकारक कारवाया यशस्वीरित्या पार पडत असत कटांसाठी नवनवीन माणसे शोधणे, त्यांचे संघटन करणे यात ते वाकबगार होते. १९२६ सालापासून क्रांतिकार्यात ते महत्त्वाचे कार्यकर्ते म्हणून अग्रणी होते. पंजाबातील क्रांतिकारकांचे ते आदरणीय होते. लाहोर येथे त्यांनी 'काश्मीर बिल्डिंग 'येथे बॉम्ब बनवायचा कारखानाच काढला होता. शहीद भगतसिंगानी स्थापलेल्या नौजवान भारत सभा या संघटनेत सुखदेव चंद्रशेखर आजाद, भगवती चरण, बटुकेश्वर दत्त, जतिंद्रनाथ दास आदींचाही पुढाकार होता. सँडर्सचा वध आणि इतर क्रांतिकारकांमुळे भगतसिंग व राजगुरूंना फाशीची शिक्षा झाली होती. तर ब्रिटिश सत्तेला आव्हान देणाऱ्या विविध कामामुळे सुखदेवनाही फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.
हुतात्मा राजगुरू हे महाराष्ट्रातील एक थोर क्रांतिकारक.वयाच्या तेविसाव्या व्या वर्षी ते शहीद झाले. पुणे जिल्ह्यातील खेड या गावी एका मध्यमवर्गीय घरात त्यांचा जन्म झाला. पुण्यात प्राथमिक शिक्षण झाल्यावर ते अमरावतीला गेले. त्या वातावरणात त्यांना देशभक्तीची मोठी प्रेरणा मिळाली. वयाच्या पंधराव्या वर्षी १९२३ ते संस्कृतच्या अध्ययनासाठी बनारसला गेले. तेथे न्यायशास्त्रातील मध्यमा ही परीक्षा ते उत्तीर्ण झाले. त्यांना मराठी ,संस्कृत भाषांसह इंग्रजी ,कन्नड, मल्याळम ,हिंदी , उर्दू आदी भाषांचेही उत्तम ज्ञान होते. ते काँग्रेस सेवा दलात काही काळ कार्यरत होते.
बनारसमध्ये त्यांची साचींद्रनाथ संन्याल ,चंद्रशेखर आजाद आदी क्रांतिकारकांची ओळख झाली. ते हिंदुस्थान रिपब्लिकन आर्मीत दाखल होऊन क्रांतीकार्यात सहभागी झाले. राजगुरूंचा नेम अचूक होता.' रघुनाथ 'या टोपण नावानेही ते प्रसिद्ध होते. त्यानंतर त्यांची भगतसिंग , जतिनदास,सुखदेव आदींशी मैत्री झाली. सायमन कमिशनला विरोध करताना झालेल्या हल्ल्यामुळे लाला लजपतराय यांचा मृत्यू झाला. त्याचा बदला घेण्यासाठी ज्या क्रांतिकारकांची नेमणूक झाली त्याच राजगुरू, चंद्रशेखर आजाद ,भगतसिंग, जय गोपाल आदींचा समावेश होता. ब्रिटिश पोलिस अधिकारी सँडर्सवर लाहोरला १७ डिसेंबर १९२८ रोजी हल्ला केला तेव्हा पहिल्या दोन गोळ्या राजगुरूंनी झाडल्या होत्या. नंतर विधानसभेतील बॉम्बस्फोट प्रकरणी भगतसिंगाना अटक झाली. पण चंद्रशेखर आजाद व राजगुरू दोन वर्ष आज्ञास्थळी भूमिगत राहून क्रांतिकार्यात मग्न होते. अखेर ३० सप्टेंबर १९२९ रोजी पुण्यात त्यांना अटक झाली. आणि नंतर भगतसिंग,सुखदेवसह त्यांनाही फाशी देण्यात आले. त्यांच्या स्मरणार्थ त्यांचे जन्मगाव असलेल्या खेडचे राजगुरुनगर असे नामकरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या या अस्सल मराठी क्रांतिकारक हुतात्म्याला विनम्र अभिवादन....!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)